लेख-समिक्षण

जीवलग मित्र हरपला!

नाना हा माझा अत्यंत जवळचा, जिवलग मित्र होता. अभिनयाच्या सुरुवातीच्या काळापासून आमचं नातं होतं. त्याच्या अभिनयाची सुरुवात मी पाहिली होती. त्याने आपल्या कर्तृत्वावर मिळवलेलं यशही पाहिलं होतं. त्याचा स्पष्टवक्तेपणा, त्याचा सरळ स्वभाव आणि दुसऱ्याला मदत करण्याची त्याची आंतरिक तत्परता या सगळ्या गोष्टी मी जवळून अनुभवल्या होत्या. असा माणूस अचानक आपल्यातून निघून जाणं हे माझ्यासाठी फार मोठं दुःख आहे. नानासारखा मित्र गमावल्याची वेदना मी कधीच विसरू शकणार नाही. – अशोक सराफ, ज्येष्ठ अभिनेते

नाना पाटेकर गेल्याची बातमी ऐकल्यापासून मनाला फार मोठा धक्का बसला आहे. माझ्या आयुष्यातली ही अत्यंत वाईट घटना आहे. नाना हा माझा जिवलग मित्र होता. जीवाभावाचा मित्र अचानक आपल्याला सोडून जाण्यानं होणारं दुःख शब्दांतून परिपूर्ण व्यक्त कधीच होऊ शकत नाही. नाना आता आपल्यात नाही, यावर विश्वास बसत नाही. त्याच्याबरोबरचा सहवास, त्याचा स्वभाव, त्याच्या आठवणी या साऱ्यांचा पट डोळ्यांसमोर येत आहे. नाना अशा रीतीने अचानक सर्वांना चटका लावून निघून जाईल, असं कधी वाटलंही नव्हतं.
नानाच्या जाण्याचा धक्का बसण्याचं आणखी एक कारण म्हणजे तो शारीरिकदृष्ट्या अत्यंत तंदुरुस्त होता. स्वतःच्या शरीराची काळजी घेणारा, नियमित व्यायाम करून शरीर कमावलेला माणूस होता. स्वतःला फिट ठेवण्याकडे त्याचं सदैव लक्ष असायचं. काही आठवड्यांपूर्वी त्याने एखाद्याला तरुणालाही लाजवेल असा व्यायाम केल्याचे व्हिडिओ समाजमाध्यमांवर झळकले होते. स्वतःच्या जगण्याबाबत तो अतिशय शिस्तबद्ध होता. असा माणूस तडकाफडकी जातो, ही अविश्वसनीय बाब आहे.
नाना हा सर्वसामान्य माणूस नव्हता. त्याचं व्यक्तिमत्त्वच वेगळं होतं. त्याला समजून घेणं प्रत्येकाला जमायचं नाही. त्याचं बोलणं, वागणं, एखाद्या गोष्टीवर व्यक्त होणं हे सगळंच इतरांपेक्षा निराळं होतं. पण मला त्याचा स्वभाव चांगला माहीत होता. म्हणूनच मी नेहमी म्हणतो, नाना म्हणजे फणसासारखा माणूस. वरून काटेरी, पण आतून अतिशय गोड! त्याच्या बाहेरच्या स्वभावावरून त्याच्याविषयी मत बनवणाऱ्यांना त्याच्या मनातली माणुसकी कधीच समजली नसती.
नाना आणि माझ्या मैत्रीची सुरुवात अभिनयाच्या क्षेत्रातूनच झाली. 1978 सालची गोष्ट. त्यावेळी आम्ही विजयाबाईंच्या ‌‘हमीदाबाईची कोठी‌’ या नाटकाच्या निमित्ताने एकत्र आलो. नाना तेव्हा या क्षेत्रात नवखा होता. अभिनयाच्या क्षेत्रात त्याची ओळख निर्माण व्हायची होती. मात्र ‌‘हमीदाबाईची कोठी‌’मध्ये त्याने जी भूमिका केली, ती विलक्षण होती. त्याने आपल्या भूमिकेला अशा प्रकारे खुलवलं की, त्याचं नाव लगेच सर्वत्र पोहोचलं. नाना पाटेकर नावाचा एक नवीन आणि ताकदीचा अभिनेता रंगभूमीवर आला आहे, याची दखल घेतली जाऊ लागली. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिलंच नाही. पुढे तो आपल्या कर्तृत्वावर नाव कमावत गेला. स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करत गेला. त्याची कारकीर्द घडताना पाहण्याची संधी मला मिळाली, याचा मला आनंद होता.
या नाटकाच्या निमित्तानं आमचा साधारण आठ महिने जवळून सहवास आला. त्या काळात मला नाना खऱ्या अर्थाने समजला. त्याला माझा स्वभाव आवडला आणि मला त्याचा. आमच्या स्वभावात फरक होता, पण त्यामुळे आमच्या मैत्रीत कधी अडचण आली नाही. नाना स्पष्ट बोलायचा. चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट म्हणणारा असा त्याचा स्वभाव होता. एखादी गोष्ट पटली नाही, तर तो लगेच सांगायचा. मनात एक आणि ओठांवर दुसरं, असं त्याचं कधीच नसायचं. त्याचा हा स्वभाव काहींना खटकायचा. पण त्यामागे कोणताही आडपडदा नव्हता.
नानाबरोबरच्या अनेक आठवणी आहेत. त्यातला एक प्रसंग मी आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही. ‌‘हमीदाबाईची कोठी‌’च्या दौऱ्यावर असताना आम्ही एका गावात गेलो होतो. तिथे नाटकाचा प्रयोग होता. व्यवस्थित नाट्यगृह नव्हतं. एका गिरणीच्या जागेत प्रयोगाची व्यवस्था केली होती. प्रेक्षकांसाठी खुर्च्या लावल्या होत्या. मात्र रंगमंचाची व्यवस्था योग्य नव्हती. त्यामुळे प्रेक्षकांना नाटक नीट दिसत नव्हतं. हळूहळू प्रेक्षक नाराज झाले. गोंधळ सुरू झाला. काहींनी खुर्च्यांची मोडतोड सुरू केली. परिस्थिती हाताबाहेर गेली आणि नाटकाचा प्रयोग थांबवावा लागला. त्या गोंधळात आम्ही कलाकार अडकलो होतो. बाहेर पडणं कठीण झालं होतं. जमाव संतप्त झाला होता. अशा वेळी नानाने प्रसंगावधान राखलं. त्याने मला तिथून बाहेर काढण्याचं ठरवलं. आम्ही मागच्या बाजूने बाहेर पडलो. अंधारातून पळत सुटलो. वाटेत गटारही ओलांडावं लागलं. नानाने एक हातरिक्षा मिळवली. मला त्यात बसवलं आणि स्वतः ती रिक्षा ओढत तो मला रेस्टहाऊसवर घेऊन गेला.
मला सुरक्षित ठिकाणी पोहोचवल्यानंतरही तो स्वस्थ बसला नाही. इतर कलाकारांचीही त्याने व्यवस्था केली. अखेर रात्री तीनच्या सुमारास पोलिसांच्या संरक्षणात आम्ही त्या गावातून बाहेर पडलो. त्या दिवशी नाना नसता, तर माझं काय झालं असतं, याची कल्पनाही करवत नाही. त्याने अक्षरशः माझा जीव वाचवला होता. तो प्रसंग आठवला की नानाचं ते रूप डोळ्यांसमोर उभं राहतं.
नानाच्या स्वभावातली हीच गोष्ट मला फार महत्त्वाची वाटते. तो बोलायला कितीही कठोर असला, तरी माणसाच्या मदतीला धावून जाणारा होता. एखादा मित्र अडचणीत असेल, तर त्याच्यासाठी काहीही करण्याची त्याची तयारी असायची. गरज पडली तर अंगावरचे कपडे काढून देईल, असा तो माणूस होता. त्याचं प्रेम व्यक्त करण्याची पद्धत वेगळी होती. गोड बोलून, कौतुक करून प्रेम दाखवणाऱ्यांपैकी तो नव्हता. त्याची आपुलकी त्याच्या कृतीतून दिसायची.
नानाच्या सुरुवातीच्या संघर्षाच्या काळात त्याला आर्थिक अडचणी होत्या. त्या वेळी मी त्याला शक्य ती मदत केली होती. मित्र अडचणीत असताना त्याला मदत करणं यात मला काही विशेष वाटत नाही. पण नाना मात्र अनेक व्यासपीठांवरून याबाबतची कृतज्ञता व्यक्त करायचा. नानानेही मला अनेकदा मदत केली होती. त्याच्यावर माझा विश्वास होता. आमच्या मैत्रीत पैशाचा हिशेब कधी महत्त्वाचा नव्हता. पुढे त्याने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःचं स्वतंत्र स्थान निर्माण केलं. पण आमच्या नात्यातला जिव्हाळा कायम राहिला.
नानाच्या स्वयंपाकाची आणि जेऊ घालण्याच्या आवडीची आठवण काढल्याशिवाय त्याच्याविषयी बोलणे पूर्णच होऊ शकत नाही. नाना उत्तम स्वयंपाक करत होता, हे आज चित्रपटसृष्टीला ठाऊक आहे; पण त्याची ही आवड अगदी संघर्षाच्या काळापासूनची होती. नाटकांच्या दौऱ्यावर असताना किंवा मुंबईतील दिवसांमध्ये नानाने स्वतःच्या हाताने रुचकर मांसाहारी आणि शाकाहारी जेवण बनवून कितीतरी वेळा तृप्त केले. तो जितक्या उत्कटतेने अभिनय करायचा, तितक्याच तन्मयतेने आणि मायेने तो लोकांना जेवू घालायचा, हे मी कायम अनुभवले आहे. जेवणाच्या पंगतीत नानाचा जो आग्रही आणि प्रेमळ स्वभाव दिसायचा, तो त्याच्या बाह्य रागीट प्रतिमेला पूर्णपणे छेद देणारा असायचा.
नानाची संवादफेक, त्याच्या चेहऱ्यावरचे भाव, भूमिकेत पूर्णपणे समरस होण्याची त्याची पद्धत वेगळी होती. पडद्यावर तो जितक्या ताकदीने उभा राहायचा, तितक्याच ठामपणे तो प्रत्यक्ष आयुष्यातही वागायचा. सामाजिक लोकजीवनात त्याने स्वतःची एक ओळख निर्माण केली होती. त्याचं अनुकरण करणं सोपं नव्हतं. मला त्याच्यातल्या अभिनेत्यापेक्षा त्याच्यातला माणूस अधिक जवळचा वाटत राहिला. कारण मी त्याला रंगमंचावर पाहिलं होतं, तसंच संकटाच्या प्रसंगीही पाहिलं होतं. त्याचा राग, त्याचा स्पष्टवक्तेपणा आणि त्याच्या मनातली आपुलकी अनुभवली होती. आज नाना आपल्यात नाही. त्याच्या कितीतरी आठवणी मनात आहेत. नानासारखी माणसं पुन्हा भेटणं कठीण असतं. संघर्षाच्या दिवसांत थकून आल्यावर मित्राचे पाय चेपणारा, संकटाच्या क्षणी रिक्षाचे हँडल हातात धरून माझा जीव वाचवणारा, अतिशय प्रेमाने जेवण वाढणारा आणि यशाची कसलीही हवा डोक्यात न जाऊ देणारा तो एक खराखुरा, सच्चा माणूस म्हणून माझ्या मनातील नानाचे स्थान सदैव कायम राहील.
(शब्दांकन ः विधिषा देशपांडे)

Check Also

कतरीनाच्या ट्रोलिंगवरुन खळबळ

बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री कतरिना कैफ सध्या तिच्या वाढलेल्या वजनामुळे सोशल मीडियावर होत असलेल्या अवाजवी ट्रोलिंगमुळे …