‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री जान्हवी किल्लेकर सध्या तिच्या एका अजब आणि रंजक किस्स्यामुळे सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. एका मराठी चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान तिला चक्क बिस्लेरीच्या पाण्याच्या बाटल्या मागवून अंघोळ करावी लागली होती. एका मुलाखतीदरम्यान जान्हवीने स्वतः हा भन्नाट अनुभव शेअर केला असून तिच्या या वक्तव्याने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. संवेदनशील त्वचा आणि बदलत्या वातावरणाचा थेट परिणाम होत असल्याने तिला हा निर्णय घ्यावा लागला होता.
जान्हवी सध्या ‘सायको रंगा’ या नवीन मराठी चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचे एक महत्त्वाचे शूटिंग शेड्यूलिंग कोल्हापूर येथे पार पडले. कोल्हापुरात शूटिंग सुरू असताना तेथील हवामान आणि पाणी तिच्या त्वचेला सूट होत नव्हते. मुंबईच्या पाण्याची सवय असल्याने बाहेरच्या ठिकाणच्या पाण्यामुळे त्वचेची ॲलर्जी होण्याची मोठी भीती तिला वाटत होती. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून तिने स्थानिक नळाच्या पाण्याऐवजी थेट पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांचा वापर करण्याचा निर्णय घेतला.
या संपूर्ण प्रकरणासाठी तिला दररोज बिस्लेरीच्या अनेक मोठ्या बाटल्या खरेदी कराव्या लागत होत्या आणि या पाण्याचा सर्व खर्च तिने स्वतःच केला होता. जान्हवीचा हा किस्सा सध्या नेटिझन्समध्ये चांगलाच व्हायरल होत आहे. दरम्यान, तिचा ‘सायको रंगा’ हा चित्रपट नुकताच संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात ॲक्शन आणि गूढ कथेचा थरार पाहायला मिळत आहे. या चित्रपटात जान्हवीसोबत स्मिता गोंदकर, सुबोध भावे, पुष्कर जोग आणि मिलिंद शिंदे यांसारख्या तगड्या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत.- किर्ती कदम
Check Also
दोन कोटींत बनलेल्या चित्रपटाची ‘हनुमान’उडी!
चित्रपटसृष्टीत भव्यदिव्य सेट, तगडी स्टारकास्ट आणि कोट्यवधींचा बजेट म्हणजेच सिनेमा हिट होण्याचे सूत्र, असा एक …
पांचजन्य वृत्तपत्र