लेख-समिक्षण

कतरीनाच्या ट्रोलिंगवरुन खळबळ

बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री कतरिना कैफ सध्या तिच्या वाढलेल्या वजनामुळे सोशल मीडियावर होत असलेल्या अवाजवी ट्रोलिंगमुळे चर्चेत आली आहे. नोव्हेंबर महिन्यात पती विकी कौशल आणि कतरिनाने आपल्या पहिल्या बाळाचे जगात स्वागत केले होते. बाळ झाल्यानंतर नुकतीच कतरिना एका सार्वजनिक गणेशोत्सव कार्यक्रमात सहभागी झाली होती. या कार्यक्रमातील तिचे फोटो आणि व्हिडिओ समोर आल्यानंतर काही विकृत नेटकऱ्यांनी तिच्या शरीरयष्टीवर आणि वाढलेल्या वजनावर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन भाष्य करण्यास सुरुवात केली.
कतरिनावर होत असलेल्या या बिनबुडाच्या बॉडी शेमिंगवर माजी राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले की, महिलांनी आपल्या शरीरात होणाऱ्या बदलांबद्दल किंवा वजनाबद्दल कोणालाही स्पष्टीकरण देण्याची अजिबात गरज नाही. त्यांच्या या भूमिकेला अभिनेत्री खुशबू सुंदर यांनीही पाठिंबा दिला. स्त्रीच्या मातृत्वानंतरच्या नैसर्गिक बदलांचा आदर करण्याऐवजी तिची अशी तुलना करणे ही अत्यंत दुर्दैवी मानसिकता असल्याचे त्यांनी नमूद केले.
या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेत बॉलिवूडचा ‌‘दबंग‌’ सलमान खान यानेही कतरिनाच्या समर्थनार्थ थेट मैदानात उतरणे पसंत केले. एका टेलिव्हिजन शोच्या मंचावरून बोलताना सलमानने ट्रोलर्सचा खरपूस समाचार घेतला. मातृत्वानंतर स्त्रीच्या शरीरात बदल होणे ही अत्यंत नैसर्गिक प्रक्रिया आहे, असे सांगत सलमान म्हणाला की, एखाद्या महिलेच्या दिसण्यावर भाष्य करणे ही असंवेदनशीलतेची पराकाष्ठा आहे. कतरिना तिच्या फिटनेसबाबत अत्यंत शिस्तप्रिय असून तिला योग्य वेळ देणे गरजेचे आहे, अशा शब्दांत सलमानने ट्रोलर्सची बोलती बंद केली.- जान्हवी शिरोडकर

Check Also

अभिनय बेर्डेचा ‌‘अल्पविराम‌’

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय तरुण अभिनेता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनय बेर्डेने आपल्या अभिनय कारकिर्दीतून काही काळासाठी …