लेख-समिक्षण

‌‘वन साईज फिटस्‌‍ ऑल‌’चा भ्रम

फॅशन ही केवळ कपडे परिधान करण्याची बाब नाही, तर स्वतःची ओळख, व्यक्तिमत्त्व आणि आत्मविश्वास व्यक्त करण्याचे प्रभावी माध्यम मानले जाते. प्रत्येक व्यक्तीला आपल्या आवडीनुसार पोशाख निवडण्याचे स्वातंत्र्य असावे, असा संदेश फॅशन उद्योग सातत्याने देत असतो. मात्र या चकचकीत जगामागे एक मोठा विरोधाभास लपलेला आहे. वन साईज फिट्स ऑल म्हणजेच एकच आकार सर्वांनाच योग्य ठरतो, ही संकल्पना आजही अनेक ब्रँडच्या उत्पादनांमध्ये आणि विपणन धोरणांमध्ये दिसून येते. प्रत्यक्षात मात्र प्रत्येक व्यक्तीची शारीरिक ठेवण, उंची, वजन, शरीराचा बांधा आणि प्रमाण वेगवेगळे असते. त्यामुळे एकाच मापाचे कपडे सर्वांसाठी योग्य असू शकत नाहीत.
आज विविध ब्रँडचे कपडे खरेदी करताना तरुणपिढीचा आकारांच्या बाबतीत मोठा गोंधळ अनुभवावा लागतो. एका ब्रँडमध्ये ‌‘मध्यम‌’ आकार सहज बसतो, तर दुसऱ्या ब्रँडमध्ये तोच आकार खूपच लहान किंवा मोठा ठरतो. ऑनलाईन खरेदी करताना तर अनेक जण एकाच कपड्याचे दोन-तीन वेगवेगळे आकार मागवतात. योग्य आकार न मिळाल्यामुळे उर्वरित कपडे परत करण्याची वेळ येते. ही समस्या ग्राहकांच्या शरीरामुळे नसून, आकार निश्चित करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या असमान निकषांमुळे निर्माण होते.
फॅशन उद्योगातील अनेक आकारमाने अजूनही जुन्या आणि मर्यादित मोजमापांवर आधारित आहेत. विविध देश, वंश, शरीररचना किंवा स्नायूंची ठेवण यांचा पुरेसा विचार त्यात केला जात नाही. परिणामी अनेक ग्राहकांना त्यांच्या शरीरासाठी योग्य कपडे मिळत नाहीत. विशेषतः कमी उंचीच्या, अधिक वळणदार शरीरयष्टीच्या किंवा खेळाडूप्रमाणे मजबूत शरीर असलेल्या व्यक्तींना या अडचणी अधिक जाणवतात. याचा परिणाम केवळ कपडे न बसण्यापुरता मर्यादित राहत नाही. ट्रायल रूममध्ये किंवा आरशासमोर उभे राहिल्यावर अनेकांना स्वतःच्या शरीराविषयी न्यूनगंड निर्माण होतो. कंबरेला बसणारी पँट मांडीजवळ घट्ट होते, ड्रेस छातीजवळ व्यवस्थित बसत नाही किंवा बाह्या अनावश्यक लांब असतात. अशा प्रत्येक अनुभवातून अनेकांच्या मनात स्वतःच्या शरीरातच काहीतरी कमतरता असल्याची भावना निर्माण होते. प्रत्यक्षात दोष कपड्यांच्या रचनेत असतो; मात्र जबाबदारी स्वतःवर घेतली जाते.
या समस्येला फॅशन जाहिरातींची जोड मिळते. अनेक वर्षेजाहिराती, मासिके आणि रॅम्पवर विशिष्ट उंचीच्या, सडपातळ आणि ठरावीक सौंदर्यमानकांमध्ये बसणाऱ्या मॉडेल्सनाच प्राधान्य दिले गेले. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांसमोर शरीराचे एक अवास्तव आदर्श चित्र उभे राहिले. आपल्या शरीराची तुलना त्या प्रतिमांशी करताना अनेकांचा आत्मविश्वास कमी होतो. काहीजण अवास्तव आहारनियंत्रण, वजन कमी करण्याचे अतिरेकी प्रयत्न किंवा मानसिक तणावालाही सामोरे जातात.
सुदैवाने गेल्या काही वर्षांत या परिस्थितीत काही प्रमाणात बदल दिसू लागला आहे. अनेक आंतरराष्ट्रीय ब्रँड विविध वयोगट, शरीरयष्टी, त्वचेचे रंग आणि शारीरिक क्षमतांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मॉडेल्सना स्थान देत आहेत. मोठ्या आकारांपासून अतिलहान आकारांपर्यंत विस्तृत पर्याय उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात आहे. ऑनलाइन खरेदीमध्येही एकाच कपड्याचे वेगवेगळ्या शरीररचनेच्या मॉडेल्सवरील सादरीकरण दाखवण्याची पद्धत लोकप्रिय होत आहे. तथापि, खऱ्या अर्थाने समावेशक फॅशन निर्माण करण्यासाठी केवळ जाहिराती बदलणे पुरेसे नाही. कपड्यांचे आकारमान निश्चित करण्याची पद्धत अधिक वैज्ञानिक, वास्तववादी आणि विविधतेचा स्वीकार करणारी असणे आवश्यक आहे. कपड्यावरील आकाराचा आकडा हा व्यक्तीच्या सौंदर्याचा किंवा मूल्याचा मापदंड नाही, हा संदेश समाजापर्यंत पोहोचणे तितकेच महत्त्वाचे आहे. प्रत्येक शरीर वेगळे आहे आणि त्या प्रत्येक शरीराला आरामदायी, आकर्षक व आत्मविश्वास वाढवणारे कपडे मिळणे हा ग्राहकांचा अधिकार आहे. फॅशन उद्योगानेही ही वस्तुस्थिती स्वीकारून एकच आकार सर्वांसाठी या भ्रमाऐवजी प्रत्येकासाठी योग्य आकार हीच खरी नवी फॅशन बनवण्याची गरज आहे.

Check Also

एकाग्रता वाढवण्यासाठी…

अभ्यासाला बसल्यावर काही मिनिटांतच मोबाईल हातात जातो, एखादे काम सुरू केले की मध्येच सामाजिक माध्यमांवरील …