लेख-समिक्षण

बच्चू कडू यांची ‌‘प्रहार‌’ इतिहासजमा

विधानपरिषदेची आमदारकी मिळवण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी प्रहार जनशक्ती पक्ष शिंदेसेनेत विलीनीकरण करण्यास सहमती दिली आहे. ‌‘एकनाथ शिंदे यांच्यासोबत सविस्तर चर्चा झाल्याशिवाय विलीनीकरण शक्य नाही. मात्र शिवसेना ही आपल्या मातीतील संघटना आहे. भविष्यात प्रहारचे विलीनीकरण झाले तरी हरकत नाही, असे बच्चू कडू म्हणाले. एक लढाऊ संघटनेची निर्मिती सत्तेसाठी करण्यात आली होती आणि ती संघटना सत्तेसाठी विलीन करण्यात आली.
प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून विधानपरिषदेवर जाणार असल्याची जोरदार चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुुरू होती. या पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. शिंदेसेना प्रवेश आणि विधानपरिषद उमेदवारी याबाबत अधिकृत घोषणा करणे कडू यांनी टाळले असले तरी शिंदेसेनेत प्रवेशाचे स्पष्ट संकेत त्यांनी पत्रकार परिषदेतून दिले. विधानपरिषद उमेदवारी आणि शिवसेनेतील प्रवेशाबद्दल बोलताना बच्चू कडू म्हणाले की, विधानपरिषद उमेदवारीबद्दल मलाही मीडियातूनच माहिती कळाली आणि कदाचित एकनाथ शिंदे यांनाही तुमच्याकडूनच याबाबत माहिती मिळाली असेल. माझी याबाबत उदय सामंत यांच्यासोबत काही वेळा चर्चा झाली आहे, मात्र एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक झालेली नाही. आता मीडियातून ही चर्चा सुरू झाल्यानंतर आम्ही आमचे शेतकऱ्यांचे, शेतमजुरांचे आणि दिव्यांग बांधवांचे काही प्रश्न एकनाथ शिंदे यांच्यासमोर मांडू. त्या प्रश्नांवर जर एकनाथ शिंदे सकारात्मक असतील तर विधानपरिषदेचा आम्ही विचार करू. पत्रकार परिषदेनंतर त्यांनी भेटायला बोलावले तर मी त्यांची भेट घेईन, अशी माहिती त्यांनी दिली.
दरम्यान, शेतकरी मतदारांनी आपल्याला नाकारल्याची खंत यावेळी बच्चू कडूंनी बोलून दाखवली. ते म्हणाले की, प्रहार ही कार्यकर्त्यांनी निर्माण केलेली संघटना आहे. विलीनीकरणाच्या बातम्या मी वाचत होतो, तेव्हा मला दु:ख वाटत होते. मी पूर्वी शिवसैनिकच होतो. शिवसेनेच्या बंडखोरीतून प्रहारची निर्मिती झाली. आम्ही आजपर्यंत कुणाचाही पाठिंबा घेतला नाही. कायम तटस्थ भूमिका घेतली. प्रामाणिकपणे आणि तत्वाला धरून आम्ही काम केले. फार लढलोय. कर्जमाफीची घोषणा झाल्यानंतर आम्हाला शेतकऱ्यांकडून अपेक्षा होती की, ते आम्हाला शाबासकी देतील. पण ते झाले नाही. आज जनतेपर्यंत जाणारा बच्चू कडू नेत्यापर्यंत का जातोय याचे कारणही जनताच आहे. आम्हाला विधानसभेत हार खावी लागली. एकंदरीत देशातले राजकारण जात, धर्माच्या ताकदीवर चालते. काम करणाऱ्या कार्यकर्त्याला मागे राहावे लागते, असे ते म्हणाले.
दरम्यान, शिवसेनेत विलिनीकरणासंदर्भात एकनाथ शिंदे व उदय सामंत यांच्याशी झालेल्या चर्चेबाबत बच्चू कडूंनी यावेळी माहिती दिली. शिवसेनेकडून प्रस्तावाच्या चर्चा माध्यमांमधूनच माझ्यापर्यंत पोहोचल्या. एकदा एकनाथ शिंदेंशी ओघवती भेट झाली होती, असे त्यांनी सांगितले. विलीनीकरणाचा प्रस्ताव स्वीकाराल का? असे विचारले असता बच्चू कडू म्हणाले की, चर्चा व्हायला पाहिजे. शेतकऱ्यांचे मुद्दे महत्त्वाचे आहेत. शिंदेंनी उमेदवारी दिली तर विधानपरिषदेत त्यांचे पाईक म्हणून काम करू, मेहनतीने काम करू, शिवसेना किती वाढवायची त्यासाठीही प्रयत्न करू. शेतकऱ्यांच्या मुद्यासोबत जर मोठा पक्ष पाठिशी उभा राहात असेल तर त्यावर चर्चा होऊ शकते. पण चर्चेचा प्रस्ताव येतो की नाही ते पाहावे लागेल. निरोप आला तर भेटू आपण. भेटायला काय हरकत आहे? असा मुद्दाही त्यांनी मांडला.

Check Also

विचित्र कोंडीत आखाती युद्ध

आखाती युद्धाला 55 दिवस झाले आहेत आणि युद्ध एकाच वेळी शांतता आणि संघर्ष या विचित्र …