सूरज बडजात्या यांच्या आगामी ‘ये प्रेम मोल लिया’ या चित्रपटात आयुष्मान आणि शरवरी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सूरज बडजात्या कलाकारांच्या झोपेला आणि आरोग्याला किती महत्त्व द्यायचे, याचा अनुभव दोघांनीही एका मुलाखतीत सांगितला आहे.
अलीकडेच ‘द हॉलीवूड रिपोर्टर इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत आयुष्मान खुरानाने सूरज बडजात्या यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव सांगितला. तो म्हणाला की, सूरज बडजात्या यांच्या सेटवर काम करणं हा एक वेगळाच अनुभव आहे. ते कलाकारांना सर्वाधिक महत्त्व देतात. वयाच्या 61 व्या वर्षीही ते एक आदर्श दिग्दर्शक असल्याचं आयुष्मानने म्हटलं. सूरज बडजात्या यांच्याकडे खूप ज्ञान आहे. ते नेहमी काहीतरी नवीन शिकण्यास उत्सुक असतात. त्यांच्यात कमालीचा नम्रपणा आहे, असंही आयुष्मानने सांगितलं.
पुढे शूटिंगच्या वेळेबद्दल बोलताना तो म्हणाला, त्यांच्या सेटवर कधीही दिवसाला आठ ते दहा तासांपेक्षा जास्त शूटिंग झालं नाही. ते कलाकारांच्या झोपेला प्राधान्य द्यायचे. इतकंच नाही, तर ते आम्हाला घरी जाऊन आठ तास झोपण्यास सांगायचे. कलाकारांनी पुरेशी झोप घेतली पाहिजे आणि ते चांगले दिसले पाहिजेत, याची त्यांना काळजी होती.
अभिनेत्री शरवरीनेही सूरज बडजात्या यांच्या काम करण्याच्या पद्धतीचं कौतुक केलं. त्यांच्या सेटवर कलाकारांसोबतच प्रत्येक कर्मचाऱ्याची काळजी घेतली जाते, असं तिने सांगितलं. शरवरी म्हणाली की, सूरज बडजात्या यांनी सुरुवातीलाच आम्हाला किमान आठ तासांची झोप घेणं आवश्यक असल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यांच्या चित्रपटाच्या सेटवर मोठी टीम असते. अनेक कलाकार, लाइटमन, सहाय्यक दिग्दर्शक आणि इतर कर्मचारी मिळून काम करत असतात. एवढ्या मोठ्या टीमचं व्यवस्थापन करतानाही ते प्रत्येक व्यक्तीचा आदर करतात. त्यांच्या कामात शिस्त, आदर आणि प्रेम या गोष्टी प्रकर्षाने जाणवतात. ते केवळ कलाकारांचाच नाही, तर सेटवर काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा विचार करतात, असं शरवरीने सांगितलं.- राधिका बिवलकर
Check Also
रजनीकांत यांच्या नावावर नवा विक्रम
सुपरस्टार रजनीकांत यांच्या ‘जेलर 2’ या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरील घोडदौड अजूनही सुरू आहे. रिलीजच्या तिसऱ्या …
पांचजन्य वृत्तपत्र