लेख-समिक्षण

जन्मानंतर बाळाचा रंग सावळा का होतो ?

बाळ जन्माला आले की, त्याचे गुलाबी-पांढरे रूप पाहून सर्वच जण सुखावतात. मात्र, काही आठवड्यांनंतर हळूहळू बाळाचा हा रंग बदलू लागतो आणि ते सावळे दिसू लागते. अशा वेळी नातेवाईक किंवा शेजाऱ्यांच्या टोकण्यामुळे पालकांच्या मनात धडकी भरते. बाळ ‌’गोरे‌’ व्हावे यासाठी मग हळद, चंदन किंवा गव्हाच्या पिठाचे उटणे लावण्यासारखे प्रयोग केले जातात. मात्र, यामुळे बाळाची नाजूक त्वचा अधिक कोरडी आणि काळवंडलेली होऊ शकते.
1. बाळ जन्माला येते तेव्हा त्याच्या त्वचेत ‌‘मेलानिन‌’ (त्वचेला रंग देणारा घटक) अत्यंत कमी प्रमाणात असते. मात्र, बाळ जसे बाह्य जगाच्या आणि सूर्यप्रकाशाच्या संपर्कात येते, तसे त्याच्या शरीरात मेलानिन तयार होण्याची प्रक्रिया नैसर्गिकरित्या वेग पकडते. यामुळे जन्माच्या वेळी ‌‘गुलाबी‌’ दिसणारे बाळ काही आठवड्यांनंतर आपल्या मूळ जनुकीय रंगात येते, जो त्याला त्याच्या माता-पित्यांकडून मिळालेला असतो.
2. बहुतांश नवजात बालकांना जन्मानंतरच्या सुरुवातीच्या दिवसांत सौम्य कावीळ होते. यामुळे त्यांच्या डोळ्यांत आणि त्वचेवर पिवळसर छटा दिसते. जेव्हा ही कावीळ बरी होते, तेव्हा त्वचा काहीशी गडद किंवा काळवंडल्यासारखी वाटू शकते. डॉ. अनुराधा यांच्या मते, ही एक सामान्य प्रक्रिया असून यकृत (लिव्हर) पूर्णपणे सक्रिय झाले की ही स्थिती सुधारते, मात्र या काळात रंग बदलल्याचा भास होतो.
3. पारदर्शक त्वचा आणि रक्तभिसरण नवजात बाळांची त्वचा अत्यंत पातळ आणि पारदर्शक असते. यामुळे त्यांच्या शरीरातील रक्तवाहिन्या स्पष्टपणे दिसतात आणि बाळ लालसर किंवा गुलाबी दिसते. जसजसे बाळ मोठे होते, तसे त्याच्या त्वचेचे थर जाड होऊ लागतात. बाह्य हवामान आणि तापमानामुळे त्वचेचा वरचा थर काहीसा कडक होतो. परिणामी, जन्माच्या तुलनेत बाळाचा रंग थोडा गडद दिसू लागतो.
बाळाच्या रंगापेक्षा त्याचे आरोग्य आणि त्वचेचा मऊपणा महत्त्वाचा आहे. जाहिरातींना बळी पडून किंवा कोणाच्या सांगण्यावरून कोणत्याही क्रिम्सचा वापर करू नका.

Check Also

मुलाखतीतील उणेअधिक

मुलाखतीत स्वतःच्या बलस्थानांविषयी सांगणे ही आपली पात्रता सिद्ध करण्याची मोठी संधी असते. तर स्वतःच्या उणिवा …