लेख-समिक्षण

रामायण, राम, रणबीर आणि वाद

सध्या बहुचर्चित, बहुप्रतिक्षित ‌‘रामायर्ण या चित्रपटाच्यानिमित्तान रणीबर कपूरने साकारलेल्या रामाच्या व्येितेखेवरुन वाद सुरू आहेत. वास्तविक कलाकारांचे वैयक्तिक आयुष्य, त्याची सिनेकारकिर्द आणि कलाकृतींमधील त्याचा अभिनय याची सांगड घातली जाता कामा नये, असे संकेत आहेत. कारण सिनेमा-नाटक या कलाकृतीमधील व्यक्तिरेखेला कलाकार सार्थपणाने न्याय देतो का, तो ताकदीने साकारतो का इथवरच प्रेक्षकांचा संबंध असतो. पण आपल्याकडे पौराणिक, ऐतिहासिक चित्रपटांच्या निमित्ताने ही सांगड हमखास घातली जाते. – सोनम परब

भारतीय चित्रपटसृष्टीत पौराणिक कथांना केवळ मनोरंजनाचे साधन म्हणून कधीही पाहिले गेले नाही. त्या नेहमीच समाजाच्या आस्था, परंपरा आणि सांस्कृतिक ओळखीचे प्रतिबिंब ठरल्या आहेत. ‌‘रामायण‌’सारख्या महाकाव्यांची पडद्यावर पुनर्निर्मिती करण्याचा प्रयत्न झाला की अपेक्षा, भावना आणि वाद यांचे वर्तुळ आपोआप तयार होते. सध्या दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या आगामी ‌‘रामायण‌’ या बहुचर्चित चित्रपटामध्ये रणबीर कपूर यांची राम म्हणून निवड झाल्यानंतर पुन्हा एकदा हीच चर्चा रंगताना दिसते. हा वाद नवा नाही; त्याची मुळे भारतीय चित्रपटसृष्टीच्या सुरुवातीच्या काळात रुजलेली आहेत. राम, कृष्ण किंवा इतर कोणतेही पौराणिक पात्र साकारणे ही अभिनयकौशल्याचे दर्शन घडवण्याची संधी असली तरी ती एक सांस्कृतिक जबाबदारी स्वीकारणेही असते. याचे मुख्य कारण म्हणजे प्रेक्षक अशा कलाकारांकडे केवळ अभिनेता म्हणून पाहत नाहीत, तर आदर्श व्यक्तिमत्त्वाच्या रूपात त्यांची प्रतिमा निर्माण करतात. अपेक्षा आणि वास्तव यातील हे अंतरच अनेकदा वादाचे कारण ठरते.
भारतीय सिनेमाच्या सुरुवातीच्या टप्प्यात, विशेषतः 1930 ते 1950 या काळात पौराणिक चित्रपटांना मोठे स्थान होते. त्या काळात राम, कृष्ण किंवा शिव यांसारख्या देवतांची भूमिका करणाऱ्या कलाकारांना प्रेक्षक प्रत्यक्ष देवतांप्रमाणे मान देत. ‌‘राम राज्य‌’ हा त्याचा ठळक नमुना ठरतो. या चित्रपटात प्रेम अदीब यांनी साकारलेला राम इतका प्रभावी ठरला की अनेकांनी त्यांना प्रत्यक्ष भगवान मानून त्यांच्या चरणांना स्पर्श केला. महात्मा गांधी यांनीही हा चित्रपट पाहिला होता, ही बाब त्या काळातील सामाजिक स्वीकार दर्शवते. मात्र, कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्यातील वादग्रस्त बाबी समोर आल्या की त्याचा थेट परिणाम त्यांच्या पडद्यावरील पवित्र प्रतिमेवर होत असे.
देवतेची भूमिका साकारणाऱ्या व्यक्तीमध्ये स्वतः कितपत ‌‘देवत्व‌’ असावे? हा प्रश्न पुढेही कायम राहिला. 1987 मध्ये रामायण या मालिकेच्या प्रसारणाने या भावनेला शिखर गाठले. अरुण गोविल यांनी साकारलेला राम इतका लोकप्रिय झाला की लोक त्यांना प्रत्यक्ष जीवनातही भगवान मानू लागले. या काळाने रामाच्या प्रतिमेबद्दल एक ठराविक चौकट निर्माण केलीत्यांचे रूप, वर्तन आणि व्यक्तिमत्त्व कसे असावे याची स्पष्ट अपेक्षा निर्माण झाली. त्यामुळे आज रणबीर कपूर यांना या भूमिकेत पाहताना तुलना होणे अपरिहार्य ठरते.
पौराणिक कथांच्या चित्रणासंबंधी वादांची परंपरा ‌‘राजा हरिश्चंद्र‌’ या भारतीय सिनेमाच्या पहिल्या चित्रपटापासूनच सुरू झाली. सत्यनिष्ठेच्या कथानकावर आधारित या चित्रपटावरही काही धार्मिक गटांनी आक्षेप घेतले होते. 1920-30 च्या दशकात ‌‘वीर रामायणम‌’सारख्या चित्रपटांनी महाकाव्यांचे नाट्यमय सादरीकरण केले, पण पारंपरिक विद्वानांनी त्याला विरोध केला. भक्त विदुर या चित्रपटावर तर ब्रिटिश सरकारने बंदी घातली, कारण त्यातील पात्र महात्मा गांधींच्या प्रतिमेशी साधर्म्य साधत होते.
स्वातंत्र्यपूर्व आणि त्यानंतरच्या काळातही पौराणिक चित्रपटांभोवती वाद कायम राहिले. ‌‘राम राज्य‌’मध्ये रामराज्याच्या संकल्पनेला राजकीय अर्थ दिल्याचा आरोप झाला. सीतेच्या त्यागासारख्या प्रसंगांवर सामाजिक पातळीवर मोठ्या चर्चा रंगल्या. या काळात सिनेमा आणि धार्मिक भावना यांच्यातील नातं अधिक संवेदनशील बनत गेले. पुढे दूरदर्शनच्या युगात रामानंद सागर यांच्या ‌‘रामायण‌’ने लोकप्रियतेचे सर्व विक्रम मोडले, पण त्यातही काही प्रसंगांवर प्रेक्षकांनी आक्षेप घेतले आणि दीर्घकाळ चर्चा सुरू राहिली.
अलीकडच्या काळात ‌‘आदि पुरुष‌’ या चित्रपटानेही हेच दाखवून दिले की तंत्रज्ञान आणि भव्यता असूनही भावनिक जोड तितकीच महत्त्वाची असते. या चित्रपटातील संवाद, दृश्यरचना आणि पात्रांची मांडणी यावर तीव्र टीका झाली. त्यामुळेच आता ‌‘रामायण‌’सारख्या नव्या प्रकल्पाकडे अधिक सावधपणे पाहिले जात आहे.
नितेश तिवारी यांच्या ‌‘रामायण‌’चा प्रस्तावित प्रचंड बजेट, अत्याधुनिक व्हिज्युअल इफेक्टस्‌‍, मोशन कॅप्चर आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर यामुळे हा प्रकल्प जागतिक पातळीवर स्पर्धा करू शकतो. या चित्रपटात साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत, सनी देओल हनुमानाच्या भूमिकेत आणि रवि दुबे लक्ष्मणाच्या भूमिकेत दिसणार आहेत. तरीही, प्रेक्षकांसाठी तांत्रिक भव्यतेपेक्षा भावनिक प्रामाणिकता अधिक महत्त्वाची राहते.
आजचा प्रेक्षक दोन प्रवाहांमध्ये विभागलेला दिसतो. एकीकडे पारंपरिक मूल्ये आणि धार्मिक भावनांना प्राधान्य देणारा वर्ग आहे, तर दुसरीकडे नव्या तंत्रज्ञानाचा आणि प्रयोगशीलतेचा स्वीकार करणारा वर्ग आहे. या दोन टोकांमध्ये संतुलन राखणे हेच या चित्रपटाच्या निर्मात्यांसाठी सर्वात मोठे आव्हान आहे. कारण प्रत्येक काळात पौराणिक कथांच्या सादरीकरणावरून वाद झाले, पण काळाच्या कसोटीवर टिकले तेच चित्रण प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिले.
रणबीर कपूर याच्या बाबतीतील वाद त्याच्या अभिनय क्षमतेपेक्षा त्यांच्या आधीच्या प्रतिमेशी अधिक जोडलेला आहे. रणबीरने अलीकडे ‌‘ॲनिमल‌’सारख्या चित्रपटात अतिशय आक्रमक, हिंसक आणि नैतिकदृष्ट्‌‍या गुंतागुंतीची भूमिका साकारली होती. त्या भूमिकेचा प्रभाव अजूनही प्रेक्षकांच्या मनात ताजा आहे. ‌‘मर्यादा पुरुषोत्तम‌’ राम हे संयम, शांतता आणि आदर्श यांचे प्रतीक मानले जातात. त्यामुळे या दोन टोकाच्या प्रतिमांमध्ये मोठा तफावत दिसतो आणि प्रेक्षकांना तो स्वीकारणे कठीण जाते.
दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे रणबीर यांच्या काही जुन्या विधानांचा. एका मुलाखतीत त्याने स्वतःला बीफ लव्हर म्हटंले होते. हा भाग सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल झाला. भारतात राम हे केवळ धार्मिक नव्हे तर सांस्कृतिक श्र्द्धेचे केंद्र असल्यामुळे, अशा विधानांना काही लोकांनी आक्षेप घेतला. त्यांना वाटते की रामाची भूमिका साकारणाऱ्या व्यक्तीचे वैयक्तिक आचरणही त्या प्रतिमेशी सुसंगत असावे.
आणखी एक मुद्दा म्हणजे चित्रपटाचा लुक आणि सादरीकरण. नितेश तिवारी यांच्या ‌‘रामायण‌’चा टीजर आणि त्यातील व्हिज्युअल स्टाइल पाहून काही लोकांना तो पुरेसा पारंपरिक वाटला नाही. सुनील लहरी (ज्यांनी जुन्या मालिकेत लक्ष्मणची भूमिका केली होती) यांनीही प्रतिक्रिया देत रणबीरमध्ये ‌‘रामाची निरागसता‌’ दिसत नाही असे मत व्यक्त केले. अशा प्रतिक्रिया वाद अधिक वाढवतात.
अर्थात, कलाकार विविध रूपांमध्ये स्वतःला घडवू शकतो, हीच अभिनयाची खरी ताकद असते. तसेच पडद्यावरील व्यक्तिरेखांकडे पाहताना कलाकाराने तिला किती न्याय दिला हे महत्त्वाचे असते. कलाकाराचे पडद्याबाहेरील आयुष्य, त्याचे व्यक्तिगत जीवन याकडे पाहणे हे कलेच्या तत्वात न बसणारे आहे.
शेवटी, ‌‘रामायण‌’ ही केवळ कथा नाही, तर भारतीय समाजाच्या भावविश्वाशी जोडलेली एक श्रद्धाळू परंपरा आहे. सिनेमा बदलत आहे, तंत्रज्ञान बदलत आहे, पण आस्थेचा, भक्तीचा, श्रद्धेचा गाभा तसाच आहे. त्यामुळेच प्रत्येक नव्या प्रयत्नासोबत वाद उद्भवतात आणि चर्चांना उधाण येते. कदाचित आज ज्या रणबीर कपूर यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे, तेच उद्या रामाच्या नव्या, आधुनिक आणि स्वीकारार्ह प्रतिमेचे प्रतीक ठरू शकते. काळच याचा अंतिम निर्णय घेणार आहे आणि कदाचित याच सतत चालणाऱ्या संवादात भारतीय सिनेमा आणि समाज यांचे नाते अधिक समृद्ध होत राहणार आहे.
याच पार्श्वभूमीवर एक महत्त्वाचा मुद्दा पुढे येतो तो म्हणजे पौराणिक कथांच्या आधुनिक पुनर्कथनाचा. आजच्या काळात केवळ पारंपरिक मांडणी करून प्रेक्षकांना गुंतवून ठेवणे कठीण झाले आहे. त्यामुळे दिग्दर्शक कथा सादर करताना काही प्रमाणात सर्जनशील स्वातंत्र्य घेतात. मात्र, हे स्वातंत्र्य आणि मूळ ग्रंथांप्रती असलेली निष्ठा यामध्ये संतुलन साधणे अत्यंत आवश्यक ठरते. जेव्हा या संतुलनाचा अभाव जाणवतो, तेव्हा वाद निर्माण होतात. कारण ‌‘रामायण‌’ ही केवळ कथा नसून अनेकांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू आहे. त्यामुळे प्रत्येक दृश्य, संवाद आणि पात्राची मांडणी अत्यंत संवेदनशीलतेने करावी लागते.
सध्याच्या सोशल मीडियाच्या युगात चित्रपटांवरुन निर्माण होणाऱ्या वादांची तीव्रता अधिक वाढलेली दिसते. पूर्वी एखाद्या चित्रपटावर टीका किंवा विरोध मर्यादित स्वरूपात होत असे, परंतु आज प्रत्येक छोटा तपशील काही क्षणांत व्हायरल होतो आणि व्यापक चर्चा निर्माण करतो. कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्यापासून ते त्यांच्या जुन्या विधानांपर्यंत सर्व गोष्टी नव्याने उकरून काढल्या जातात. त्यामुळे प्रेक्षकांचा दृष्टिकोन अधिक कठोर आणि तपशीलवार झाला आहे. या बदलत्या परिस्थितीत चित्रपट निर्मात्यांना केवळ कलात्मक नव्हे, तर सामाजिक आणि भावनिक जबाबदारीही अधिक सजगपणे पार पाडावी लागते.

Check Also

‌‘किरण अब्बावरम 15‌’ चे टीझर पोस्टर प्रदर्शित

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता किरण अब्बावरम याच्या आगामी भव्य पॅन-इंडिया चित्रपटाचे टीझर पोस्टर नुकतेच प्रदर्शित …