इंदूर येथे आयोजित ‘छात्रों की गूंज’ या कार्यक्रमात काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत एका विनोदी कलाकाराने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची केलेली नक्कल सध्या राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चेचा आणि वादाचा विषय ठरली आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात, राहुल गांधी यांनी एका विनोदी कलाकाराला पाचारण करून देशाच्या प्रमुखांची नक्कल करण्यास प्रोत्साहन देणे आणि स्वतः त्यात सहभागी होणे हे अत्यंत खेदजनक मानले जात आहे. नेते, अभिनेते किंवा प्रख्यात व्यक्तींची नक्कल करणे हा करमणुकीचा भाग असला, तरी एका प्रमुख विरोधी पक्षाच्या सर्वोच्च नेत्याने विद्यार्थ्यांच्या विचारमंचाचा वापर यासाठी करणे नक्कीच अयोग्य आहे. या सादरीकरणादरम्यान परराष्ट्र धोरणाचीही टिंगल उडवली गेली. एका कार्यक्रमात वरिष्ठ नागरिकांप्रती आदर दाखवत वृद्ध महिलेला खुर्ची देण्याच्या प्रधनामंत्र्यांच्या कृतीचाही उपहासात्मक वापर करण्यात आला. एखाद्या ज्येष्ठ नागरिकाप्रती दाखवलेल्या या सहज आणि मानवी आदराची थट्टा करणे हा राजकारणाचा नीचांकी स्तर आहे. मात्र, काँग्रेस पक्षाने या सर्व प्रकाराचे समर्थनच केले आहे. आजकाल विनोदाच्या नावाखाली अत्यंत फालतूपणा आणि अशोभनीय वर्तनाचा अतिरेक होताना दिसत आहे. परंतु, थेट विरोधी पक्षनेत्याच्या व्यासपीठावरून अशा गोष्टी होणे हे देशातील राजकीय भाषेचा आणि संस्कृतीचा स्तर किती वेगाने खालावत आहे याचेच जिवंत उदाहरण आहे. राजकारणातील ही घसरण केवळ एका पक्षापुरती मर्यादित नसून, यात सर्वच राजकीय पक्षांचा कमी-अधिक प्रमाणात सहभाग आहे. आजचे राजकीय पक्ष एकमेकांना वैचारिक प्रतिस्पर्धी न मानता थेट शत्रू मानू लागले आहेत, आणि ही शत्रूत्वाची भावना आता समाजातही पसरू लागली आहे.
यापूर्वीही इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्याबाबत काँग्रेसचे माजी खासदार संदीप दीक्षित यांनी केलेल्या असभ्य वक्तव्यावर राहुल गांधी हसताना दिसले होते. पंतप्रधानांबद्दल बोलताना ‘चोर’ किंवा ‘भित्रे’ यांसारख्या शब्दांचा वापर करणे आणि वैयक्तिक पातळीवर टीका करणे ही नवी बाब राहिलेली नाही. जेव्हा सत्ताधारी पक्ष यावर आक्रमक होतो, तेव्हा काँग्रेसचे नेते त्याचा बचाव करतात आणि त्या प्रत्युत्तरात भाजपच्या नेत्यांकडूनही मर्यादा ओलांडणारी वक्तव्ये केली जातात. पूर्वी केवळ निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राजकीय चिखलफेक आणि आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळायचे. परंतु, आता हा असभ्यपणा आणि भाषेची घसरण नित्यनियमाची झाली असून, संसदेच्या आत आणि बाहेरही त्याचे पडसाद उमटत आहेत. राजकीय विरोधासाठी भाषेची मर्यादा ओलांडणे आणि वैयक्तिक टीका करणे हे निरोगी लोकशाहीसाठी अत्यंत घातक आणि चिंतेचे लक्षण ठरत आहे.- मिथिला शौचे
Check Also
विश्वासाची कसोटी
निवडणुकीचा निकाल कोणाच्या बाजूने लागतो, यापेक्षा तो निकाल ज्या प्रक्रियेतून आला त्या प्रक्रियेवर पराभूत पक्षाचाही …
पांचजन्य वृत्तपत्र