गुन्हेगारीचा थरार

अभिनेता टायगर श्रॉफवर अलीकडेच तो कारमध्ये असताना गोळ्या झाडल्या गेल्या. सुदैवाने टायगर थोडक्यात बचावला, पण त्याचा ड्रायव्हर आणि एक रिक्षाचालक जखमी झाले. मुंबई पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत अवघ्या काही तासांतच राजस्थानच्या कोटा स्थानकावरून तीन संशयितांना जेरबंद केले.
देशातील अथवा अन्य कुठल्याही पारंपरिक गुन्हेगारीचा इतिहास पाहिला तर गुन्हेगार गुन्हा केल्यानंतर लपून राहतात, जेणेकरून पोलिसांच्या हाती पुरावे लागणार नाहीत. पण आजच्या आधुनिक संघटित गुन्हेगारीचा पॅटर्न पूर्णपणे बदलला आहे. आता गुन्हा लपवण्यात नाही, तर त्याची ढोलकी वाजवण्यात भूषण वाटते. गँगस्टर म्हणवणाऱ्या लोकांनी हा नवा पायंडा पाडला आहे. टायगर श्र्ॉफवरील हल्ल्‌‍यानंतर काही वेळातच सोशल मीडियावर एक स्क्रीनशॉट झळकला. हा गोळीबार लॉरेन्स बिश्नोई गँगने केला असल्याचा दावा त्यात करण्यात आला. यापाठोपाठ अमेरिकेतून अनिल पंडित नावाचा गँगस्टर ऑडिओ क्लिप जारी करून बॉलीवूडला म्हणजे हिंदी चित्रपटसृष्टीला धमकावतो. ऑक्टोबर 2024 मधील राजकीय नेते बाबा सिद्दीकी यांची हत्या असो, फेब्रुवारी 2026 मधील निर्माता, दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या घराबाहेरील गोळीबार असो किंवा आता टायगर श्र्ॉफ प्रकरणातील हल्ले असोत; प्रत्येक घटनेनंतर हाच खेळ पाहायला मिळतो. तो आता एक ट्रेंड झाला आहे. याचा मुख्य उद्देश एखाद्या व्यक्तीची हत्या करणे हा तर असतोच, पण त्यासोबतच सिनेसृष्टीत आणि व्यावसायिक वर्तुळात दहशतीचा एक मोठा ब्रँड तयार करणे हाही असतो.
सेलिब्रिटींवर हल्ले झाले की प्रसारमाध्यमांमध्ये त्याला मोठी जागा मिळते, इलेक्ट्रॉनिक माध्यमातून त्यावर मोठ्या आवाजात चर्चा झडतात. अनेक तज्ज्ञांना बोलावले जाते आणि ते आपली मते जोरकसपणे मांडतात आणि हीच फुकटची प्रसिद्धी या टोळ्यांचे बळ म्हणजे दहशत वाढवते, जी पुढे खंडणीच्या वसुलीसाठी त्यांना फायदेशीर ठरते.
प्रत्यक्ष गोळीबार करणारे केवळ प्यादे असतात. त्यांना तुरूंगात अथवा परदेशात असणाऱ्या त्यांच्या गँगस्टर म्होरक्याचे आकर्षण म्हणा किंवा फुटकळ पैशांसाठी हे शूटर आपल्या स्वतःच्याच आयुष्याशी खेळत ते बरबाद करून घेतात. टायगरच्या आणि त्याच्या अगोदर रोहित शेट्टी प्रकरणाच्या तपासातही हेच समोर आले होते. अशा गँगस्टर भक्त शूटर्सची संख्या काही हजारांच्या घरात आहे व त्यांचा कोणताही रेकॉर्ड पोलीस दप्तरी नाही असे म्हटले जाते. हे अत्यंत गंभीर आहे. गुन्हेगार किंवा गुन्हेगारी जगतात प्रवेश करू पाहणारे हे तरूण पूर्णत: भरकटलेले आणि दिशाहिन झाले आहेत, मात्र त्यांना हुडकून काढणेच सगळ्यांत कठीण आहे. केवळ शूटर पकडून हा प्रश्न सुटणार नाही. जोपर्यंत या गुन्हेगारीच्या मुळाशी असणारे सोशल मीडियाचे समर्थन आणि दहशतीचा बाजार नष्ट केला जात नाही, तोपर्यंत मुंबईत असे थरारनाट्य घडतच राहतील.- नरेंद्र क्षीरसागर

Check Also

अपरिहार्य ‌‘कपात ‌’

महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या एका निर्णयाप्रमाणे येत्या 16 ऑक्टोबरपासून राज्यात सर्वत्र दहा टक्के पाणीकपात केली जाणार …