लहान मूल म्हणजे मातीचा गोळा. आपण त्यांना जसे घडवत जाऊ तसतसे ते आकार घेत जातात. आजकाल मुलांमध्ये खूप बदल झाला आहे, त्यांची निरागसता कमी होत चालली आहे आणि ते कुटुंबापासून दूर जात आहेत, असे बोलले जाते. यय परिस्थितीत त्यांना कुटुंबाची, आपल्या संस्कृतीची, परंपरांची ओळख करुन देणे गरजेचे आहे.
हल्ली मुलांना सणांमागचा खरा अर्थच माहीत नसतो. त्यांना एवढेच कळते की, होळीमध्ये गोंधळ घालायचा, दिवाळीत फटाके फोडायचे, शॉपिंग करायचे, सुट्टया आहेत म्हणून फिरायला जायचे वगैरे… अशा काळात पालकांनी विशेषतः आयांनी आपल्या सणांमागील धार्मिक, सामाजिक, कौटुंबिक आणि वैज्ञानिक महत्त्व आणि अर्थ मुलांना सांगायला हवा. प्रत्येक सण साजरा करण्यामागे एक खास कारण आहे, मग तो ऋतू बदल असो किंवा सामाजिक संदेश असो किंवा आरोग्याशी संबंधित रितीरीवाज असेोत, याची मुलांना ओळख व जाणीव करून द्या. संक्रांतीसारख्या सणांमागील वैज्ञानिक पैलू समजावून सांगा. त्यांच्याशी संबंधित कथा या रुपकात्मक असल्या तरी त्यातील गहिरा अर्थ सांगा. सणानिमित्त करावयाच्या विविध पदार्थांमागे आरोग्य जपण्याचे कारण काय आहे हे समजावून सांगा. जेणेकरून मुलेही उत्सुक होऊन सण उत्साहात साजरे करतील. आज विभक्त कुटुंबपद्धती खूप वाढली आहे. महानगरात तर मुले नातेवाईकांना नीटसे ओळखत नाहीत. नातेवाईक आले तरी मुलांना खूप अस्वस्थ वाटते. त्यांना ना त्यांच्याशी सामंजस्याने वागायचे असते आणि ना त्यांना त्यांची खोली आणि त्यांच्या वस्तू शेअर करायच्या असतात. अशा परिस्थितीत मुलांना सणासुदीच्या वेळी आप्तेष्टांसोबत एकत्र जमण्याचे, धमाल करण्याचे महत्त्व समजावू न सांगायला हवे. यासाठी आपण मुलांना नातेवाईकांच्या ठिकाणी घेऊन जाऊ शकता किंवा त्यांना आपल्या घरी बोलावू शकता. यामुळे मुलांचा एकटेपणा दूर होईल आणि त्यांना कौटुंबिक संस्कृतीची ओळख होईल. याखेरीज गावाखेड्यातील होळी, दिवाळी, जन्माष्टमी कशी साजरी होते हे दाखवण्यासाठी त्यांना सणांच्या दिवशी सहल म्हणूनही एखाद्या गावी नातेवाईकांकडे, पाहुण्यांकडे नेता येईल. मुले जेव्हा त्यांच्या वडीलधाऱ्यांना आणि चुलत भावंडांना भेटतात तेव्हा त्यांच्याशी खेळल्या-बागडल्यामुळे आनंदी होतात. यातून त्यांच्यात आपुलकीची भावना वाढेल.
सणासुदीच्या काळात साफसफाई, डेकोरेशन, खरेदी आणि इतर नियोजनासाठी संपूर्ण कुटुंब एकत्र येते. मुलांना यामध्ये सहभागी करून घ्या आणि त्यांच्यावर काही कामाची जबाबदारीही सोपवा. यातून ते कामात मदत करायला शिकतील. घरातील कामं केल्याने मुलांमध्ये आत्मविश्वास वाढतो असं संशोधन सांगतं. त्यांच्यात जबाबदारीची भावना, काम पूर्ण करण्याची भावना वाढीस लागते. हे करत असताना केवळ आपल्याच नव्हे तर इतर धर्माच्या सणांची माहिती आणि महत्त्व समजावून सांगा. मुलांना प्रत्येक धर्माचा आदर करायला शिकवा. सण आपल्याला जवळ आणतात. एखादा मित्र किंवा नातेवाईक बराच काळ रागावला असेल, तर ही नाराजी दूर करण्यासाठी सण आपल्याला मोठी संधी देतात. सण आपल्यातील द्वेष दूर करण्याचे सर्वांत चांगले निमित्त ठरू शकते हे मुलांना शिकवायला हवे. आपल्या भावना आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी भेटवस्तू किंवा मिठाई देण्यातून मनातील कटूता दूर होऊन, मनावरचे ओझे हलके होते आणि नातेसंबंधांतील गोडवा वाढतो. यासाठी मुलांना नातेवाईक किंवा मित्रासाठी ग्रीटिंग कार्ड बनवायला किंवा रंगवायला सांगता येईल. तुमचे बालपणीचे अनुभव मुलांना सांगा. तुमच्या काळात हे सण कसे साजरे केले जात होते ते सांगा. सणाच्या दिवशी वाईट बोलू नये, वाईट विचार करू नये, वाईट वागू नये, असे सांगितले जाते. यातून सण आपल्याला आनंदी आणि सकारात्मक राहायला शिकवतात, हे मुलांच्या मनावर बिंबवता येईल.
Check Also
सुंदर आणि वाचनीय हस्ताक्षरासाठी….
सुंदर आणि नीटनेटके अक्षर असावे, अशी अनेकांची इच्छा असते. चांगले हस्ताक्षर केवळ जन्मजात मिळते असे …
पांचजन्य वृत्तपत्र