जिद्दीच्या बळावर आदर्शची भरारी

बिहारच्या चंपारणमधील एका अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलेल्या आदर्श कुमारने आपल्या जिद्दीच्या आणि कर्तृत्वाच्या बळावर आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःची ओळख निर्माण केली आहे. ज्या वयात मुलांनी खेळायचे, बागडायचे, त्या वयात आदर्शला परिस्थितीने जबाबदारीची जाणीव करून दिली. आयआयटीमध्ये शिक्षण घेण्याचे त्याचे स्वप्न होते. मात्र, शिकवणी वर्गाचे भरमसाट शुल्क परवडत नसल्याने त्याच्यासमोर अनेक अडचणी होत्या. तरीही खचून न जाता त्याने यशाचा स्वतःचा मार्ग शोधला.
आदर्शच्या आईने एकटीनेच कुटुंबाची जबाबदारी सांभाळली. घरखर्च आणि मुलाच्या शिक्षणासाठी तिने लोकांच्या घरांमध्ये साफसफाईची कामे केली. प्रतिकूल परिस्थितीतही आदर्शने आपल्यातील प्रतिभा जपली. वयाच्या अवघ्या 13 व्या वर्षी शिक्षण, आरोग्य आणि पर्यावरणाशी संबंधित प्रश्नांवर काम करणाऱ्या एका सामाजिक उपक्रमाच्या स्थापनेत त्याने पुढाकार घेतला. मुलाची हुशारी पाहून आईने आयुष्यभराची जमापुंजी खर्च करून त्याला लॅपटॉप घेऊन दिला. पुढे हाच लॅपटॉप त्याच्या प्रगतीचे महत्त्वाचे साधन ठरला.
वयाच्या 14 व्या वर्षी खिशात अवघे एक हजार रुपये घेऊन आदर्शने घर सोडले. अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेच्या तयारीसाठी त्याने राजस्थानमधील कोटा गाठले. मात्र, शिकवणी वर्गांचे शुल्क परवडत नसल्याने त्याला कुठेही प्रवेश मिळाला नाही. अशा परिस्थितीत त्याने सार्वजनिक ग्रंथालये आणि मोफत इंटरनेट सुविधेचा आधार घेतला. इंटरनेटच्या माध्यमातून विविध क्षेत्रांतील मार्गदर्शकांशी संपर्क साधला. व्यावसायिक प्रशिक्षणाच्या संधी शोधल्या आणि उद्योजकतेचे बारकावे आत्मसात केले.
आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणाच्या संधी मर्यादित झाल्या असल्या, तरी आदर्शने ज्ञान मिळवण्याचे प्रयत्न थांबवले नाहीत. उपलब्ध साधनांचा पुरेपूर वापर करून त्याने स्वतःची वाट निर्माण केली. त्याच्या कर्तृत्वाची दखल ब्रिटनमध्येही घेण्यात आली. तेथील एका प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित होणारा तो पहिला भारतीय ठरला. घरोघरी साफसफाईची कामे करणाऱ्या आईच्या कष्टांचे त्याने चीज केले. आर्थिक अभावामुळे निराश होणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांसाठी आज त्याचा संघर्ष प्रेरणादायी ठरत आहे.

Check Also

साठ लाख वर्षापूर्वीचा बर्फाचा तुकडा

अटार्क्टिका खंडातून शास्त्रज्ञांनी 60 लाख वर्षांपूर्वीचा बर्फाचा एक तुकडा बाहेर काढला आहे. हा बर्फ थेट …