पंढरपूरसारख्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा लाभलेल्या गावातून सुरू झालेला तबलावादक अविनाश पाटील यांचा संगीताचा प्रवास आज आंतरराष्ट्रीय व्यासपीठापर्यंत पोहोचला आहे. वयाच्या अवघ्या काही वर्षांपासून सुरू झालेली त्यांची ही साधना आणि त्यानंतरचा खडतर संघर्ष हा आजच्या युवा कलाकारांसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरत आहे.
अविनाश पाटील यांना तबला वादनाचा वारसा घरातूनच मिळाला. त्यांचे वडील पंडित प्रमोद पाटील यांच्याकडून त्यांनी बालपणातच संगीताचे प्राथमिक धडे गिरवले. पंढरपूरमध्येच पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर या कलासक्त तरुणाने संगीतातच आपले भवितव्य घडवण्याचा दृढ निश्चय केला. संगीताची उच्च तालीम घेण्यासाठी त्यांनी कला आणि संस्कृतीची राजधानी असलेल्या पुण्याची वाट धरली. पुण्यात आल्यानंतर ललित कला केंद्रातून त्यांनी तबला वादनात एम.ए. पदवी प्राप्त केली. या परीक्षेत त्यांनी अथांग परिश्र्मांच्या जोरावर सुवर्णपदक पटकावले.
पुण्यातील हा सुरुवातीचा प्रवास अत्यंत खडतर आणि आव्हानात्मक होता. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने शहरात राहणे आणि दैनंदिन खर्च भागवणे कठीण जात होते. या संघर्षाच्या काळात आळंदी येथील रामकृष्ण आध्यात्मिक संस्थेने त्यांना मोलाचा आधार दिला. संस्थेतील विद्यार्थ्यांना तबला शिकवण्याच्या बदल्यात त्यांच्या राहण्याची आणि भोजनाची सोय झाली. या काळात त्यांनी पंडित उमेश मोघे यांच्याकडून तबल्याची अत्यंत पद्धतशीर तालीम घेतली. दिवसभर नोकरी, विद्यार्थ्यांचे वर्ग आणि रात्रीची साधना असा दिनक्रम सांभाळत त्यांनी स्वतःचे नाव सिद्ध केले.
गेल्या 20 वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभरातील विविध प्रमुख शहरांमध्ये आपल्या लयबद्ध वादनाची मोहिनी पसरवली आहे. भारताच्या सीमा ओलांडून अमेरिका, युरोप आणि आशियातील अनेक देशांमध्ये त्यांनी भारतीय शास्त्रीय संगीताचा ध्वज फडकावला आहे. त्यांच्या या अलौकिक कलासाधनेची दखल घेत त्यांना उस्ताद इनाम अली खान पुरस्कार, उस्ताद अमीर खान पुरस्कार, कला गौरव, कला उपासक आणि पुणे गौरव अशा अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. आज जगभरातील अनेक देशांतील विद्यार्थी त्यांच्याकडून तबल्याचे धडे ऑनलाईन आणि प्रत्यक्ष स्वरूपात घेत आहेत. पंढरपूरच्या गल्लीबोळातून सुरू झालेली ही सुरेल सफर अविनाश पाटील यांच्या अखंड मेहनत, निष्ठा आणि जिद्दीच्या बळावर आज जागतिक स्तरावर लखलखत आहे.
Check Also
सर्वात खोलवरची भुयारी रेल्वे
जमिनीवर वेगाने धावणाऱ्या ट्रेन तुम्ही पाहिल्या असतील, हवेत लटकलेल्या पुलावरून जाणाऱ्या ट्रेनही पाहिल्या असतील. समुद्रावरून …
पांचजन्य वृत्तपत्र