लेख-समिक्षण

विद्यार्थ्यांमधील तणावाचे आव्हान

देशातील विविध विद्यापीठे किंवा मोठ्या शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनात कधी ना कधी आत्महत्येचे विचार येतात आणि त्यांना सातत्याने मानसिक तणावही जाणवत असतो, अशा प्रकारचा निष्कर्ष एका महत्त्वाच्या समितीने काढला आहे, जो निश्चित धक्कादायक आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे स्थापन करण्यात आलेल्या एका उच्चस्तरीय समितीने आपला जो अहवाल सादर केला आहे, त्यातील निष्कर्षाप्रमाणे 9 टक्के विद्यार्थ्यांच्या मनात कधी ना कधी आत्महत्येचे विचार येतात, तर 15 टक्के विद्यार्थ्यांना कायमस्वरूपी तणाव जाणवतो. आयआयटी दिल्ली व आयआयटी मुंबईमध्ये दोन विद्यार्थ्यांनी नुकत्याच केलेल्या आत्महत्यांच्या पार्श्वभूमीवर या सर्वेक्षणाचे निष्कर्ष निश्चितच महत्त्वाचे मानावे लागतील. उच्च शिक्षण संस्थामधील विद्यार्थ्यांना खोलवर रुजलेला सामाजिक भेदभाव, वैद्यकीय, अभियांत्रिकी महाविद्यालयातील लैंगिक अत्याचार, लिंग भेदभाव, नैतिक पोलीसगिरी अशा अनेक गोष्टींशी सामना करावा लागतो, अशी माहिती या समितीने आपल्या अंतरिम अहवालात दिली होती. आता या समितीने अंतिम अहवालात जे निष्कर्ष काढले आहेत ते प्रातिनिधिक समजू नयेत असे जरी म्हटले असले, तरी त्यानिमित्ताने विद्यार्थ्यांची मानसिकता समोर येत आहे, हे विसरून चालणार नाही. सुमारे अडीच लाख विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करून हे निष्कर्ष काढण्यात आले आहेत. त्यापैकी 34 टक्के विद्यार्थ्यांना आपण ज्या संस्थेमध्ये शिक्षण घेत आहोत त्या संस्थेमध्ये परकेपणाची भावना जाणवते, असेही लक्षात आले आहे. शिक्षणसंस्थेमध्ये कोणतीही समुपदेशन सेवा उपलब्ध नसल्याचे 32 टक्के विद्यार्थ्यांनी सांगितले आहे. एकूणच विद्यमान भारतीय राजकारणामध्ये जेन झी हा विषय प्राधान्याने चर्चेत असताना या पिढीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हिताकडे दुर्लक्ष होत असल्याचे सर्वेक्षणावरून सिद्ध होते.
एकीकडे शिक्षणाच्या माध्यमातून कोणत्याही व्यक्तीला योग्य ज्ञान देऊन त्याचे विचार निर्मळ आणि सखोल होण्याची अपेक्षा व्यक्त होत असतानाच जर या शिक्षण संस्थांमधील वातावरणामुळेच विद्यार्थ्यांच्या मनात आत्महत्येचे विचार येत असतील किंवा ते सातत्याने मानसिक तणावाखाली राहात असतील तर कुठेतरी मूलभूत चूक होत आहे, हेसुद्धा लक्षात घ्यावे लागेल. ज्या भारतीय संस्कृतीमध्ये तक्षशिला किंवा नालंदा यासारख्या सुसंस्कृत विद्यापीठांची परंपरा आहे किंवा गुरूकुल परंपरा आहे, त्याच भारतामध्ये सध्या शिक्षणाकडे अक्षम्य असे दुर्लक्ष होत आहे हा विरोधाभास लक्षात घेण्यासारखा आहे. – आशिष जोशी

Check Also

ट्रम्पना दणका, भारताला दिलासा

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका आणखी मनमानी निर्णयाला तेथील फेडरल न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिली …