लेख-समिक्षण

सात अपयशांनंतर स्वप्नाल गवसणी

वर्षाला 46 लाख रुपयांचे पॅकेज, जगातील नामांकित कंपनीत नोकरी आणि पुढे उज्ज्वल करिअरची हमी… इतके मिळाल्यानंतर बहुतेक जण दुसऱ्या पर्यायाचा विचारही करणार नाहीत. मात्र लखनौच्या 27 वर्षीय शारदेंदू तिवारी यांच्यासाठी हे अंतिम ध्येय नव्हते. त्यांना भारतीय लष्कराची वर्दी खुणावत होती. त्यासाठी त्यांनी मोठ्या पगाराची नोकरी सोडली, 7 वेळा आलेले अपयश पचवले आणि आठव्या प्रयत्नात लष्करात अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण केले. शारदेंदू यांची ‌‘टेक्निकल एन्ट्री स्कीम‌’द्वारे भारतीय लष्करासाठी निवड झाली. गया येथील ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमीत प्रशिक्षण घेताना त्यांनी नेतृत्वगुणांची छाप पाडली. त्यांना अकादमीतील महत्त्वाच्या कॅडेट पदांपैकी एक असलेल्या वरिष्ठ अवर अधिकारीपदाची जबाबदारीही मिळाली.
उत्तर प्रदेशातील सुलतानपूर जिल्ह्यातील पिपरगाव हे त्यांच्या कुटुंबाचे मूळ गाव. पुढे कुटुंब लखनौमध्ये स्थायिक झाले. हरयाणातील चांदीमंदिर येथील केंद्रीय विद्यालयातून शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर शारदेंदू यांनी पंजाब इंजिनिअरिंग कॉलेज, चंदीगडमधून माहिती तंत्रज्ञान शाखेत बीई केले. त्यानंतर कॉम्प्युटर सायन्स आणि इन्फॉर्मेशन सिक्युरिटीमध्ये एम.टेकची पदवी घेतली. उच्च शिक्षणामुळे कॉर्पोरेट क्षेत्रातील मोठ्या संधी त्यांच्यासमोर खुल्या झाल्या. ॲमेझॉनमध्ये त्यांना वार्षिक 46 लाख रुपयांचे पॅकेज मिळाले. एअरबसकडूनही आकर्षक नोकरीची ऑफर आली. मात्र शारदेंदू यांनी दोन्हीपेक्षा लष्करातील करिअर निवडले. त्यांचे वडील मानद कॅप्टन राजकुमार तिवारी यांनी आर्मी सर्व्हिस कोअरमध्ये 36 वर्षे सेवा केली आहे. त्यामुळे लष्कराचे वातावरण शारदेंदू यांनी लहानपणापासून जवळून पाहिले होते. वडिलांचा हाच वारसा पुढे नेण्याची इच्छा त्यांच्या मनात होती. विशेष म्हणजे लष्करात प्रवेशासाठी झालेल्या निवड प्रक्रियेत ते 7 वेळा अपयशी ठरले. प्रत्येक अपयशानंतर त्यांनी पुन्हा तयारी केली. अखेर आठव्या प्रयत्नाने त्यांच्या आयुष्याला अपेक्षित वळण दिले. 46 लाखांचे पॅकेज सोडण्यापेक्षाही 7 अपयशांनंतर पुन्हा उभे राहण्याची त्यांची जिद्द अधिक लक्षवेधी ठरते.

Check Also

नऊ तास खुर्चीत बसताय?

दिवसभर डेस्क जॉब करणाऱ्या लोकांसाठी एक आरोग्यविषयक महत्त्वाचा इशारा डॉक्टरांनी दिला आहे. रक्तवाहिन्यांचे सर्जन तज्ज्ञांच्या …