पंजाबच्या राजपुरा येथील चितकारा विद्यापीठापासून सुरू झालेला धक्कादायक घटनांचा आणि त्यांच्या प्रसाराचा वणवा फगवाड्यातील लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीपर्यंत पोहोचला आणि बघता बघता दोन नामांकित शैक्षणिक संस्था यात होरपळल्या. देशाच्या शिक्षणक्षेत्राबाबत गंभीर चिंता वाटावी अशा घटना अवघ्या 72 तासांत या दोन विद्यापीठांत घडल्या. जालंधर जिल्ह्यातील लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीमध्ये म्हणजे एलपीयूमध्ये एका विद्यार्थिनीवर बलात्कार झाल्याच्या व तिने, आत्महत्या केल्याच्या दाव्यामुळे विद्यार्थ्यांचे आंदोलन उसळले. त्याच्या दोन दिवस अगोदर चितकारा विद्यापीठातही भूताच्या अफवांमुळे आंदोलन उसळले.
खासगी शिक्षण संस्था असलेल्या चितकारात कॅम्पसमध्ये भूताची अफवा पसरल्यामुळे मोठी खळबळ उडाली आणि निदर्शने सुरू झाली. काही विद्यार्थ्यांनी असा दावा केला की, पूर्वी एका विद्यार्थिनीने आत्महत्या केली होती आणि तिचा आत्मा होस्टेलमधील रहिवाशांना त्रास देत आहे. दुसऱ्या एका अफवेनुसार, चितकारा विद्यापीठाच्या मुलींच्या वसतिगृहात एक पुजारी आला होता. तर काही विद्यार्थ्यांनी दोन विद्यार्थिनी बेपत्ता झाल्याचा दावा केला. प्रशासनाकडून कारवाईची मागणी करत विद्यार्थी कॅम्पसमध्ये जमले आणि परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. त्यानंतर तोडफोड सुरू झाली. विद्यार्थ्यांनी खिडक्यांच्या काचा फोडल्या, विद्यापीठाच्या मालमत्तेचे नुकसान केले आणि दोन पोलिसांच्या गाड्यांचीही तोडफोड केली. एका बाजूला भूताच्या आणि आत्म्यांच्या बाष्कळ अफवा, तर दुसऱ्या बाजूला एलपीयूत एका विद्यार्थिनीवर बलात्कार झाल्याची अफवा वाऱ्यासारखी पसरली. सोशल मीडियाने त्याला हातभार लावला. बलात्कारासारख्या अत्यंत संवेदनशील पण पूर्णपणे असंपादित दाव्यांनी विद्यार्थ्यांच्या भावनांना असे काही पेटवले की, तोडफोड, जाळपोळ आणि हिंसेचे तांडव पाहायला मिळाले. प्रश्न हा पडतो की, उद्याच्या भारताची पायाभरणी करणारी तरुण पिढी एवढी हतबल आणि संशयाने ग्रासलेली का झाली आहे ? आजची परिस्थिती पाहता असे वाटते की, सत्य मागे आणि अफवा पुढे, असे आधुनिक युगाचे चित्र बनले आहे. एलपीयूमधील प्रकरणाने तर कळस गाठला. कथित अफवेमुळे हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरतात, महामार्ग जाम होतो आणि पोलीस प्रशासनासोबत तुफान संघर्ष ओढवतो; तर दुसरीकडे ज्या खोलीच्या संदर्भात बलात्काराचा हा सर्व घटनाक्रम जोडला जातो, तिथल्या विद्यार्थिनी कॅमेऱ्यासमोर येऊन असे काहीही घडले नाही असे सांगतात. या संपूर्ण प्रकरणात राजकारण करणे अत्यंत दुर्दैवी आहे. पंजाबमधील आगामी राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर, या आंदोलनांचा वापर राजकीय पोळी भाजण्यासाठी केला जात आहे का, असा गंभीर प्रश्न निर्माण होतो. विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकीय हितसंबंध जपण्याचा हा खेळ शैक्षणिक संस्थांचे भवितव्य अंधारात ढकलत आहे. विद्यापीठे ही ज्ञानाची मंदिरे असतात, राजकीय आखाडे नव्हेत. परंतु जेव्हा राजकारण कॅम्पसच्या आत शिरते, तेव्हा निष्पाप विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात येते. विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न अत्यंत गांभीर्याने घ्यायला हवा .- व्ही. के. कौर
Check Also
संकट भीषण दुष्काळाचे
महाराष्ट्रातील दुष्काळाचे संकट दिवसेंदिवस अधिक गंभीर होत चालले असून, राज्यातील कृषी उत्पन्नावर मोठे सावट पसरले …
पांचजन्य वृत्तपत्र