बुद्धिबळातील भरारी

जागतिक बुद्धिबळाच्या पटावर भारताने गेल्या काही वर्षांत विलक्षण प्रगती केली आहे. एकेकाळी मोजक्या प्रतिभावान खेळाडूंपुरते मर्यादित असलेले भारतीय बुद्धिबळ आता जागतिक महासत्ता होण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. दिवाळीच्या दिवशी अनुज श्रीवात्री यांनी भारताचा 100 वा ग्रँडमास्टर होण्याचा मान मिळवला. बुद्धिबळाच्या इतिहासातील हा महत्त्वाचा टप्पा आहे. 100 ग्रँडमास्टर असलेला भारत जगातील चौथा देश ठरला आहे. रशिया, अमेरिका आणि जर्मनी हे तीनच देश या बाबतीत भारताच्या पुढे असून, जर्मनी आणि भारत यांच्यातील अंतर अवघ्या तीन ग्रँडमास्टरचे उरले आहे. भारतीय बुद्धिबळातील प्रतिभेची वाढती व्याप्ती आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सातत्यपूर्ण कामगिरीचे हे द्योतक आहे.
भारतीय बुद्धिबळाच्या प्रगतीचा वेग विशेष उल्लेखनीय आहे. देशाला पहिले 10 ग्रँडमास्टर घडवण्यासाठी 15 वर्षेलागली होती. मात्र, अलीकडील 10 ग्रँडमास्टर अवघ्या एका वर्षात तयार झाले आहेत. 2025 पासून 2026 मधील आतापर्यंतच्या काळात 15 भारतीय खेळाडूंनी ग्रँडमास्टरचा दर्जा मिळवला आहे. ही आकडेवारी देशातील बुद्धिबळ प्रशिक्षणाचा विस्तार आणि नव्या पिढीची गुणवत्ता स्पष्ट करते.
या यशाचा पाया विश्वनाथन आनंद यांनी घातला. 1988 मध्ये भारताचे पहिले ग्रँडमास्टर होण्याचा बहुमान त्यांनी मिळवला. त्यानंतर जागतिक विजेतेपद पटकावून त्यांनी भारतीय खेळाडूंसमोर नवे क्षितिज खुले केले. आंतरराष्ट्रीय बुद्धिबळात सर्वोच्च स्थान मिळवणे भारतीयांनाही शक्य आहे, हा आत्मविश्वास आनंद यांनी निर्माण केला. त्यांच्या यशाने प्रेरित झालेल्या पिढ्यांनी आता भारतीय बुद्धिबळाला व्यापक स्वरूप दिले आहे. पूर्वी एखाद्या भारतीय खेळाडूचे जागतिक यश अपवादात्मक मानले जात असे. आज मात्र अनेक भारतीय खेळाडू सर्वोच्च स्तरावर सातत्याने आव्हान उभे करीत आहेत.
या प्रगतीला कोरोना महामारीच्या काळात अनपेक्षित चालना मिळाली. टाळेबंदीमुळे मैदानी खेळ आणि प्रत्यक्ष स्पर्धांवर मर्यादा आल्या असताना ऑनलाइन बुद्धिबळाची लोकप्रियता झपाट्याने वाढली. लाखो मुले आणि तरुणांनी घरबसल्या बुद्धिबळ शिकण्यास सुरुवात केली. डिजिटल माध्यमांमुळे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळाडूंचे डाव अभ्यासणे, विविध प्रतिस्पर्ध्यांशी खेळणे आणि स्वतःच्या चुका सुधारण्याच्या संधी उपलब्ध झाल्या. भारतीय बुद्धिबळ महासंघ आणि खासगी प्रशिक्षण संस्थांनी ऑनलाइन मार्गदर्शन व आभासी स्पर्धांना प्रोत्साहन दिले. त्यामुळे नव्या प्रतिभेला व्यासपीठ मिळाले.
या प्रयत्नांचे परिणाम आता आंतरराष्ट्रीय स्तरावर दिसत आहेत. 2019 नंतर 35 भारतीय खेळाडूंनी ग्रँडमास्टरचा दर्जा मिळवला आहे. डी. गुकेश यांनी जागतिक विजेतेपद पटकावले, तर 2024 मधील बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये भारताने सुवर्णपदक जिंकले. जागतिक बुद्धिबळातील प्रस्थापित देशांना भारताने दिलेले हे प्रभावी उत्तर आहे.
आगामी काळात या यशाचे सातत्य टिकवणे महत्त्वाचे आहे. प्रतिभावान खेळाडूंना दर्जेदार प्रशिक्षण, आंतरराष्ट्रीय स्पर्धांचा अनुभव आणि आर्थिक पाठबळ मिळणे आवश्यक आहे. विशेषतः महानगरांबाहेरील गुणवत्तेला संधी मिळाल्यास भारतीय बुद्धिबळाचा पाया अधिक मजबूत होईल. विश्वनाथन आनंद यांनी सुरू केलेला प्रवास आता शेकडो तरुणांच्या कर्तृत्वातून पुढे जात आहे. बुद्धिबळातील भारताची वाढती ताकद ही दीर्घकालीन प्रशिक्षण, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि नव्या पिढीच्या आत्मविश्वासाची फलश्रुती आहे. — नितीन कुलकर्णी

Check Also

वलयांकितांना हवे जबाबदारीचे भान

लोकप्रियतेच्या वलयात वावरणाऱ्या रुपेरी पडद्यावरील कलाकारांचे प्रत्येक पाऊल, त्यांचे शब्द आणि पडद्याबाहेरील वागणे समाजमनावर, विशेषतः …