तीन बाळांचा मृत्यू; चौकशीचे आदेश

अमरावती जिल्हा महिला रुग्णालयाच्या नवजात शिशु कक्षात सोमवारी पहाटे लागलेल्या आगीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना अमरावतीत घडल्याचे समोर आले आहे. तसेच सहा बालके गंभीररीत्या भाजले असून त्यांच्यावर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. व्हेंटिलेटरमध्ये अचानक झालेल्या स्फोटानंतर पहाटे 3.30 वाजताच्या सुमारास ही आग लागली. या घटनेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण चौकशीचे आदेश दिले असून चौकशी सुरू करण्यात आली आहे.
आगीत पूजा बोरगे यांचा मुलगा (रा. पुलगाव, वर्धा), गायत्री प्रफुल चोपडे यांचा मुलगा (रा. मुरखेड, तालुका अंजनगाव) आणि किरण बेठेकर यांची मुलगी (रा. बोराळा तालुका चिखलदरा) यांच्या नवजात बाळांचा मृत्यू झाला. अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावर एकूण तीन नवजात शिशु अतिदक्षता कक्ष आहेत. या तीन कक्षांमध्ये प्रत्येकी 13 अशी मिळून 39 नवजात बालकांवर उपचार घेण्याची क्षमता आहे. यापैकी एका कक्षात आग लागली. या कक्षात एकूण नऊ बालके होती. आग लागल्याचे लक्षात येताच ड्युटीवर असलेल्या डॉक्टर/नर्सेस आणि कर्मचाऱ्यांनी या कक्षातील लहान बाळांना बाहेर काढले. मात्र, दुर्दैवाने तीन बालकांचा धुरामुळे गुदमरुन मृत्यू झाला. डॉक्टर, परिचारिका आणि कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांनी तत्परता दाखल्यामुळे इतर अनेक बालकांचे प्राण वाचल्याची माहिती आहे. एवढी आग लागली असूनही आम्ही स्वत:चा विचार न करता बाळांना वाचवले, असे दोन परिचारिकांनी सांगितले. दोघींचे आगीत भाजून काळवंडलेले हात त्यांच्या धाडसाची साक्ष देत होते. सोमवारी पहाटे साडेतीन वाजता नवजात शिशु अतिदक्षता विभागात (एनआयसीयू) व्हेंटिलेटरमध्ये अचानक स्फोट झाला. त्यामुळे लागलेली आग अतिदक्षता विभागात वेगाने पसरली.
या घटनेच्या वेळी वॉर्डमध्ये 39 बालके असल्याची माहिती आहे. रुग्णालयातील परिचारिका, डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांनी अन्य नवजात बालकांचे प्राण वाचवण्यात यश मिळवले. अतिदक्षता विभागातील उर्वरित 36 बालकांना शहरातील वेगवेगळया रग्णालयात ठेवण्यात आले आहे. ज्यामध्ये 17 बालके सुपर स्पेशलिटी, 5 मुरके हॉस्पिटल, 8 परिजात रुग्णालय, 2 होप हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली असून या मुलांच्या उपचाराचा सर्व खर्च प्रशासन करणार असल्याचेही यावेळी त्यांनी स्पष्ट केले.
अवघ्या वर्षभरापूर्वी हा नवजात शिशु अतिदक्षता विभाग सुरु करण्यात आला होता. मग आग लागल्यानंतर रुग्णालयातील अग्निशामक यंत्रणा का कार्यान्वित झाली नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे. रुग्णालयाचे ‌‘फायर ऑडिट ‌’ करण्यासाठी रुग्णालय प्रशासनाने वारंवार पत्रव्यवहार करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत विभागाने तब्बल 37 दिवस या अत्यंत संवेदनशील विषयाकडे दुर्लक्ष केल्याचे उघड झाले आहे. सुमारे महिनाभरापूर्वी रुग्णालयाच्या एका कक्षातील वॉशिंग मशिन जळून खाक झाली होती. मात्र, काही कर्मचाऱ्यांनी ही बाब वरिष्ठांपासून लपवून ठेवल्याची माहिती समोर येत आहे. त्याचवेळी संपूर्ण इमारतीच्या विद्युत यंत्रणेची आणि वायरिंगची सखोल तपासणी झाली असती, तर शॉर्टसर्किटचा संभाव्य धोका आधीच समोर आला असता आणि तीन बालकांचे प्राण वाचले असते, अशी चर्चा आहे.
नवजात शिशू अतिदक्षता विभागात (एसएनसीयू) कमी दिवसांचे (प्री-मॅच्युअर), कमी वजनाची आणि गंभीर अवस्थेतील बालकांवर उपचार केले जातात. उपचार सुरु असलेल्या काही बालकांच्या हाताला आणि पायाला भाजल्याची माहिती आहे. त्यांच्यावर सध्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. व्हेंटिलेटरमध्ये स्फोट कशामुळे झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेनंतर आजुबाजूच्या कक्षातील बालकांनाही सुपरस्पेशालिटी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
नवजात बाळ आगीत होरपळल्याची माहिती मिळताच अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे, आ. सुलभा खोडके, माजी खासदार नवनीत राणा, माजी आमदार यशोमती ठाकूर यांनी प्रत्यक्षरित्या घटनास्थळाला भेट देऊन तेथे पाहणी केली. त्यामध्ये व्हेंटिलेटर, वीज यंत्रणेतील दोष, फायर ऑडिट, तसेच अन्य अनियमितता चौकशी करून जो कोणी दोषी असेल त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली. आग लागल्यानंतर रुग्णालयातील अग्नीरोधक यंत्रणा का कार्यान्वित झाली नाही, असा सवाल विचारला जात आहे. आग लागल्यानंतर या कक्षात तैनात असलेले कर्मचारी कुठे गेले होते, याबद्दलही प्रश्न उपस्थित झाले आहेत. या घटनेमुळे रुग्णालयातील आपातकालीन सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

Check Also

जंतर मंतरवर पुन्हा रणभूमी

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश यांच्या राजीनाम्याची मागणी करीत देशातील सर्व विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीने दिल्लीच्या …