पुण्यात अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना जयेश पाखले यांना एकदा घरातील भंगार विकायचे होते. मात्र, भंगारवाला नेमका कधी येणार, याची खात्री नव्हती. त्यासाठी वारंवार वाट पाहावी लागत होती. ही अडचण आपल्यापुरती मर्यादित नसून अनेक घरांमध्ये अशीच परिस्थिती असणार, हे त्यांच्या लक्षात आले. यातूनच त्यांना व्यवसायाची कल्पना सुचली. ग्राहकांना आपल्या सोयीच्या वेळी घरातील भंगार विकता यावे, यासाठी त्यांनी मित्रांच्या मदतीने एक ॲप तयार केले. पुढे याच कल्पनेतून ‘स्क्रॅपडील’ या व्यवसायाची सुरुवात झाली.
सुरुवातीला ग्राहकांकडून ऑर्डर मिळू लागल्या; मात्र भंगार वाहून नेण्यासाठी जयेश यांच्याकडे गाडी नव्हती. त्यांनी काकांकडून वजनकाटा घेतला आणि स्वतःच्या स्कूटरवरून ग्राहकांच्या घरी जाण्यास सुरुवात केली. घराघरांतून जमा केलेले कागद, धातू आणि इतर भंगार वेगवेगळे करून ते विकायचे. ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी पत्रकांचे वाटप केले. महाविद्यालयातील व्हॉट्सॲप ग्रुपचाही उपयोग केला. मर्यादित साधनांवर व्यवसायाची घडी बसत असतानाच लॉकडाऊन सुरू झाला आणि काम थांबले.
या काळात उत्पन्नाचा प्रश्न निर्माण झाला. मात्र, जयेश यांनी परिस्थितीसमोर हार मानली नाही. उदरनिर्वाहासाठी त्यांनी रस्त्यावर चहा आणि भाजी विकण्याचेही काम केले. परिस्थिती सुधारल्यानंतर त्यांनी पुन्हा भंगार संकलनाचा व्यवसाय सुरू केला. त्यानंतर गणेश आणि वैभव हे त्यांचे दोन्ही भाऊही व्यवसायात सहभागी झाले. तिघांनी मिळून भंगार संकलनाची पद्धत अधिक व्यवस्थित केली. ग्राहकांच्या घरातून भंगार उचलणे, त्याचे वजन करणे, प्रकारानुसार वर्गीकरण करणे आणि पुनर्प्रक्रियेसाठी पाठवणे, अशी संपूर्ण व्यवस्था उभी राहिली. ग्राहकांना फोनवरून आपल्या सोयीची वेळ निश्चित करण्याची सुविधाही उपलब्ध झाली. स्कूटरवरून घराघरांत जाऊन भंगार गोळा करण्याच्या छोट्याशा उपक्रमाचे आज मोठ्या व्यवसायात रूपांतर झाले आहे. स्क्रॅपडीलच्या माध्यमातून दरमहा सुमारे दोन लाख किलो भंगार गोळा केले जाते. सन 2025-26 या आर्थिक वर्षात या तिन्ही भावांनी मिळून तब्बल 2.5 कोटी रुपयांची उलाढाल केली. घरातील भंगार विकण्याच्या एका साध्या अडचणीतून सुचलेली कल्पना आज त्यांच्या यशस्वी व्यवसायाचा पाया ठरली आहे.
Check Also
धूम गाढविणीच्या दुधाच्या साबणाची!
आतापर्यंत तुम्ही चंदन, कोरफड, कडूनिंब, गुलाब अशा अनेक सुगंधी साबणांचा वापर केला असेल. पण, तुम्ही …
पांचजन्य वृत्तपत्र