इंडक्शनवर अन्न शिजवावे का ?

भारतात सध्या एलपीजी सिलिंडरच्या तुटवड्यामुळे इंडक्शन कुकटॉपची मागणी प्रचंड वाढली आहे. मात्र, वीजेवर चालणाऱ्या या शेगडीबाबत लोकांच्या मनात अनेक शंका आणि अफवा आहेत. इंडक्शनवर शिजवलेले अन्न आरोग्यासाठी सुरक्षित आहे की धोकादायक, असा प्रश्न आजही अनेकांना पडतो. वास्तविक, शास्त्रीय दृष्टिकोनातून इंडक्शनवर स्वयंपाक करणे पूर्णपणे सुरक्षित मानले जाते. यामध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक ऊर्जेचा वापर केला जातो, जी थेट भांड्याला गरम करते. इंडक्शनमधून बाहेर पडणाऱ्या लहरी या ‌‘नॉन-आयनायझिंग‌’ असतात, ज्या मोबाईल फोन किंवा वाय-फाय लहरींसारख्याच सामान्यतः सुरक्षित मानल्या जातात. विशेष म्हणजे, या लहरी तेव्हाच सक्रिय होतात जेव्हा चुंबकीय भांडे इंडक्शन प्लेटच्या संपर्कात येते. अन्नाच्या आण्विक संरचनेवर किंवा पोषणावर याचा कोणताही घातक परिणाम होत नाही.
इंडक्शनवर स्वयंपाक केल्याने जीवनसत्त्वे आणि खनिजे नष्ट होतात, ही केवळ एक अफवा असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहेे. उलट, इंडक्शनवर अन्न गॅसच्या तुलनेत कमी वेळात शिजते. तापमानावर अचूक नियंत्रण ठेवता येत असल्याने अन्नातील आवश्यक पोषक घटक गॅस शेगडीच्या तुलनेत अधिक चांगल्या प्रकारे सुरक्षित राहू शकतात. कमी वेळ उष्णतेच्या संपर्कात आल्यामुळे अन्नाची चव आणि गुणवत्ता टिकून राहण्यास मदत होते.
योग्य भांड्यांची निवड आवश्यक
इंडक्शनचा सुरक्षित वापर करण्यासाठी योग्य भांडी वापरणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ज्या भांड्यांचा तळ चुंबकीय आहे (उदा. स्टेनलेस स्टील किंवा लोखंड), तीच भांडी यावर व्यवस्थित काम करतात. निकृष्ट दर्जाचे प्लास्टिक किंवा असुरक्षित कोटिंग असलेली भांडी वापरणे टाळावे, कारण उच्च तापमानाला ती हानिकारक रसायने सोडू शकतात.
थोडक्यात सांगायचे तर, इंडक्शन कुकिंग हे आधुनिक काळातील एक सुरक्षित, जलद आणि किफायतशीर साधन आहे. यामध्ये उघडी ज्योत नसल्यामुळे आगीचा किंवा गॅस गळतीचा धोका नसतो, ज्यामुळे ते स्वयंपाकघरासाठी अधिक सुरक्षित मानले जाते.

Check Also

पॉलिमर सायन्समधील करिअरसंधी

विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे आज अनेक पारंपरिक पदार्थांची जागा आधुनिक, हलके, टिकाऊ आणि विशिष्ट गुणधर्म …