लेख-समिक्षण

शंभराव्या संमेलनाध्यक्षपदी डॉ. शरणकुमार लिंबाळे यांची निवड

शरणकुमार लिंबाळे यांचा प्रवास महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील हन्नूर या गावात 1 जून 1956 रोजी शरणकुमार लिंबाळे यांचा जन्म झाला. सामाजिक विषमता, जातिव्यवस्थेची उतरंड, अस्पृश्यता आणि वंचित समूहांच्या जगण्यातील संघर्ष यांचे वास्तव त्यांच्या बालपणापासूनच अनुभवास आले. त्यांनी शिवाजी विद्यापीठातून इंग्रजी विषयात पदवी, मराठी विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर ‌‘मराठी दलित साहित्य आणि अमेरिकन ब्लॅक साहित्य : एक तुलनात्मक अभ्यास‌’ या विषयावर पीएच.डी. संपादन केली. भारतीय दलित साहित्य आणि अमेरिकेतील कृष्णवर्णीय साहित्य यांच्यातील साम्य, संघर्ष आणि अभिव्यक्तीचे स्वरूप यांचा त्यांनी अभ्यास केला.
पुणे ः पुणे ः पुण्यात होणाऱ्या शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. शरणकुमार लिंबाळे यांची निवड झाली आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या बैठकीत त्यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
अध्यक्षपदासाठी ज्येष्ठ साहित्यिक शरणकुमार लिंबाळे, रमेश पतंगे, विजय कुवळेकर आणि बाबा भांड यांच्या नावांची साहित्य वर्तुळात चर्चा होती. शरणकुमार लिंबाळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. येत्या 28 ते 31 जानेवारी दरम्यान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रांगणात हे ऐतिहासिक शंभरावे साहित्य संमेलन रंगणार आहे.
नोकरी ते साहित्यिक प्रवास
लिंबाळे यांच्या व्यावसायिक कारकिर्दीची सुरुवात दूरसंचार विभागात टेलिफोन ऑपरेटर म्हणून झाली. त्यानंतर 1986 ते 1992 या काळात त्यांनी आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावर उद्घोषक म्हणून काम केले. पुढे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या प्रकाशन विभागात सहाय्यक संपादक म्हणून त्यांनी काम सुरू केले. विद्यापीठात प्राध्यापक आणि संचालक अशा जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी शैक्षणिक क्षेत्रातही स्वतंत्र ओळख निर्माण केली. या विद्यापीठातून ते निवृत्त झाले.
‌‘अक्करमाशी‌’
शरणकुमार लिंबाळे यांचे ‌‘अक्करमाशी‌’ या 1984 मध्ये प्रकाशित झालेल्या आत्मकथनाने मराठी साहित्यविश्वात मोठी चर्चा घडवली. स्वतःच्या आयुष्यातील अनुभवांच्या माध्यमातून त्यांनी जातिव्यवस्थेने निर्माण केलेली सामाजिक विषमता, अस्पृश्यता, मानवी प्रतिष्ठेचा संघर्ष आणि सामाजिक बहिष्करणाचे वास्तव मांडले. लिंबाळे यांचे योगदान केवळ आत्मकथनापुरते मर्यादित नाही.
दलित साहित्याची वैचारिक मांडणी आणि समीक्षा हा त्यांच्या साहित्यिक प्रवासाचा महत्त्वाचा भाग आहे. दलित साहित्याकडे केवळ वेदनेची अभिव्यक्ती म्हणून न पाहता, ते स्वतंत्र विचारविश्व, सांस्कृतिक अस्मिता आणि सामाजिक परिवर्तनाची चळवळ म्हणून पाहण्याची दृष्टी त्यांच्या लेखनातून विकसित झाली. त्यामुळे ते लेखकाबरोबरच महत्त्वाचे साहित्यचिंतक म्हणूनही ओळखले जातात.
विविध कादंबऱ्या
लिंबाळे यांनी साहित्याच्या विविध प्रकारांत लेखन केले आहे. ‌‘उपल्या‌’, ‌‘हिंदू‌’, ‌‘बहुजन‌’, ‌‘झुंड‌’, ‌‘सनातन‌’ आणि ‌‘रामराज्य‌’ या त्यांच्या महत्त्वाच्या कादंबऱ्या आहेत. ‌‘दलित ब्राह्मण‌’, ‌‘देवता आदमी‌’ हे त्यांचे कथासंग्रह चर्चेत राहिले. ‌‘उद्रेक‌’, ‌‘ओ‌’ आणि ‌‘यलगार‌’ या कविता आणि काव्यलेखनातूनही त्यांनी सामाजिक वास्तवाला अभिव्यक्ती दिली. त्यांच्या लेखनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रभाव जाणवतो. स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता आणि मानवी प्रतिष्ठा ही मूल्ये त्यांच्या साहित्याच्या केंद्रस्थानी आहेत.आहेत.

Check Also

धमक्यांच्या विळख्यात महाराष्ट्र

रेल्वे स्थानके, न्यायालये, ऐतिहासिक वास्तू आणि चित्रपटसृष्टीतील नामवंत व्यक्तींना धमकावण्याचे प्रकार महाराष्ट्रात वाढत आहेत. आधुनिक …