मनोरंजनाच्या डिजिटल क्रांतीनंतर चित्रपटगृहांचे अस्तित्व धोक्यात आल्याची चर्चा सुरू झाली होती. घरबसल्या चित्रपट आणि वेबमालिका पाहण्याची सवय लागलेला प्रेक्षक पुन्हा तिकीट काढून चित्रपटगृहात जाईल का, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र, चालू वर्षातील आकडेवारी वेगळेच चित्र दाखवते. ओटीटीवरील प्रेक्षकांची संख्या वाढत असतानाच चित्रपटगृहांतील गर्दी आणि तिकीटविक्रीतून मिळणारे उत्पन्नही वाढले आहे. त्यामुळे मनोरंजनाच्या या दोन माध्यमांमधील स्पर्धेला आता सहअस्तित्वाचे स्वरूप येत असल्याचे दिसते. बदलत्या प्रेक्षकवर्तनाचा हा प्रवास चित्रपटसृष्टीच्या भविष्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.
– सोनम परब
कोरोनाच्या काळात भारतीय मनोरंजनविश्वात मोठी उलथापालथ झाली. अनेक महिने चित्रपटगृहे बंद राहिली. चित्रपटांचे प्रदर्शन रखडले आणि प्रेक्षकांनी घरबसल्या मनोरंजनासाठी ओटीटीचा आधार घेतला. नेटफ्लिक्स, ॲमेझॉन प्राइम व्हिडिओ, जिओहॉटस्टार यांसारख्या डिजिटल माध्यमांनी भारतीय घरांमध्ये स्थान मिळवले. मोबाईल, लॅपटॉप किंवा स्मार्ट टीव्हीवर आपल्या सोयीच्या वेळी चित्रपट पाहण्याची सुविधा उपलब्ध झाल्याने चित्रपटगृहांकडे जाण्याची गरज कमी होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला. काही चित्रपट थेट ओटीटीवर प्रदर्शित होऊ लागल्याने या चर्चेला आणखी बळ मिळाले.
मात्र, गेल्या काही वर्षांतील प्रेक्षकांच्या वर्तनाचा अभ्यास केला, तर मनोरंजनाच्या सवयींमध्ये अधिक व्यापक बदल घडत असल्याचे दिसते. घरात बसून चित्रपट पाहण्याची सोय प्रेक्षकांना हवी आहेच; पण मोठ्या पडद्यावर चित्रपट पाहण्याचा अनुभवही त्यांना तितकाच महत्त्वाचा वाटतो. विशेषतः भव्य दृश्यरचना, प्रभावी ध्वनी, उत्कंठावर्धक कथानक आणि सामूहिक प्रतिसाद यामुळे चित्रपटगृहांचे आकर्षण टिकून आहे. त्यातच चांगल्या आशयाच्या चित्रपटांना प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळत असल्याने चित्रपटगृहांच्या भवितव्याबाबतचे निराशाजनक अंदाज मागे पडू लागले आहेत.
डिजिटल प्रेक्षकांची संख्या वाढतेच आहे
‘ऑरमॅक्स’च्या 2026 मधील अभ्यासानुसार, भारतात ऑनलाइन व्हिडिओ पाहणाऱ्यांची संख्या 66.49 कोटींवर पोहोचली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत ही वाढ सुमारे 11 टक्के आहे. पैसे भरून घेतलेल्या सक्रिय ओटीटी सदस्यत्वांची संख्या 14.82 कोटींवरून 17.26 कोटींवर गेली आहे. इंटरनेटशी जोडलेल्या दूरचित्रवाणी संचांवर ओटीटी पाहणाऱ्यांची संख्या 12.92 कोटींवरून 20.69 कोटी झाली असून, ही वाढ सुमारे 60 टक्के आहे. ही आकडेवारी ओटीटीची लोकप्रियता कायम असल्याचे स्पष्ट करते. विशेषतः छोट्या शहरांमध्ये इंटरनेटचा विस्तार, तुलनेने स्वस्त डेटा आणि प्रादेशिक भाषांमधील कार्यक्रमांची उपलब्धता यामुळे डिजिटल मनोरंजनाचा प्रसार वाढला आहे. पूर्वी हिंदी किंवा इंग्रजी कार्यक्रमांपुरते मर्यादित असलेले ओटीटी आता मराठी, तमिळ, तेलुगू, मल्याळम, बंगाली आणि इतर भाषांमधील आशयामुळे अधिक व्यापक झाले आहे.
पर्यायांची गर्दी, निवडीचा पेच
ओटीटीच्या विस्तारातून एक नवी समस्या निर्माण झाली आहे. दर आठवड्याला अनेक वेबमालिका, चित्रपट, माहितीपट आणि मनोरंजनाचे कार्यक्रम प्रदर्शित होत आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणातील आशयातून नेमके काय पाहावे, हा प्रश्न प्रेक्षकांसमोर उभा राहतो. विविध माध्यमांवरील सदस्यत्वांचा खर्च, प्रत्येक ठिकाणी उपलब्ध असलेले वेगवेगळे कार्यक्रम आणि सतत बदलणाऱ्या शिफारशी यामुळे प्रेक्षकांचे लक्ष विभागले जात आहे.
‘ऑरमॅक्स स्ट्रीम ट्रॅक’च्या विलेषणानुसार, जानेवारी 2025 पासून प्रदर्शित झालेल्या प्रमुख 40 स्वतंत्र हिंदी वेबमालिकांची सरासरी प्रेक्षकांपर्यंत पोहोच चार आठवड्यांनंतर 49 टक्के होती. तुलनात्मक गटातील चित्रपटगृहांत प्रदर्शित झालेल्या चित्रपटांची पोहोच 70 टक्क्यांपर्यंत होती. या तुलनेची पद्धत लक्षात घेणे आवश्यक असले, तरी डिजिटल माध्यमांवरील आशयाला प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी अधिक संघर्ष करावा लागत असल्याचा संकेत यातून मिळतो.
एखादी वेबमालिका तयार करून प्रदर्शित करणे आणि तिला लोकप्रिय बनवणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. प्रेक्षकांकडे पर्याय वाढल्यामुळे प्रत्येक कार्यक्रमासाठी स्पर्धा तीव्र झाली आहे. सुरुवातीच्या काही भागांमध्ये कथानकाने पकड घेतली नाही, तर प्रेक्षक दुसऱ्या कार्यक्रमाकडे वळतो. त्यामुळे ओटीटी निर्मात्यांसमोर दर्जेदार पटकथा, प्रभावी सादरीकरण आणि वेगळेपणा जपण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.
चित्रपटगृहांच्या कमाईत वाढ
2026 च्या पहिल्या सहामाहीत भारतीय चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर 6,398 कोटी रुपयांची कमाई केल्याचे उपलब्ध उद्योगविलेषण सांगते. मागील वर्षातील याच कालावधीच्या तुलनेत ही वाढ सुमारे 10 टक्के आहे. चित्रपटगृहांतील प्रेक्षकभेटींची संख्या 36.2 कोटींवरून 37.8 कोटींवर पोहोचली. हिंदी चित्रपटांच्या बॉक्स ऑफिसमधील वाट्यातही सुमारे पाच टक्के वाढ झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.
या आकडेवारीतील आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे कमाईचे वितरण. 2025 मध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या पहिल्या दहा चित्रपटांचा एकूण बॉक्स ऑफिसमधील वाटा 41 टक्क्यांवरून 33 टक्क्यांवर आल्याचे विलेषण सांगते. म्हणजेच चित्रपटांची कमाई काही मोजक्या मोठ्या निर्मितींपुरती मर्यादित राहत नसल्याचे संकेत मिळतात. अर्थात, तिकीटदर वाढल्यामुळे एकूण उत्पन्न वाढू शकते. त्यामुळे केवळ बॉक्स ऑफिसवरील कमाईवरून प्रेक्षकांची संख्या वाढल्याचा निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही. मात्र, प्रत्यक्ष प्रेक्षकभेटींमध्येही वाढ नोंदवली गेल्याने चित्रपटगृहांकडे प्रेक्षक पुन्हा वळत असल्याच्या निरीक्षणाला आधार मिळतो.
मोठ्या पडद्याचा अनुभव वेगळाच
चित्रपटगृहांमध्ये जाण्यामागे सामाजिक आणि मानसिक कारणेही आहेत. कुटुंबासोबत किंवा मित्रमंडळींबरोबर चित्रपट पाहणे हा अनेकांसाठी विरंगुळ्याचा भाग असतो. घरातील दूरचित्रवाणी किंवा मोबाईलवर चित्रपट पाहताना फोन, घरकाम आणि इतर कारणांमुळे लक्ष विचलित होऊ शकते. चित्रपटगृहात मात्र प्रेक्षक ठरावीक काळासाठी कथानकात गुंतून राहतो.
विशेषतः तरुण प्रेक्षकांसाठी चित्रपटगृह हे भेटण्याचे, एकत्र वेळ घालवण्याचे आणि मनोरंजनाचा सामूहिक अनुभव घेण्याचे ठिकाण आहे. सोशल मीडियावरील चर्चांमुळेही चित्रपट पाहण्याची उत्सुकता वाढते. एखाद्या चित्रपटातील प्रसंग, संगीत किंवा अभिनयाची चर्चा मोठ्या प्रमाणावर सुरू झाली, तर तो अनुभव प्रत्यक्ष मोठ्या पडद्यावर घेण्याची इच्छा निर्माण होते. याउलट ओटीटीवर प्रेक्षक स्वतःच्या वेळेनुसार कार्यक्रम पाहू शकतो. प्रवासात, सुट्टीच्या दिवशी किंवा रात्री उशिरा मनोरंजनाचा आनंद घेण्याची सुविधा त्याला मिळते. या दोन अनुभवांची वैशिष्ट्ये वेगवेगळी असल्यामुळे प्रेक्षक दोन्ही माध्यमांचा वापर करत आहे.
एकाच चित्रपटाचे दोन प्रेक्षकवर्ग?
‘धुरंधर’ या चित्रपटाचे उदाहरण या बदलाचे स्वरूप स्पष्ट करते. 2025 मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट 30 जानेवारी 2026 रोजी नेटफ्लिक्सवर उपलब्ध झाला. संदर्भातील ऑरमॅक्सच्या आकडेवारीनुसार, डिजिटल माध्यमावर चित्रपट पाहणाऱ्या 2.15 कोटी प्रेक्षकांपैकी सुमारे 65 टक्के प्रेक्षकांनी तो आधी चित्रपटगृहात पाहिला होता.
या आकडेवारीची स्वतंत्र पुष्टी आवश्यक असली, तरी एखादा चित्रपट चित्रपटगृहात पाहिल्यानंतर ओटीटीवर पुन्हा पाहण्याची प्रवृत्ती महत्त्वाची आहे. आवडते प्रसंग, संवाद किंवा अभिनय पुन्हा अनुभवण्यासाठी प्रेक्षक डिजिटल माध्यमाकडे वळू शकतो. त्यामुळे चित्रपटाचे ओटीटीवरील प्रदर्शन हे चित्रपटगृहातील प्रदर्शनाशी नेहमीच स्पर्धा करणारे ठरत नाही.
मनोरंजन उद्योगासमोरील नवे गणित
या बदलांचा चित्रपट निर्मिती आणि वितरणाच्या अर्थकारणावर परिणाम होणार आहे. पूर्वी चित्रपटाच्या यशाचे प्रमुख मोजमाप तिकीटविक्रीतून मिळणारे उत्पन्न होते. आता चित्रपटगृहांतील कमाईबरोबरच डिजिटल प्रदर्शनाचे हक्क, दूरचित्रवाणी हक्क, संगीत आणि इतर माध्यमांमधून मिळणारे उत्पन्नही महत्त्वाचे झाले आहे.
चित्रपटगृहात प्रदर्शित झालेल्या चित्रपटाला मिळालेली प्रसिद्धी त्याच्या ओटीटीवरील लोकप्रियतेसाठी उपयुक्त ठरू शकते. त्याचप्रमाणे डिजिटल माध्यमांवर लोकप्रिय झालेल्या कलाकारांविषयीची उत्सुकता त्यांच्या आगामी चित्रपटांसाठी फायदेशीर ठरू शकते. दोन्ही माध्यमांमधील कलाकार, प्रेक्षक आणि निर्मितीसंस्थांची देवाणघेवाण वाढत आहे.
मात्र, वाढती निर्मितीखर्चाची रक्कम, महागडी तिकिटे, मल्टिप्लेक्समधील खाद्यपदार्थांचे दर आणि ओटीटी सदस्यत्वाचा एकत्रित खर्च या समस्या दुर्लक्षित करता येणार नाहीत. मनोरंजनासाठी प्रेक्षक किती खर्च करण्यास तयार आहे, यावर या उद्योगाची पुढील वाढ अवलंबून राहील. विशेषतः मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी चित्रपटगृहातील एकत्रित खर्च हा महत्त्वाचा निर्णयघटक ठरतो.
आशयच ठरवणार यशाचे भवितव्य
ओटीटी आणि चित्रपटगृहांमधील स्पर्धेचा सर्वाधिक फायदा दर्जेदार आशयनिर्मितीला होऊ शकतो. प्रसिद्ध कलाकार, मोठे बजेट किंवा आक्रमक जाहिरात मोहीम यांवर चित्रपटाचे यश कायम अवलंबून राहणार नाही. प्रभावी कथा, सक्षम पटकथा आणि प्रेक्षकांच्या बदलत्या आवडीनिवडी समजून घेणाऱ्या निर्मितींना अधिक संधी मिळू शकते.
भारतीय प्रेक्षक आता भाषेच्या मर्यादाही ओलांडत आहे. दक्षिण भारतीय चित्रपट हिंदी भाषिक प्रदेशांमध्ये लोकप्रिय होत आहेत, तर विविध भाषांमधील वेबमालिकांना देशभर प्रेक्षक मिळत आहेत. त्यामुळे प्रादेशिक चित्रपटसृष्टीसमोरही व्यापक बाजारपेठ उपलब्ध होत आहे.
चित्रपटगृहांकडे परतणारा प्रेक्षक हा ओटीटीच्या अपयशाचा पुरावा नाही. उलट, मनोरंजनाच्या बदलत्या बाजारपेठेत प्रेक्षक आपल्या आवडीप्रमाणे माध्यम निवडत असल्याचे हे निदर्शक आहे. ओटीटीने घरबसल्या जगभरातील मनोरंजन उपलब्ध करून दिले, तर चित्रपटगृहांनी मोठ्या पडद्यावरील सामूहिक अनुभवाचे महत्त्व पुन्हा अधोरेखित केले आहे. आगामी काळात या दोन्ही माध्यमांचे व्यावसायिक गणित बदलत राहील. त्यात सर्वाधिक महत्त्व असणार आहे ते प्रेक्षकांच्या पसंतीला. कारण माध्यम कोणतेही असले, तरी प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी उत्तम कथेला पर्याय नाही.
Check Also
विजय आणि रश्मिकाचा ‘रणबाली’
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता विजय देवरकोंडा आणि आघाडीची अभिनेत्री रश्मिका मंदाना ही बहुचर्चित जोडी पुन्हा …
पांचजन्य वृत्तपत्र