जिद्द, योग्य कल्पना आणि बदलत्या काळाची अचूक ओळख असेल तर यशासाठी मोठ्या भांडवलाची गरज नसते, हे राजस्थानमधील 22 वर्षीय जसपाल सिंह सिंधल यांनी सिद्ध करून दाखवले आहे. कोरोनाच्या लॉकडाऊनच्या काळात बारावीचा विद्यार्थी असलेल्या जसपालकडे महागडा कॅमेरा किंवा संगणक नव्हता. केवळ स्मार्टफोनच्या मदतीने त्यांनी प्रेरणादायी भाषणे, टेड टॉक्स आणि विविध नामवंत व्यक्तींच्या भाषणांतील महत्त्वाचे भाग निवडून लहान व्हिडिओ तयार करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला हा केवळ प्रयोग होता; मात्र त्यातूनच पुढे कोट्यवधी रुपयांच्या व्यवसायाची पायाभरणी झाली.
एक दिवस गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांच्या भाषणाचा छोटा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला. या क्लिपला तब्बल 2.5 कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आणि जसपाल यांना या क्षेत्रातील व्यावसायिक संधीची जाणीव झाली. त्यानंतर युट्युुब शॉटस् लोकप्रिय होताच त्यांच्या लर्न विथ जसपाल या चॅनेलची झपाट्याने वाढ झाली. 2021 मध्ये अवघे 30 हजार सदस्य असलेले हे चॅनेल 2022 मध्ये काही महिन्यांतच 20 लाखांहून अधिक सदस्यांपर्यंत पोहोचले. सुरुवातीला महिन्याला काहीशे डॉलरची कमाई करणाऱ्या जसपाल यांच्या उत्पन्नात व्हिडिओंना कोट्यवधी व्ह्यूज मिळाल्यानंतर मोठी वाढ झाली. मात्र त्यांनी केवळ जाहिरातींच्या उत्पन्नावर अवलंबून न राहता योग्य वेळी व्यवसायाचे स्वरूप बदलले.
युट्युबने पुनर्वापर केलेल्या आशयाबाबतचे नियम कडक केल्यानंतर त्यांनी ‘इनफ्ल्युएक्स’ ही कंपनी सुरू केली. आज त्यांच्या एकूण उत्पन्नापैकी सुमारे 90 टक्के हिस्सा ब्रँड्स, पॉडकास्ट निर्माते आणि विविध संस्थांसाठी क्लिपिंग मोहिमा राबविण्यातून मिळतो. दीर्घ मुलाखती, पॉडकास्ट किंवा भाषणे यांतील प्रभावी भाग निवडून त्यांचे आकर्षक शॉर्ट्स आणि रील्स तयार करून अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचविणे, हा या व्यवसायाचा गाभा आहे.
सुरुवातीला यूट्यूबवरून जसपाल यांना अवघे 400 डॉलर इतके उत्पन्न मिळाले होते. मात्र त्यांच्या व्हिडिओंना एकूण 30 कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाल्यानंतर चित्र पूर्णपणे बदलले. केवळ एका महिन्यात त्यांचे उत्पन्न तब्बल 8,000 डॉलर, म्हणजेच सुमारे 6.5 लाखांपर्यंत पोहोचले. जसपाल यांच्या कंपनीत आज 15 जण काम करतात. त्यामध्ये त्यांच्या गावातील अनेक तरुण आणि शिक्षण अर्धवट सोडलेले युवकही आहेत. यापैकी काहींचे मासिक उत्पन्न सुमारे 50,000 पर्यंत पोहोचले आहे.
Check Also
एक हत्यार…किंमत पाच अब्ज!
काळाच्या ओघात शस्त्रास्त्रांचेही स्वरूप बदलत गेले. आधुनिक काळात अनेक प्रकारची शस्त्रे व अस्त्रे पाहायला मिळतात. …
पांचजन्य वृत्तपत्र