आजच्या स्पर्धात्मक तंत्रज्ञानविश्वात जागतिक दर्जाच्या बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये कोट्यवधी रुपयांचे वार्षिक पॅकेज मिळवण्यासाठी ‘आयआयटी’सारख्या नामांकित संस्थेची पदवी आवश्यक मानली जाते. मात्र, कर्नाटकातील एका दुर्गम गावातून आलेल्या पृथ्वीराजने हा समज पूर्णपणे खोटा ठरवला आहे. कोणत्याही प्रतिष्ठित संस्थेचा शिक्का नसतानाही केवळ स्वतःच्या कौशल्याच्या, सातत्यपूर्ण मेहनतीच्या आणि जिद्दीच्या बळावर त्याने जगातील आघाडीची चिप आणि कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान कंपनी ‘एनव्हिडिया’मध्ये तब्बल 2.6 कोटी रुपयांच्या वार्षिक पॅकेजसह स्थान मिळवले आहे.
सध्या पृथ्वीराज ‘एनव्हिडिया’च्या ‘डीप लर्निंग’ टीममध्ये कार्यरत आहे. ही टीम कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगाला गती देणाऱ्या अत्याधुनिक संगणकीय चिप्स आणि तंत्रज्ञानाच्या विकासावर काम करते. एका दुर्गम गावातून जागतिक तंत्रज्ञानाच्या केंद्रस्थानी पोहोचणे, ही त्याच्या प्रवासाची सर्वात मोठी जमेची बाजू ठरली आहे. पृथ्वीराजने बेंगळुरू येथील ‘पीईएस युनिव्हर्सिटी’मधून इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले. तो ‘आयआयटी’चा विद्यार्थी नसला, तरी कॉलेजच्या काळात त्याने केवळ अभ्यासक्रमापुरते स्वतःला मर्यादित ठेवले नाही. विविध तांत्रिक प्रकल्प, इंटर्नशिप, ओपन-सोर्स उपक्रम आणि स्वतःहून नवीन तंत्रज्ञान शिकण्यावर त्याने भर दिला. उद्योगक्षेत्राला आवश्यक असलेली कौशल्ये आत्मसात करत त्याने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.
त्याचा प्रवास मात्र मुळीच सोपा नव्हता. चित्रदुर्ग जिल्ह्यातील ज्या गावातून तो आला, तेथे काही वर्षांपूर्वीपर्यंत दर्जेदार इंटरनेट आणि तंत्रज्ञानाची सुविधाही मर्यादित होती. उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत जाण्याचे स्वप्न पूर्ण करताना आर्थिक अडचणी आणि योग्य मार्गदर्शनाचा अभाव यांचा सामना करावा लागला. त्यामुळे त्याला अमेरिकेतील तुलनेने सामान्य श्र्ेणीतील (टियर-3) विद्यापीठात प्रवेश घ्यावा लागला. प्रवेश प्रक्रिया, अभ्यास, करिअर नियोजन आणि नोकरीची तयारी या सर्व टप्प्यांवर त्याने स्वतःच मार्ग शोधला. याच सातत्यपूर्ण प्रयत्नांच्या बळावर त्याने ’एनव्हिडिया’ची अत्यंत कठीण निवड प्रक्रिया यशस्वीरीत्या पार केली. आज तो वर्षाला सुमारे 2 लाख 75 हजार अमेरिकन डॉलर्स, म्हणजेच जवळपास 2.6 कोटी रुपयांचे वार्षिक मानधन मिळवत आहे.
योग्य दिशा, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि शिकण्याची तयारी असेल, तर कोणतीही पार्श्वभूमी जागतिक यशाच्या आड येऊ शकत नाही, ही बाब वरील उदाहरणावरुन स्पष्ट होत नाही काय?
Check Also
धोका चीनच्या महाकाय धरणाचा
जगातील सर्वात मोठे धरण हे चीनमध्ये आहे. ‘थ्री गॉर्जेस डॅम’ असे या धरणाचे नाव आहे. …
पांचजन्य वृत्तपत्र