लेख-समिक्षण

अपरिहार्य ‌‘कपात ‌’

महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या एका निर्णयाप्रमाणे येत्या 16 ऑक्टोबरपासून राज्यात सर्वत्र दहा टक्के पाणीकपात केली जाणार आहे. राज्यातील ग्रामीण भागाला सध्या दुष्काळाचा तीव्र चटका बसत असतानाच निर्णयाप्रमाणे आता राज्य सरकारच्या या राज्यातील नागरी भागांमध्येही पाणीकपात केली जाणार आहे. हा निर्णय अत्यंत व्यवहारी आणि स्वागतार्ह असाच मानावा लागेल. कारण राज्य सरकारने गेल्या आठवड्यात जेव्हा राज्यामध्ये दुष्काळ जाहीर केला, तेव्हा 75 टक्क्यांपेक्षा जास्त महाराष्ट्र हा दुष्काळग्रस्त असल्याचेही सांगण्यात आले होते. राज्यातील मोठमोठी नगरे किंवा महानगरे आहेत, त्यामधील नागरिकांना किंवा काही प्रमाणात तेथील प्रशासनालासुद्धा ग्रामीण भागातील महाराष्ट्र जे काही भोगत आहे त्याची जाणीव नसावी अशा घटना सातत्याने समोर येताना दिसत होत्या. ग्रामीण भागात सामान्य नागरिकांना शेतीसाठी पाणी नाही हा तर विषय आहेच, पण या नागरिकांना पिण्यासाठी आणि जनावरांची तहान भागवण्यासाठीसुद्धा पाण्याची टंचाई असताना महानगरांमध्ये गाड्या धुण्यासाठी आणि इतर अनावश्यक कामे करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत होता. त्याच्या कथा समोर येऊ लागल्यानंतर आता अशा प्रकारची पाणीकपात अपरिहार्यच मानावी लागेल.
अर्थात केवळ सरकारने एखादा निर्णय घेतला म्हणून अशाप्रकारे दहा टक्के पाणी वाचवले जात असेल तर महानगरातील नागरिकांमध्ये पाणी वाचवण्याबाबत पुरेशी जागृती झाली नाही असेच म्हणावे लागेल. ‌’पाणी वाचवा‌’ ही केवळ सातत्याने उच्चारावी लागणारी अशी म्हण नसून कृतीमध्ये आणण्याची गोष्ट आहे हे सर्वांच्याच मनावर बिंबवावे लागणार आहे. मुळात गेल्या 11 वर्षांमध्ये सर्वात कोरडा हंगाम म्हणून यंदाचा उल्लेख करावा लागेल. यावर्षी मान्सूनमध्ये नैसर्गिक पद्धतीने जे पाणी पृथ्वीवर येते, त्यामध्ये महाराष्ट्राचा विचार करता 12% कपात झाली आहे. साहजिकच जे पाणी आता उपलब्ध आहे ते पुढील मान्सूनच्या हंगामापर्यंत कोणत्याही परिस्थितीत पुरवावे लागणार आहे. या उपलब्ध पाण्याचा वापर कसा करावयाचा याचा निर्णय राज्य सरकारच्या हातात असतोच. पण सर्वसामान्य नागरिकांनीसुद्धा पाणी वाचवण्यासाठी आपले प्राधान्यक्रम ठरवण्याची गरज आहे. सरकार जर त्यांच्या पातळीवर पाणी वाचवण्यासाठी विविध उपाय योजना करत असेल तर नागरिकांनी आपल्या पातळीवरसुद्धा गंभीरपणे पाणी वाचवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. दररोज पाण्याचे सडे घालून आपले अंगण स्वच्छ करण्याची गरज नाही किंवा दररोज गाड्या धुण्याचीही गरज नाही. आज भरलेले पाणी उद्या शिळे होणार म्हणून ते ओतून परत नव्याने भरणे यासारखे पाप सध्याच्या काळात दुसरे कोणतेही असणार नाही. — आशिष जोशी

Check Also

टीकेची नीचांकी पातळी

इंदूर येथे आयोजित ‌‘छात्रों की गूंज‌’ या कार्यक्रमात काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत एका …