आपल्या कामगिरीची नोंद ठेवा!

नोकरीच्या सुरुवातीच्या काळात प्रत्येक जण उत्साहाने काम करतो. रोजची कामे पूर्ण करणे, वरिष्ठांच्या सूचना पाळणे, बैठका घेणे, ग्राहकांच्या समस्या सोडवणे आणि दिलेली उद्दिष्टे गाठणे, यामध्ये दिवस कसा संपतो, हेही समजत नाही. मात्र, काही वर्षांनंतर नोकरी बदलण्याची किंवा पदोन्नतीची वेळ येते, तेव्हा एक महत्त्वाचा प्रश्न समोर उभा राहतो. गेल्या काही वर्षांत आपण नेमके काय मिळवले? कंपनीसाठी कोणते महत्त्वाचे योगदान दिले? अनेकांकडे या प्रश्नांची ठोस उत्तरे नसतात. कारण त्यांनी आपल्या कामगिरीची कधी नोंदच ठेवलेली नसते.
अनुभव आणि कामगिरीतील फरक
एखाद्या कंपनीत 8 किंवा 10 वर्षेकाम केले म्हणजे आपण उत्तम कर्मचारी आहोत, असे अनेकांना वाटते. प्रत्यक्षात अनुभव आणि कामगिरी या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. नोकरीतील कालावधीपेक्षा त्या काळात केलेले उल्लेखनीय काम अधिक महत्त्वाचे ठरते. उदाहरणार्थ, एखाद्या कर्मचाऱ्याने कंपनीची विक्री वाढवली, उत्पादन खर्च कमी केला, नवीन ग्राहक मिळवले किंवा कामाची पद्धत अधिक कार्यक्षम बनवली असेल, तर त्या उपलब्धींना विशेष महत्त्व असते. नोकरीसाठी अर्ज करताना किंवा मुलाखतीत अशा कामगिरीचा उल्लेख केल्यास संबंधित उमेदवाराची व्यावसायिक क्षमता अधिक प्रभावीपणे समोर येते.
यशाची स्वतंत्र नोंदवही ठेवा
आपण केलेल्या प्रत्येक महत्त्वाच्या कामाची नोंद ठेवण्याची सवय लावून घ्यावी. त्यासाठी स्वतंत्र डायरी किंवा डिजिटल फाईल तयार करता येईल. एखादा प्रकल्प मुदतीपूर्वी पूर्ण केला, ग्राहकाची गुंतागुंतीची समस्या सोडवली, सहकाऱ्यांच्या मदतीने कठीण उद्दिष्ट गाठले किंवा कंपनीच्या कामकाजात सुधारणा घडवून आणली, तर त्याची तारीख आणि तपशील लिहून ठेवावेत. शक्य असल्यास त्या कामामुळे झालेल्या फायद्याची आकडेवारीही नोंदवावी. काही महिन्यांनी या नोंदींचा आढावा घेतल्यास स्वतःच्या प्रगतीचे स्पष्ट चित्र दिसू शकते.
स्वतःच्या क्षमतेला कमी लेखू नका : अनेक कर्मचारी आपली उल्लेखनीय कामगिरीही सहजपणे दुर्लक्षित करतात. ‌‘हे तर माझे रोजचे काम आहे,‌’ असे समजून ते स्वतःच्या यशाला महत्त्व देत नाहीत. मात्र, एखादी अवघड जबाबदारी यशस्वीपणे पार पाडणे किंवा संकटाच्या वेळी योग्य निर्णय घेणे, हीदेखील महत्त्वाची उपलब्धी असते. अशा प्रसंगांतून कर्मचाऱ्याचे कौशल्य, निर्णयक्षमता आणि नेतृत्वगुण दिसून येतात.
पदोन्नतीसाठी ठोस आधार
पदोन्नतीची मागणी करताना केवळ सेवाज्येष्ठतेचा आधार पुरेसा ठरत नाही. गेल्या काही वर्षांत संस्थेच्या प्रगतीसाठी आपण केलेले योगदान ठोस उदाहरणांसह मांडता आले पाहिजे. आपल्या उपलब्धींची व्यवस्थित नोंद असेल, तर वरिष्ठांसमोर कामगिरी प्रभावीपणे मांडता येते. नोकरी बदलताना बायोडाटा तयार करण्यासाठी आणि मुलाखतीची तयारी करण्यासाठीही या नोंदी उपयुक्त ठरतात.
करिअरमध्ये किती वर्षेकाम केले, यापेक्षा त्या वर्षांमध्ये आपल्या कामामुळे कोणता सकारात्मक बदल घडला, याला अधिक महत्त्व असते. त्यामुळे आजपासूनच आपल्या प्रत्येक महत्त्वाच्या उपलब्धीची नोंद ठेवण्याची सवय लावा. भविष्यातील एखाद्या मोठ्या संधीसाठी ती निर्णायक ठरू शकते.

Check Also

एमबीए की एमटेक?

पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढे काय, हा प्रश्न अनेक विद्यार्थ्यांसमोर उभा राहतो. विशेषतः अभियांत्रिकी किंवा …