लेख-समिक्षण

युद्धविरामानंतरही हल्ले

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर होऊ शकणारे संभाव्य हल्ले आणि बॉम्बहल्ले सध्या दोन आठवड्यांंसाठी स्थगित करण्यात आले असल्याची घोषणा केली आहे. ट्रम्प यांनी स्पष्ट केले की, हा दोन्ही बाजूंनी लागू होणारा युद्धविराम (सीजफायर) असेल. म्हणजेच या कालावधीत ना अमेरिका हल्ला करेल, ना इराण कोणतीही आक्रमक कारवाई करेल. असले तरीही बुधवारी इराणच्या लवना बेटावरील तेल शुद्धीकरण प्रकल्पावर आणि इराणने कुवेतमध्ये क्षेपणास्त्र हल्ले केले. दुसऱ्या दिवशीही इराण व लेबनॉनच्या नागरी भागात हल्ले करण्यात आले.
ट्रम्प यांच्या मते अमेरिकेने आधीच आपली अनेक लष्करी उद्दिष्टे साध्य केली असून, आता इराणसोबत दीर्घकालीन शांतता करारासाठी वेगाने चर्चा सुरू आहे. त्यांनी सांगितले की इराणकडून 10 मुद्यांचा प्रस्ताव प्राप्त झाला असून, त्याला आधार मानले जात आहे. ट्रम्प यांनी दावा केला की, अमेरिका आणि इराण यांच्यातील जुन्या वादांपैकी बहुतांश मुद्यांवर सहमती झाली आहे. पुढील दोन आठवड्यांत अंतिम करार करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. सर्व काही नियोजनानुसार झाले, तर पश्चिम आशियातील दीर्घकाळ चालत आलेला तणाव कमी करण्याच्या दिशेने हा मोठा टप्पा ठरेल, असेही त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत स्पष्ट इशारा दिला होता की, इराणने लवकरात लवकर सामुद्रधुनी खुली केली नाही आणि करार मान्य केला नाही, तर त्याला गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल. मार्ग खुला न केल्यास अमेरिका इराणची ऊर्जा व्यवस्था आणि पायाभूत सुविधा पूर्णपणे नष्ट करू शकते, असेही त्यांनी म्हटले होते. सामुद्रधुनी खुली झाली नाही, तर इराणमधील वीज प्रकल्प आणि पूल हे लक्ष्यावर असतील, असे ट्रम्प यांनी म्हटले होते.
ट्रम्प यांनी यापूर्वी इराणला 48 तासांचा अल्टिमेटम दिला होता, मात्र नंतर ही मुदत अनेकदा वाढवण्यात आली. एका मुलाखतीत ट्रम्प यांनी सांगितले होते की, कराराची शक्यता अजूनही कायम आहे; पण चर्चा अपयशी ठरल्यास ते सर्व काही संपवतील, असा इशाराही त्यांनी दिला होता. तसेच, इराणमधील सामान्य नागरिक त्यांच्या सरकारवर नाराज असून अमेरिकेच्या कारवाईला पाठिंबा देऊ शकतात, असा दावादेखील ट्रम्प यांनी केला होता.
अमेरिकेसोबतची चर्चा पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे 10 एप्रिलपासून सुरू होणार असल्याची पुष्टी इराणने केली आहे. ही चर्चा दोन आठवडे चालणार असून गरज पडल्यास ती पुढे वाढवली जाऊ शकते. इराणने आपल्या नागरिकांना एकजूट राहण्याचे आवाहन करत या युद्धविरामाला संभाव्य ऐतिहासिक विजयाकडे टाकलेले एक पाऊल, असे म्हटले आहे.
अमेरिका आणि इराण यांच्यात युद्धविरामाची घोषणा झाल्यानंतर तणाव काहीसा कमी झाला असला, तरी धोका अद्याप टळलेला नाही. इराणने आपल्या सैन्याला गोळीबार थांबवण्याचे आदेश दिले आहेत, मात्र ही युद्धाची समाप्ती नसल्याचेही स्पष्ट केले आहे. शत्रूने कोणतीही चूक केली तर पूर्ण ताकदीने प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशाराही इराणने दिला आहे. इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांनी सर्व लष्करी युनिट्सना युद्धविरामाचे पालन करत गोळीबार थांबवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांनी सांगितले की, हा युद्धाचा शेवट नाही, परंतु सर्व सैन्यदलांनी आदेशांचे पालन करून गोळीबार थांबवावा. युद्धविरामाच्या घोषणेनंतर इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेनेही कठोर भूमिका मांडली. युद्धविराम म्हणजे युद्ध संपले असे नाही, असे परिषदेकडून स्पष्ट करण्यात आले.

Check Also

बस्तरची नवी पहाट: एका संघर्षाची यशोगाथा

‌‘बस्तर फायटर्स‌’: मातीतील सुपुत्रांचा लढा बस्तरचा 42 हजार चौरस किलोमीटरचा भूभाग केरळ राज्यापेक्षाही मोठा आहे. …