अंडरवर्ल्ड आणि गुन्हेगारी विश्वाचे वास्तववादी चित्रण करण्यासाठी ओळखले जाणारे ज्येष्ठ दिग्दर्शक राम गोपाल वर्मा पुन्हा एकदा एका नव्या क्राईम ड्रामा चित्रपटासह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. ’पोलीस कंपनी’ असे या नव्या चित्रपटाचे नाव असून, पुढील वर्षी चार जून रोजी हा चित्रपट देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित केला जाणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.
या चित्रपटात अभिनेता हर्षवर्धन राणे मध्यवर्ती भूमिकेत दिसणार असून, तो मुंबईतील प्रसिद्ध एन्काउंटर स्पेशालिस्ट पोलीस अधिकारी दया नायक यांच्या व्यक्तिरेखेला पडद्यावर साकारत आहे. याशिवाय फरदीन खान, फातिमा सना शेख आणि परेश रावल यांसारखे मातब्बर कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये झळकणार आहेत. सत्य घटना आणि वास्तविक पात्रांवर बेतलेल्या या कथानकात मुंबईतील सुमारे तीनशे गुंडांचा खात्मा करणाऱ्या थरारक मोहिमा आणि त्यामागची सामाजिक-राजकीय पार्श्वभूमी प्रभावीपणे मांडण्यात येणार आहे.
गुलशन कुमार आणि टी-सीरिज प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार, कृष्ण कुमार आणि राम गोपाल वर्मा यांनी केली आहे. ‘सत्या’ आणि ’कंपनी’ यांसारख्या कलाकृतींमधून राम गोपाल वर्मा यांनी यापूर्वी मुंबईतील अंडरवर्ल्डची पाळेमुळे दाखवली होती. मात्र यावेळी कथा गुन्हेगारांपेक्षा त्यांच्यावर कठोर कारवाई करणाऱ्या पोलीस यंत्रणेवर आणि अधिकाऱ्यांच्या मानसिकतेवर केंद्रित असल्याने या चित्रपटाबाबत चित्रपट वर्तुळात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.
Check Also
कोमल राणीचे रोखठोक प्रत्युत्तर
ज्येष्ठ अभिनेते गोविंदा आणि त्यांच्या पत्नी सुनीता आहुजा यांच्या वैवाहिक आयुष्यातील वादळाची चर्चा गेल्या काही …
पांचजन्य वृत्तपत्र