दिवाळी संपली; पण तिच्या निमित्ताने निर्माण झालेल्या प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. प्रकाश, मांगल्य आणि कौटुंबिक आनंदाचा हा सण आता फटाक्यांच्या कर्णकर्कश आवाजात आणि विषारी धुरात हरवत चालला आहे. वर्षभर प्रदूषणाच्या विळख्यात असलेल्या मुंबई, पुण्यासारख्या महानगरांमध्ये दिवाळीच्या काळात फटाक्यांची भर पडल्याने हवेच्या गुणवत्तेचा प्रश्न अधिक गंभीर होतो. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि श्वसनविकार असलेल्या व्यक्तींना त्याची मोठी किंमत मोजावी लागते. आपल्या आनंदासाठी इतरांच्या आरोग्याशी खेळण्याचा अधिकार कोणालाही नाही.
फटाक्यांच्या ज्वलनातून सूक्ष्म धूलिकण, सल्फर डायऑक्साइड आणि इतर प्रदूषक हवेत मिसळतात. यातील अतिसूक्ष्म कण फुफ्फुसांपर्यंत पोहोचू शकतात. दिवाळीच्या रात्री प्रदूषण वाढल्यानंतर वातावरणातील परिस्थितीनुसार त्याचा परिणाम दुसऱ्या दिवशीही जाणवू शकतो. आधीच वाहनांची गर्दी, बांधकामांची धूळ आणि औद्योगिक उत्सर्जनामुळे शहरांची हवा बिघडलेली असताना फटाक्यांमुळे परिस्थिती आणखी बिकट होते.
या पार्श्वभूमीवर फटाक्यांवरील निर्बंधांची अंमलबजावणी हा महत्त्वाचा प्रश्न आहे. न्यायालयीन निर्देश असतानाही सार्वजनिक रस्त्यांवर, दाट लोकवस्तीत आणि रात्री उशिरापर्यंत फटाके वाजवले जात असतील, तर नियमांच्या परिणामकारकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते. उत्पादन आणि विक्री सुरू ठेवायची, मात्र वापरावर निर्बंध घालायचे, या धोरणातील विसंगतीचाही विचार आवश्यक आहे. विशेषतः मोठा आवाज करणाऱ्या आणि अधिक प्रदूषण निर्माण करणाऱ्या फटाक्यांच्या उत्पादनावरच कठोर नियंत्रण आणले पाहिजे.
फटाक्यांचा प्रश्न केवळ दिवाळीपुरता मर्यादित राहिलेला नाही. विवाहसोहळे, राजकीय मिरवणुका, विजयोत्सव अशा अनेक प्रसंगी फटाक्यांचा अनिर्बंध वापर होतो. त्यामुळे या प्रश्नाला धार्मिक स्वरूप देण्याऐवजी सार्वजनिक आरोग्य आणि नागरी शिस्तीच्या दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे. प्रदूषणाचा परिणाम कोणत्याही धर्मापुरता मर्यादित नसतो.
फटाक्यांमुळे लागणाऱ्या आगी, होणारी जीवितहानी, मालमत्तेचे नुकसान आणि दुसऱ्या दिवशी स्वच्छता कर्मचाऱ्यांवर पडणारा अतिरिक्त ताण यांचाही हिशेब मांडला पाहिजे. उत्सव साजरा करण्याचे स्वातंत्र्य मान्य करतानाच त्यातून इतरांना होणारा उपद्रव रोखणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. त्यासाठी उत्पादनापासून विक्री आणि प्रत्यक्ष वापरापर्यंत प्रभावी नियंत्रण आवश्यक आहे. दिवाळीचा आनंद टिकवायचा असेल, तर फटाक्यांच्या अतिरेकाला आवर घालण्याची सुरुवात समाजाने स्वतःपासून केली पाहिजे.– राकेश माने
Check Also
वलयांकितांना हवे जबाबदारीचे भान
लोकप्रियतेच्या वलयात वावरणाऱ्या रुपेरी पडद्यावरील कलाकारांचे प्रत्येक पाऊल, त्यांचे शब्द आणि पडद्याबाहेरील वागणे समाजमनावर, विशेषतः …
पांचजन्य वृत्तपत्र