सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सत्ताकारणात महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांनी एकत्रित खेळी करत भाजपला जोरदार दणका दिला. बँकेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे उदयसिंह पाटील उंडाळकर, तर उपाध्यक्षपदी शिवसेनेचे दीपक चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली. जिल्हा बँकेच्या सत्तेच्या चाव्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने आपल्याकडे ठेवल्या. जिल्हा बँकेच्या सत्तास्थानी प्रवेश करण्याचा मनसुबा मित्रपक्षांनी उधळून लावत जिल्हा परिषदेतील नाट्याचा वचपा काढला. त्यामुळे महायुतीअंतर्गत मतभेद आगामी काळात जिल्ह्याच्या राजकारणावर परिणामकारक ठरणार आहे.
जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्ष निवडला जाईल, अशी भूमिका ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी यापूर्वी मांडली होती. मात्र, प्रत्यक्ष निवड प्रक्रियेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने एकत्रितपणे बाजी मारली. त्यामुळे भाजपच्या राजकीय अपेक्षांना धक्का बसला. जिल्हा परिषद निवडणुकीतील राजकीय संघर्षाचे पडसाद जिल्हा बँकेच्या सत्तावाटपात उमटल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे. जिल्हा बँकेच्या सभागृहात बुधवारी अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी विशेष सभा झाली. निवडणूक निर्णय अधिकारी संजय सुद्रिक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला सर्व 21 संचालक उपस्थित होते. अध्यक्षपदासाठी उदयसिंह उंडाळकर आणि उपाध्यक्षपदासाठी दीपक चव्हाण यांचे प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाल्याने दोघांचीही बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. निवडीनंतर संचालकांनी बाके वाजवून स्वागत केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बँकेबाहेर फटाके फोडून जल्लोष केला.
या संपूर्ण राजकीय घडामोडीत मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, पालकमंत्री शंभूराज देसाई आणि ज्येष्ठ नेते रामराजे नाईक- निंबाळकर यांची भूमिका महत्त्वाची ठरल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी देसाई यांची मरळी येथील कारखान्यावर जाऊन भेट घेतल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आल्याचे सांगितले जाते. त्यातूनच अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे आणि उपाध्यक्षपद शिवसेनेकडे देण्याचे समीकरण प्रत्यक्षात आले.
सर्व प्रक्रिया खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी निवडीनंतर सांगितले. दोनच पदे असल्याने महायुतीतील दोन पक्षांना संधी मिळाली, यात राजकारण शोधण्याचे कारण नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली. मात्र, भाजपला या सत्तावाटपात स्थान न मिळाल्याने त्यांच्या स्पष्टीकरणापेक्षा राजकीय संदेशाचीच चर्चा अधिक होत आहे.
सर्वांना सोबत घेऊन बँकेची परंपरा जपणार – उदयसिंह पाटील उंडाळकर (नवनिर्वाचित अध्यक्ष)
कै. विलासकाका उंडाळकर यांच्या सहकार परंपरेचा वारसा पुढे नेण्याची जबाबदारी आता उदयसिंह उंडाळकर यांच्यावर आली आहे. निवडीनंतर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह महायुतीतील वरिष्ठ नेत्यांच्या शुभेच्छांचा उल्लेख केला. जिल्हा बँकेला आर्थिक सक्षमतेची आणि सहकार क्षेत्रातील साक्षरतेची मोठी परंपरा आहे. सर्व संचालक आणि सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन ही परंपरा अधिक जबाबदारीने पुढे नेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आगामी काळात बँकेच्या आर्थिक धोरणांना आणि कारभाराला कोणती दिशा मिळते, याकडे लक्ष लागले आहे.
सत्तेत असूनही भाजप सत्तेच्या वर्तुळाबाहेर
जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावर भाजपचा दावा असताना प्रत्यक्षात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने सत्ता वाटून घेतली. त्यामुळे भाजपच्या गोटात नाराजी असल्याचे स्पष्ट संकेत निवडीनंतर दिसून आले. विशेष म्हणजे, मंत्री जयकुमार गोरे यांनी यापूर्वी अध्यक्षपद भाजपकडे येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. मात्र, प्रत्यक्ष निवडीत भाजपला संधी मिळाली नाही. महायुतीतील अंतर्गत समन्वयाचा अभाव की पडद्यामागील राजकीय रणनीती, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.
अडीच वर्षांचा फॉर्म्युला की पाच वर्षांची सत्ता?
अध्यक्षपदाचा कार्यकाळ दोन- दोन- एक की अडीच वर्षांचा राहणार की संपूर्ण पाच वर्षांचा, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. वरिष्ठ पातळीवर याबाबत निर्णय घेतला जाईल, असे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले. त्यामुळे सध्याची बिनविरोध निवड म्हणजे पाच वर्षांच्या सत्तेचा निर्विवाद निर्णय आहे की भविष्यातील सत्तावाटपाची केवळ पहिली खेळी, हा प्रश्न कायम आहे.
युतीअंतर्गत
मतभेदांना नवी धार
जिल्हा बँकेच्या निवडीत राष्ट्रवादी आणि शिंदेसेनेने एकत्र येत भाजपला बाजूला ठेवले. वरकरणी महायुतीतील दोन पक्षांना पदे मिळाल्याचे समाधान व्यक्त होत असले, तरी या निवडीने जिल्ह्यातील महायुतीच्या राजकारणातील
Check Also
विळखा चीनी ’मधुजाला‘ चा
चिपनिर्मिती आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जागतिक साम्राज्यावर अनभिषिक्त सम्राटाप्रमाणे राज्य करणाऱ्या ‘एनव्हिडिया’ या महाकाय कंपनीच्या पायाखालील …
पांचजन्य वृत्तपत्र