प्रेमात पडला आहात?

कधी एखादी व्यक्ती सतत आपल्या विचारांत असते? ती दिसली की चेहऱ्यावर नकळत हसू उमटते, तिच्याशी बोलताना शब्द अडखळतात आणि तिच्या आसपास राहण्याची कारणं आपणच शोधू लागतो? जर या प्रश्नांची उत्तरं ‌‘हो‌’ असतील, तर कदाचित तुम्हाला त्या व्यक्तीविषयी आकर्षण वाटत असावं. तरुण वयात अशी भावना निर्माण होणं अगदी स्वाभाविक आहे.
एखाद्या व्यक्तीविषयी आकर्षण निर्माण झालं की तिच्याबद्दल वारंवार विचार होऊ लागतो. शाळा, महाविद्यालय, व्यायामाची वेळ, फिरायला जाण्याची वेळ किंवा मित्रांसोबतचे कार्यक्रमनकळत आपण त्या व्यक्तीच्या आसपास राहण्याची संधी शोधू लागतो. तिच्याशी झालेल्या छोट्याशा संवादाचाही आपण पुन्हा पुन्हा विचार करतो. तिचा संदेश आला, सोशल मीडियावर काही प्रतिक्रिया मिळाली किंवा अचानक भेट झाली तरी दिवसाचा मूड बदलून जातो.
मनातील या भावनेचा परिणाम शरीरावरही दिसतो. आवडती व्यक्ती समोर आली की हृदयाची धडधड वाढणे, हातांना घाम येणे, चेहरा लाल होणे, डोळ्यांत चमक येणे किंवा विनाकारण हसू येणे असे अनुभव येऊ शकतात. काही जण तर त्या व्यक्तीसमोर काय बोलायचं हेच विसरतात! या सगळ्या प्रतिक्रिया आकर्षणाच्या भावनेशी संबंधित असू शकतात.
एखाद्यावर आकर्षण वाटतंय म्हणजे लगेच त्याला ‌‘प्रेम‌’ म्हणण्याची गरज नाही. कधी एखाद्या व्यक्तीचा आत्मविश्वास, स्वभाव, विचार करण्याची पद्धत, हुशारी किंवा इतरांशी वागण्याची पद्धत आपल्याला भावते. त्यातून मैत्रीची इच्छा निर्माण होऊ शकते. कधी हे आकर्षण पुढे प्रेमात बदलू शकतं; तर कधी काही काळाने ते सहज कमीही होऊ शकतं. आकर्षण वाटणं चुकीचं नाही; पण त्या भावनेत वाहून जाणं टाळणं महत्त्वाचं आहे. अभ्यास, छंद, मित्र-मैत्रिणी आणि स्वतःच्या ध्येयांकडे दुर्लक्ष करू नका. समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही आदर करा. आपल्याला आवडणारी व्यक्ती आपल्याबद्दल तसंच विचार करेलच असं नाही, हे स्वीकारण्याची तयारी असावी.
शेवटी, कोणावर तरी मन जडणं हा तारुण्यातील सुंदर अनुभव असू शकतो. त्याकडे उत्सुकतेने पाहा, पण स्वतःला विसरून नाही. भावना समजून घेणं आणि त्यांना योग्य दिशा देणं हेच खऱ्या अर्थाने मोठं होण्याचं लक्षण आहे.

Check Also

पॉलिमर सायन्समधील करिअरसंधी

विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे आज अनेक पारंपरिक पदार्थांची जागा आधुनिक, हलके, टिकाऊ आणि विशिष्ट गुणधर्म …