वलयांकितांना हवे जबाबदारीचे भान

लोकप्रियतेच्या वलयात वावरणाऱ्या रुपेरी पडद्यावरील कलाकारांचे प्रत्येक पाऊल, त्यांचे शब्द आणि पडद्याबाहेरील वागणे समाजमनावर, विशेषतः तरुण पिढीवर खोलवर ठसा उमटवत असते. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्याच्या व्यासपीठावरून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी चित्रपटसृष्टीतील कलाकारांना केलेले आवाहन याच वस्तुस्थितीवर बोट ठेवणारे आहे. कलाकारांचे काम समाजात प्रकाश पसरवण्याचे असते, अंधार पसरवण्याचे नाही, या राष्ट्रपतींच्या उद्गारांनी चित्रपटसृष्टी आणि व्यावसायिक जाहिरातबाजीच्या नैतिकतेचा मूलभूत प्रश्न ऐरणीवर आणला आहे. लोकांच्या आरोग्याला किंवा जीवनशैलीला घातक ठरणार्या उत्पादनांचा प्रचार मोठ्या अभिनेत्यांनी टाळावा, ही राष्ट्रपतींची भूमिका लोकप्रियतेसोबत येणाऱ्या सामाजिक उत्तरदायित्वाची आठवण करून देणारी आहे. चित्रपट किंवा दूरचित्रवाणीच्या माध्यमातून घराघरांत पोहोचणाऱ्या प्रसिद्ध व्यक्तींना समाजात आदर्श मानण्याची प्रवृत्ती मोठी आहे. एखादा अभिनेता आपल्या शिस्तबद्ध दिनचर्येबद्दल बोलतो तेव्हा तरुण वर्ग त्याकडे गांभीर्याने पाहतो आणि त्याचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करतो. परंतु, हीच अफाट लोकप्रियता जेव्हा निव्वळ व्यावसायिक नफ्यासाठी वापरली जाते, तेव्हा त्याचे गंभीर दुष्परिणाम समाजाला भोगावे लागतात.
आजच्या डिजिटल आणि समाजमाध्यमांच्या युगात तर या कलाकारांची उपस्थिती चोवीस तास लोकांच्या डोळ्यांसमोर असते. अशा वेळी आपल्या आवडत्या चेहऱ्यांनी केलेल्या जाहिरातींमुळे तरुण पिढी दिशाभूल होऊन व्यसन किंवा अहितकारक सवयींकडे ओढली जाण्याचा धोका कैक पटीने वाढतो. आरोग्यास हानिकारक ठरणाऱ्या उत्पादनांच्या बाजारपेठेचे अर्थकारण प्रचंड मोठे आहे. कंपन्या या प्रसिद्ध चेहऱ्यांना कोट्यवधी रुपयांचे मानधन देऊन आपल्या जाहिरातींमध्ये उतरवतात. प्रसिद्ध कलाकारांच्या प्रभावामुळे उत्पादनाला त्वरित विश्वासार्हता मिळते. मात्र, अशा करारांवर स्वाक्षरी करताना संबंधित उत्पादनामुळे समाजात कोणता संदेश जात आहे, याचा विचार करण्याची तसदी अनेकदा घेतली जात नाही. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार, जगात दरवर्षी सुमारे ऐंशी लाख लोकांचा मृत्यू तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाने होतो. अशा उत्पादनांकडे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणि जाहिरात डावपेचांवर अब्जावधी डॉलर्स खर्च केले जातात. अशा पार्श्वभूमीवर, तंबाखू, मद्य, अती साखरेची शीतपेये किंवा ऑनलाइन जुगारासारख्या व्यसनांना अप्रत्यक्षरीत्या प्रोत्साहन देणाऱ्या मोहिमांमध्ये प्रसिद्ध चेहऱ्यांचा सहभाग असणे निश्चितच चिंताजनक ठरते. कला आणि कलाकार हे समाजाचे प्रबोधन करण्याचे, सौंदर्यदृष्टी रुजवण्याचे आणि नव्या जाणिवा निर्माण करण्याचे माध्यम मानले गेले आहेत. जनतेने दिलेले प्रेम आणि अढळ विश्वास या भांडवलावरच कलाकारांची कारकीर्द उभी राहते. त्यामुळे या विश्वासाचा आदर राखणे ही प्रत्येक संवेदनशील कलाकाराची कर्तव्यभावना असायला हवी. – श्रीकांत देवळे

Check Also

अपरिहार्य ‌‘कपात ‌’

महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या एका निर्णयाप्रमाणे येत्या 16 ऑक्टोबरपासून राज्यात सर्वत्र दहा टक्के पाणीकपात केली जाणार …