समाजमाध्यमांवर एखाद्या उत्पादनाची जाहिरात दिसली, एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीने त्याची शिफारस केली की त्याच्या सुरक्षिततेची खातरजमा न करता ते वापरण्याची प्रवृत्ती वाढत आहे. आभासी जगातील या प्रभावाला बळी पडून स्वतःच्या आरोग्याचा धोका पत्करण्याचे प्रकार गंभीर आहेत. केरळमधील मलप्पुरम येथे घडलेली एका किशोरीची घटना त्याचेच उदाहरण आहे. गोरे होण्याच्या इच्छेने तिने समाजमाध्यमांवरील प्रभावकाच्या प्रचाराला भुलून त्वचा उजळवणारी क्रीम वापरली. काही काळाने तिला मूत्रपिंडाचा गंभीर आजार जडला. तपासणीत तिच्या शरीरात पाऱ्याचे प्रमाण धोकादायक पातळीवर वाढल्याचे आढळले.
या क्रीमच्या नमुन्याची तपासणी केली असता त्यात पाऱ्याचे प्रमाण 12.500 पीपीएम आढळले. सौंदर्यप्रसाधनांमध्ये पाऱ्याची स्वीकार्य मर्यादा 1 पीपीएमपेक्षा कमी असताना हे प्रमाण कितीतरी अधिक होते. डॉक्टरांच्या तपासणीत पारा असलेल्या क्रीमच्या वापरामुळे किशोरीच्या मूत्रपिंडाला इजा झाल्याचे स्पष्ट झाले. सौंदर्याच्या एका अवास्तव कल्पनेपायी एका मुलीला गंभीर आरोग्यसमस्येला सामोरे जावे लागले.
या घटनेचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे बाजारात अशा घातक घटकांचा समावेश असलेली उत्पादने उपलब्ध कशी होतात? सौंदर्यप्रसाधनांच्या विक्रीपूर्वी त्यांची प्रयोगशाळेत तपासणी होते का? त्यातील रसायनांचे प्रमाण सुरक्षित मर्यादेत आहे की नाही, याची खातरजमा कोण करते? ग्राहकांच्या आरोग्याशी संबंधित या प्रश्नांची उत्तरे मिळणे आवश्यक आहे. नियम असतील, तर त्यांची अंमलबजावणीही तितकीच काटेकोर हवी.
समाजमाध्यमांवरील प्रभावकांची जबाबदारीही या निमित्ताने चर्चेत आली पाहिजे. एखाद्या उत्पादनाचे पैसे घेऊन किंवा वैयक्तिक शिफारस म्हणून कौतुक करताना त्याच्या सुरक्षिततेची माहिती घेणे आवश्यक आहे. लोकप्रियतेच्या जोरावर लाखो लोकांपर्यंत पोहोचणाऱ्या व्यक्तींनी आपल्या प्रचाराचे परिणाम लक्षात घ्यायला हवेत. चुकीच्या शिफारशीमुळे ग्राहकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. मुळात गोरेपणाला सौंदर्याचे प्रमाण मानणारी मानसिकता बदलण्याची गरज आहे. त्वचेचा रंग हा व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचा, गुणवत्तेचा किंवा कर्तृत्वाचा निकष असू शकत नाही. तरीही समाजातील न्यूनगंडाचा फायदा घेत अनेक कंपन्या नफ्यासाठी अशी उत्पादने विकतात. ग्राहकांनी जाहिरातींच्या मोहात न पडता उत्पादनातील घटक आणि त्यांची सुरक्षितता तपासली पाहिजे. आभासी जगातील प्रसिद्धीपेक्षा स्वतःच्या आरोग्याला आणि व्यक्तिमत्त्वाला महत्त्व देणे, हाच या घटनेचा खरा धडा आहे.– अपर्णा देवकर
Check Also
धमक्यांच्या विळख्यात महाराष्ट्र
रेल्वे स्थानके, न्यायालये, ऐतिहासिक वास्तू आणि चित्रपटसृष्टीतील नामवंत व्यक्तींना धमकावण्याचे प्रकार महाराष्ट्रात वाढत आहेत. आधुनिक …
पांचजन्य वृत्तपत्र