हॉलिवूडमध्ये अनेक दशकांपासून मोठ्या बजेटच्या चित्रपटांचे सामर्थ्य व्हिज्युअल इफेक्ट्स अर्थात व्हीएफएक्स तंत्रज्ञान राहिले आहे. आता भारतीय चित्रपटसृष्टीही या क्षेत्रात वेगाने पुढे जात आहे. नितेश तिवारी यांच्या ‘रामायण’ चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर कलाकारांचा अभिनय, संवाद आणि व्यक्तिरेखांपेक्षा चित्रपटातील दृश्य परिणामांची चर्चा अधिक होत आहे. मात्र, व्हीएफएक्सच्या यशाची खरी कसोटी तंत्रज्ञानाचा वापर किती भव्य केला, ही नसून प्रेक्षकांना ते दृश्य चित्रपटाच्या कथाविश्वाचा नैसर्गिक भाग वाटते की नाही, ही आहे.- सोनम परब
एकेकाळी चित्रपटाची चर्चा त्यातील कलाकार, अभिनय, संगीत आणि कथानक यांभोवती केंद्रित असायची. पुढे चित्रपटांचा आवाका वाढला. भव्य नेपथ्य, परदेशातील चित्रीकरण, थरारक साहसदृश्ये आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान यांमुळे चित्रपटनिर्मितीचे स्वरूप बदलले. आता या बदलाच्या केंद्रस्थानी व्हिज्युअल इफेक्ट्स अर्थात व्हीएफएक्स तंत्रज्ञान आले आहे. चित्रपट दिग्दर्शकाच्या कल्पनाशक्तीला पडद्यावर जवळपास वास्तवाचे स्वरूप देण्याचे काम हे तंत्रज्ञान करते.
हॉलिवूडमध्ये अनेक दशकांपासून मोठ्या बजेटच्या चित्रपटांचे प्रमुख आकर्षण व्हीएफएक्स राहिले आहे. ‘ज्युरासिक पार्क’, ‘टर्मिनेटर’, ‘अवतार’ आणि ‘ॲव्हेंजर्स’ यांसारख्या चित्रपटांमधील दृश्ये पाहून भारतीय प्रेक्षक एकेकाळी थक्क होत असत. आता भारतीय चित्रपटसृष्टीही या क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत आहे. रणबीर कपूरची प्रमुख भूमिका असलेला आणि नितेश तिवारी यांनी दिग्दर्शित केलेला ‘रामायण’ हा चित्रपट या बदलाचे ताजे उदाहरण ठरला आहे. चित्रपटातील अभिनय, संवाद आणि व्यक्तिरेखांपेक्षा त्यातील दृश्य परिणामांची चर्चा अधिक होत असेल, तर त्यातून भारतीय चित्रपटसृष्टीतील तांत्रिक बदलांचे महत्त्व स्पष्ट होते. मात्र, या तंत्रज्ञानाचा वापर किती परिणामकारक झाला, याचे मूल्यमापन केवळ दृश्यांच्या भव्यतेवर करता येणार नाही.
भारतीय चित्रपटांमध्ये दृश्य परिणामांचा वापर अलीकडे सुरू झालेला नाही. दादासाहेब फाळके यांच्या 1919 मधील ‘कालियामर्दन’ या मूकपटात ट्रिक फोटोग्राफी आणि दृश्य परिणामांचे प्रयोग करण्यात आले होते. त्यानंतर ‘मायाबाजार’ आणि ‘पाताळभैरवी’ यांसारख्या चित्रपटांतही कल्पक दृश्यांची निर्मिती करण्यात आली. संगणकाधारित व्हीएफएक्स तंत्रज्ञान विकसित झाल्यानंतर दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीने सुरुवातीच्या प्रयोगांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली.
हिंदी चित्रपटसृष्टीत ‘प्यार तो होना ही था’ या चित्रपटाचा सुरुवातीच्या व्हीएफएक्स प्रयोगांमध्ये उल्लेख केला जातो. 2008 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘लव्ह स्टोरी 2050’ या चित्रपटात मोठ्या प्रमाणावर डिजिटल दृश्य परिणामांचा वापर करण्यात आला. त्यानंतर ‘रा.वन’, ‘क्रिश’, ‘बाहुबली’, ‘ब्रह्मास्त्र’ आणि ‘कल्की 2898 एडी’ यांसारख्या चित्रपटांनी भारतीय चित्रपटांचे दृश्यविश्व अधिक व्यापक केले. या प्रवासात तंत्रज्ञानाबरोबरच भारतीय निर्मात्यांची महत्त्वाकांक्षाही वाढली. पौराणिक कथा, काल्पनिक जग, भविष्यकालीन शहरे, भव्य युद्धे आणि अद्भुत व्यक्तिरेखा पडद्यावर साकारण्यासाठी आता परदेशी तंत्रज्ञानावर पूर्णपणे अवलंबून राहण्याची गरज उरलेली नाही. भारतीय तंत्रज्ञ आणि व्हीएफएक्स स्टुडिओही जागतिक दर्जाचे काम करण्याची क्षमता विकसित करत आहेत. चित्रपटाचे यश ठरवण्यामध्ये भविष्यात व्हीएफएक्सची गुणवत्ता निर्णायक ठरेल का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याचे उत्तर सरळ ‘नाही’ असेच आहे. व्हीएफएक्स चित्रपटाचे सादरीकरण अधिक आकर्षक करू शकते; मात्र ते उत्तम कथानक, अभिनय आणि दिग्दर्शनाची जागा घेऊ शकत नाही.
2008 मधील ‘लव्ह स्टोरी 2050’ हे त्याचे उदाहरण आहे. या चित्रपटात सुमारे 400 ते 500 व्हीएफएक्स दृश्यांचा वापर करण्यात आला होता. तांत्रिकदृष्ट्या मोठा प्रयोग करूनही चित्रपटाला अपेक्षित व्यावसायिक यश मिळाले नाही. याउलट ‘बाहुबली’च्या यशामागे केवळ भव्य दृश्ये नव्हती. त्यात प्रभावी कथानक, व्यक्तिरेखांमधील संघर्ष, नाट्यमय प्रसंग आणि प्रेक्षकांना गुंतवून ठेवणारी भावनिक मांडणी होती. व्हीएफएक्सने या कथेला भव्यता दिली; पण चित्रपटाला प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवून दिले ते त्याच्या कथेने.
व्हीएफएक्सच्या यशाची खरी कसोटी ही आहे की प्रेक्षकांनी त्याचा स्वतंत्रपणे विचार करू नये. समुद्र, पर्वत, युद्धभूमी किंवा काल्पनिक जीव पडद्यावर इतके सहजपणे साकारले गेले पाहिजेत की ते दृश्य चित्रपटाच्या जगाचा अविभाज्य भाग वाटावे. एखादे दृश्य कृत्रिम दिसू लागले आणि प्रेक्षकांचे लक्ष कथानकापेक्षा तांत्रिक त्रुटींकडे गेले, तर त्यासाठी खर्च केलेले कोट्यवधी रुपये अपेक्षित परिणाम साधू शकत नाहीत. ‘रामायण’च्या निमित्ताने सुरू झालेल्या चर्चेत अभिनेता सलमान खान यानेही महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला. चित्रपटाची चर्चा केवळ त्याचे बजेट आणि व्हीएफएक्स यांपुरती मर्यादित न राहता राम, रावण आणि सीता यांच्या कथेकडेही लक्ष केंद्रित झाले पाहिजे, असे त्याने म्हटले. ही टिप्पणी चित्रपटाच्या तांत्रिक भव्यतेबरोबरच त्याच्या आशयाचे महत्त्व अधोरेखित करणारी आहे.
येत्या काळात कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे व्हीएफएक्स क्षेत्रात आणखी मोठे बदल घडू शकतात. डिजिटल व्यक्तिरेखा, चेहऱ्यांचे पुनर्निर्माण, पार्श्वभूमी, काल्पनिक स्थळे आणि गुंतागुंतीची दृश्ये तयार करण्याची प्रक्रिया अधिक वेगवान होऊ शकते. व्हर्च्युअल प्रॉडक्शनसारख्या तंत्रज्ञानामुळे प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन चित्रीकरण करण्याऐवजी स्टुडिओमध्येच डिजिटल पार्श्वभूमी आणि संपूर्ण दृश्यविश्व उभे करणे शक्य झाले आहे. यामुळे भारतासमोर दोन महत्त्वाच्या संधी निर्माण होत आहेत. पहिली म्हणजे भारतीय चित्रपटांना जागतिक दर्जाचे तांत्रिक स्वरूप देऊन आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अधिक प्रभावीपणे उतरता येईल. दुसरी म्हणजे देशांतर्गत रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील. व्हीएफएक्स कलाकार, ॲनिमेशन तज्ज्ञ, थ्रीडी मॉडेलर, कॉम्पोझिटर, डिजिटल डिझायनर आणि तांत्रिक दिग्दर्शक यांची मागणी वाढू शकते. या क्षेत्रात प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करणे आणि भारतीय कंपन्यांना आंतरराष्ट्रीय प्रकल्प मिळवून देणेही महत्त्वाचे ठरणार आहे.
चित्रपटांचे भविष्य केवळ तंत्रज्ञानावर अवलंबून नाही. व्हीएफएक्समुळे चित्रपट निर्मात्यांना कल्पनाशक्तीला अधिक मोठा अवकाश मिळाला आहे. पूर्वी पटकथेच्या पानांवरच मर्यादित राहणारी अनेक दृश्ये आता पडद्यावर प्रत्यक्ष अनुभवता येतात. मात्र, प्रेक्षक चित्रपटातून बाहेर पडताना त्यातील डिजिटल दृश्यांची संख्या लक्षात ठेवत नाहीत. त्यांना आठवतात ती पात्रे, त्यांचा संघर्ष, संवाद आणि मनाला भिडणारी कथा.
‘रामायण’च्या निमित्ताने भारतीय चित्रपटसृष्टीसमोर हा महत्त्वाचा मुद्दा पुन्हा आला आहे. भारतीय चित्रपट निर्मात्यांना आता केवळ हॉलिवूडच्या तंत्रज्ञानाचा वापर करणारे उत्पादक म्हणून राहायचे नाही. स्वतःच्या कथा, सांस्कृतिक वारसा, कल्पकता आणि तांत्रिक कौशल्य यांच्या बळावर जागतिक चित्रपटसृष्टीत स्थान निर्माण करायचे आहे. त्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाची गरज आहेच; पण त्या तंत्रज्ञानाला योग्य दिशा देणारी सशक्त कथा आणि सक्षम दिग्दर्शनही आवश्यक आहे.
आगामी काळात व्हीएफएक्सचा प्रभाव निश्चितच वाढणार आहे. चित्रपटांचे दृश्यविश्व अधिक भव्य होईल, काल्पनिक जग अधिक वास्तववादी वाटेल. मात्र, प्रेक्षकांना चित्रपटगृहात खिळवून ठेवण्याचे सामर्थ्य शेवटी कथेकडेच राहणार आहे. तंत्रज्ञान चित्रपटाला डोळ्यांचे पारणे फेडणारे रूप देऊ शकते; मनात घर करण्याचे काम मात्र कथा आणि अभिनयच करतात.
Check Also
रजनीकांत यांच्या नावावर नवा विक्रम
सुपरस्टार रजनीकांत यांच्या ‘जेलर 2’ या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरील घोडदौड अजूनही सुरू आहे. रिलीजच्या तिसऱ्या …
पांचजन्य वृत्तपत्र