लेख-समिक्षण

स्वाईन फ्लूचा वाढता विळखा

देशात सध्या स्वाईन फ्लूचा प्रसार वेगाने होत आहेत. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत स्वाइन फ्लूच्या रुग्णसंख्येत होत असलेली वाढ ही आरोग्य यंत्रणेसाठी धोक्याची घंटा आहे. अवघ्या 24 तासांत 138 नवे रुग्ण आढळल्याने एकूण रुग्णसंख्या 2,446 वर पोहोचली आहे. स्वाईन फ्लूचे तुरळक रुग्ण दरवर्षी आढळतात; मात्र यंदा रुग्णसंख्या सातत्याने वाढत असल्याने प्रशासनाबरोबरच नागरिकांनीही अधिक सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे. सरकारकडून परिस्थितीचा नियमित आढावा घेतला जात असला, तरी वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी प्रत्यक्ष पातळीवरील आरोग्य व्यवस्था सक्षम असणे अधिक महत्त्वाचे ठरणार आहे. स्वाईन फ्लू म्हणजे ‌‘एच1एन1‌’ या इन्फ्लूएंझा विषाणूमुळे होणारा श्वसनमार्गाचा संसर्ग. ताप, खोकला, घसा दुखणे, अंगदुखी, डोकेदुखी आणि थकवा अशी त्याची सर्वसाधारण लक्षणे आहेत. काही रुग्णांमध्ये हा संसर्ग गंभीर स्वरूप धारण करू शकतो. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, गर्भवती महिला आणि काही दीर्घकालीन आजार असलेल्या व्यक्तींमध्ये गुंतागुंत होण्याचा धोका तुलनेने अधिक असतो. त्यामुळे लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळेवर वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे. दिलासादायक बाब म्हणजे भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेने सध्या कोणता नवा विषाणू आढळल्याचे म्हटलेले नाही. ‌‘एच1एन1‌’ हा हंगामी इन्फ्लूएंझाच्या विषाणूंपैकी एक आहे. त्यामुळे नागरिकांनी अनावश्यक भीती बाळगण्याचे कारण नाही; मात्र याचा अर्थ निष्काळजी राहावे असा होत नाही. रुग्णसंख्या वाढत असताना संसर्गाची साखळी मर्यादित ठेवण्यासाठी वैयक्तिक स्वच्छता, खोकताना किंवा शिंकताना तोंड-नाक झाकणे, हातांची नियमित स्वच्छता आणि आजारी असताना इतरांशी अनावश्यक संपर्क टाळणे या साध्या उपायांनाही महत्त्व आहे. कोरोना महासाथीने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला एक महत्त्वाचा धडा दिला आहे, संसर्गजन्य आजारांविरुद्धची तयारी रुग्णालयात रुग्ण पोहोचल्यानंतर सुरू करून चालत नाही. संभाव्य रुग्णवाढ लक्षात घेऊन आधीच पुरेशा खाटा, औषधांचा साठा, तपासणीची व्यवस्था आणि प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध ठेवावे लागते. दिल्लीसह इतर राज्यांमध्येही स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळत असल्याने आरोग्य यंत्रणांनी या बाबतीत कोणतीही ढिलाई करता कामा नये. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे नागरिकांपर्यंत विश्वासार्ह आणि स्पष्ट माहिती पोहोचली पाहिजे. कोणती लक्षणे दिसल्यास डॉक्टरांकडे जावे, कोणत्या व्यक्तींना अधिक धोका असतो आणि संसर्ग रोखण्यासाठी काय करावे, याबाबत व्यापक जनजागृती आवश्यक आहे. संसर्गाबाबत घबराट आणि बेफिकिरी ही दोन्ही टोके टाळून प्रशासनाची पूर्वतयारी आणि नागरिकांची सजगता यांचा समन्वय साधला, तर वाढत्या स्वाइन फ्लूला वेळीच आळा घालणे शक्य होईल.- अपर्णा देवकर

Check Also

धनशक्तीची सावली

अमेरिकेतील न्यायव्यवस्था ही निष्पक्षता, स्वायत्तता आणि कायद्याच्या समान अंमलबजावणीसाठी जगभरात आदर्श मानली जाते. मात्र अदानी …