लडाखमधील संरक्षण आणि भौगोलिकदृष्ट्या महत्त्वाच्या अशा 28 ठिकाणांचे नामकरण करण्याचे भारताने ठरवल्यानंतर या निर्णयावर शेजारी देश चीनने थयथयाट करणे अपेक्षितच होते. अपेक्षेप्रमाणे चीनने आपल्या विरोधाचे फुत्कार टाकून भारत ज्या विभागात नामकरण करणार आहे तो भूभाग आपला असल्याचा दावा केला आहे. भारताने एकतर्फी आणि बेकायदेशीरपणे स्थापन केलेल्या तथाकथित लडाख केंद्रशासित प्रदेशाला चीनने कधीही मान्यता दिली नाही, अशा प्रकारची प्रतिक्रिया चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून व्यक्त झाली आहे. गेल्याच महिन्यात ब्रिक्स परिषदेच्या निमित्ताने भारत दौऱ्यावर आलेले चीनचे अध्यक्ष जिनपिंग यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत हास्यविनोद करून मैत्रीचे प्रदर्शन केले होते. पण चीनबरोबर केलेली अशा प्रकारची मैत्री कधीही कायमस्वरूपी नसते आणि चीन कधी पाठीत खंजीर खुपसेल याचीही खात्री देता येत नाही हे अगदी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कालावधीपासून सिद्ध होत आले आहे.
आता ब्रिक्स परिषदेतील मैत्रीच्या फोटोंची शाई अजून वाळली नाही तोपर्यंतच चीनने एका स्वतंत्र भारतीय भूभागावर दावा सांगितला आहे. भारताने लडाखमध्ये नामकरण केलेले विविध भूभाग हे नेहमीच चीनच्या मालकीचे आहेत, ही परिस्थिती कधीही बदलू शकत नाही अशीही टिप्पणी केली आहे. लडाख हा भारताचा अविभाज्य भाग असलेला भूभाग आहे याबाबत शंका घेण्याचे कोणतेही कारण नाही. पण गेल्या काही वर्षांपूर्वी लडाखमध्ये भारतीय आणि चिनी सैन्य ज्या कारणाने आणि ज्या ठिकाणी समोरासमोर आले होते, त्याच ठिकाणी भारत सरकारने काही ठिकाणांचे नामकरण केल्यामुळे चीनचा तिळपापड झालेला दिसतो. भारत आणि चीन यांच्या सीमेवरील गोगरा आणि हॉट स्प्रिंग ही ठिकाणे संरक्षणदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली जातात.
2020 मध्ये याच प्रदेशांमध्ये दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये संघर्ष झाला होता. दोन्ही देशांमधील जी प्रत्यक्ष नियंत्रण रेषा आहे त्यावर गस्त घालण्यासाठीसुद्धा ही ठिकाणे अत्यंत महत्त्वाची आहेत, याची कल्पना दोन्ही देशांना असल्यामुळे आणि त्यातही चीनला या प्रदेशाचे संरक्षणदृष्ट्या महत्त्व जास्तच पटले असल्याने या परिसरामध्ये विविध प्रकल्प राबवण्याकडे चीनचा नेहमीच कल आहे. भारत आणि चीन सीमेवरील आपल्या हद्दीमध्ये चीनने गेल्या काही वर्षांमध्ये विविध बांधकामे केली आहेत आणि प्रकल्पांची उभारणीसुद्धा केली आहे. भविष्यात ही ठिकाणे अत्यंत महत्त्वाची ठरणार असल्याची कल्पना चीनलाही आहे. मुळात गेल्या अनेक वर्षांपासून चीनचा वसाहतवादी दृष्टिकोन लपून राहिलेला नाही. भारतीय हद्दीला लागून असलेल्या भूभागावर नेहमीच चीनची नजर असते. त्यातही तिबेटसारखा देश चीनपेक्षाही भारताला जास्त प्राधान्य देत असल्याने आणि तिबेटी धर्मगुरूंनासुद्धा भारताचे संरक्षण असल्याने चीनला ते कधीच पसंत नसते. साहजिकच आपला वसाहतवादी दृष्टिकोन पुढे नेण्यासाठी कोठे संधी मिळाली तर चीन ती सोडत नाही. आपल्या पद्धतीने वसाहतवादाचे फुत्कार सोडून भारताला त्रास देण्याचे त्यांचे काम चालूच राहते.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधांत ज्या प्रकारे काश्मीर समस्या हा एक मोठा अडथळा निर्माण झाला आहे, तसेच आता भारत आणि चीन यांच्यातील संबंधांमध्ये लडाखचा हा भूप्रदेश अडथळा निर्माण होण्याचे संकेत या विषयामुळे मिळत आहेत. — कमलेश गिरी
Check Also
दुष्काळात दरवाढीचा तेरावा
उत्सवाचा हंगाम बाजारात नवी उमेद, उत्साहाचे वातावरण आणि घराघरांत आनंदाची पर्वणी घेऊन येतो. नागरिक खरेदीचे …
पांचजन्य वृत्तपत्र