लेख-समिक्षण

अभिनय बेर्डेचा ‌‘अल्पविराम‌’

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय तरुण अभिनेता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनय बेर्डेने आपल्या अभिनय कारकिर्दीतून काही काळासाठी ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामागे एक अतिशय रंजक आणि वेगळे कारण असल्याचे समोर आले आहे. दिवंगत दिग्गज अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा असलेल्या अभिनयने ‌‘ती सध्या काय करते‌’ या चित्रपटातून आपल्या अभिनय प्रवासाची सुरुवात केली होती. यानंतर त्याने अनेक दर्जेदार चित्रपटांमध्ये काम करत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. त्याच्या प्रत्येक भूमिकेला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. परंतु, अलिकडेच त्याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.
या व्हिडिओच्या माध्यमातून त्याने आपण चित्रपटसृष्टीतून ब्रेक घेत असल्याचे स्पष्ट केले आहे. स्वतःचा एक नवीन व्यवसाय किंवा स्टार्टअप सुरू करण्याची त्याची तीव्र इच्छा आहे. मात्र, स्टार्टअपसाठी नेमकी कोणती संकल्पना निवडावी, याबाबत त्याच्याकडे कोणतीही ठोस कल्पना नाही. त्यामुळे त्याने आपल्या चाहत्यांकडे मदतीचा हात मागितला आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांनी त्याला काहीतरी हटके आणि नाविन्यपूर्ण कल्पना सुचवाव्यात, असे आवाहन त्याने केले आहे. त्याच्या या व्हिडिओवर चाहत्यांसह अनेक कलाकारांनीही मजेशीर आणि वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अभिनयच्या या नव्या प्रवासाविषयी त्याच्या चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली असून, तो लवकरच एका नवीन भूमिकेत किंवा नव्या व्यवसायाच्या क्षेत्रात यशस्वी होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. कलाविश्वातील या धक्कादायक निर्णयामुळे सध्या सर्वत्र त्याचीच चर्चा सुरू आहे.- मेघना ठक्कर

Check Also

कंगना-तापसी वाद पुन्हा पेटला

कंगना रणौत आणि तापसी पन्नू यांच्यातील जुना शाब्दिक संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आला आहे. काही …