लहानपणापासूनच आकाशात झेपावणारी विमाने पाहून अनेकांच्या मनात वैमानिक (पायलट) बनण्याचे स्वप्न अंकुरते. आजच्या काळात हे स्वप्न केवळ एक आवड न राहता एक अत्यंत प्रतिष्ठित, थरारक आणि भरघोस उत्पन्न मिळवून देणारा करिअरचा मार्ग बनला आहे. भारतातील विमान वाहतूक क्षेत्र आज अत्यंत वेगाने विस्तारत असून नवीन विमानतळ, विविध विमान कंपन्यांची वाढती विमाने आणि प्रादेशिक जोडणी यामुळे प्रशिक्षित वैमानिकांची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.
भारतात वैमानिक होण्यासाठीची प्रक्रिया अत्यंत पद्धतशीर आणि शिस्तबद्ध असते. या संपूर्ण क्षेत्रावर नागरी विमान वाहतूक महासंचालनालय अर्थात ‘डीजीसीए’चे पूर्ण नियंत्रण असते. वैमानिक बनण्याच्या प्रवासातील पहिली पायरी म्हणजे शैक्षणिक पात्रता. उमेदवाराने मान्यताप्राप्त मंडळातून भौतिकशास्त्र (फिजिक्स) आणि गणित (मॅथेमॅटिक्स) या विषयांसह बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. जर कोणी कला किंवा वाणिज्य शाखेतून बारावी केली असेल, तर ते ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग’द्वारे (एनआयओएस) या विषयांची परीक्षा देऊन पात्र ठरू शकतात.
वयोमर्यादेचा विचार केल्यास, स्टुडंट पायलट लायसन्ससाठी किमान वय सोळा वर्षे, प्रायव्हेट पायलट लायसन्ससाठी सतरा वर्षेआणि व्यावसायिक वैमानिक परवान्यासाठी (कमर्शियल पायलट लायसन्स – सीपीएल) किमान अठरा वर्षेपूर्ण असणे आवश्यक आहे. यासोबतच शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त असणे अत्यंत गरजेचे असते. यासाठी ‘डीजीसीए’ने ठरवून दिलेल्या वैद्यकीय तपासण्या (क्लास 2 आणि क्लास 1 मेडिकल) पूर्ण कराव्या लागतात. डोळ्यांना चष्मा असणारे उमेदवारही नियमांनुसार पात्र ठरू शकतात.
भारतात ‘डीजीसीए’ची मान्यता असलेल्या अनेक नामांकित उड्डाण संस्था (फ्लाइंग स्कूल्स) आहेत. महाराष्ट्रातील ‘नॅशनल फ्लाइंग ट्रेनिंग इन्स्टिट्यूट’ (एनएफटीआय), ‘अकादमी ऑफ कार्व्हर एव्हिएशन’, मध्य प्रदेशातील ‘चाईम्स एव्हिएशन’ आणि ‘रेडबर्ड फ्लाईट ट्रेनिंग अकादमी’ यांसारख्या संस्था दर्जेदार प्रशिक्षण देतात. याशिवाय थेट विमान कंपन्यांद्वारे चालवल्या जाणाऱ्या ‘कॅडेट पायलट प्रोग्राम’चा मार्गही निवडून थेट एअरलाईन्समध्ये प्रवेश मिळवता येतो.
वैमानिक होण्यासाठीचे प्रशिक्षण हे बऱ्याच अंशी खर्चिक असते. सामान्यतः जमिनीवरील अभ्यासक्रम (ग्राउंड स्कूल), उड्डाणाचे तास, मल्टि-इंजिन रेटिंग आणि टाईप रेटिंग या सर्वांचा मिळून 45 लाख ते 90 लाख रुपयांपर्यंत खर्च येऊ शकतो. यासाठी अनेक बँका शिक्षण कर्ज उपलब्ध करून देतात. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर एअर इंडिया, इंडिगो, आकासा एअर, स्पाइसजेट आणि एअर इंडिया एक्सप्रेस यांसारख्या आघाडीच्या विमान कंपन्यांमध्ये रोजगाराच्या उत्तम संधी उपलब्ध होतात. केवळ प्रवासी वाहतूकच नाही, तर कार्गोविमाने, कॉर्पोरेट जेट्स, हेलिकॉप्टर ऑपरेशन्स आणि उड्डाण शिक्षक (फ्लाइट इन्स्ट्रक्टर) म्हणूनही उत्तम करिअर करता येते. योग्य नियोजन, कठोर परिश्र्म आणि सतत शिकण्याची वृत्ती असल्यास आकाशात भरारी घेण्याचे हे स्वप्न नक्कीच साकार होऊ शकते.
Check Also
वाय-फायसाठी क्युआर कोड
आपल्या घरी पाहुणे आल्यावर ते वारंवार आपल्या घरगुती वाय-फायचा पासवर्ड विचारतात आणि तो लांब व …
पांचजन्य वृत्तपत्र