लेख-समिक्षण

दुसरी बाजू

राजधानी नवी दिल्लीत जंतरमंतर येथे झालेल्या ‌’जेन झी‌’च्या आंदोलनाचे पडसाद आणि प्रतिक्रिया अजूनही उमटत आहेत. संसदेचे सध्या सुरू असलेले अधिवेशनही याच विषयावरून गाजत आहे आणि या आंदोलनावेळी आंदोलकांवर झालेल्या पोलीस कारवाईची जबाबदारी स्वीकारून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राजीनामा द्यावा, ही मागणीही जोर धरत आहे. अशा प्रकारे या आंदोलनाची पहिली एक बाजू समोर येत असतानाच आंदोलनाची दुसरी बाजूसुद्धा समोर आली.
या आंदोलनामध्ये आंदोलकांच्या हिंसेमुळे जे पोलीस कर्मचारी आणि अधिकारी जखमी झाले त्यांच्या नातेवाईकांनी पत्रकार परिषद घेऊन आमच्याकडे दुर्लक्ष होत असल्याची खंत व्यक्त केली. ज्या पोलिसांनी कर्तव्यभावनेने आपले काम केले, त्यांच्यावर विनाकारण टीका होत असून त्यांना खलनायक ठरवले जात असल्याची भावना या पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे. आंदोलकांच्या हिंसाचारामध्ये जे पोलीस कर्मचारी जखमी झाले त्यांची छायाचित्रे आणि व्हिडिओसुद्धा आता सातत्याने प्रसारित करण्यात येत आहेत. आंदोलनाची ही दुसरी बाजू समोर येत असल्याने साहजिकच सरकारच्या माध्यमातूनच असे विषय समोर आणून आंदोलकांना बदनाम केले जात आहे, अशा प्रकारचे आरोपही केले जाऊ शकतात. पण ज्या घटनेचे व्हिडिओ समोर आहेत आणि त्यांचे पोलीस रेकॉर्डही झाले आहे, त्याबाबत असे कोणतेही फिक्सिंग झाले असेल असे म्हणता येत नाही.
दुर्दैवाने जंतरमंतर येथील आंदोलन हे एक उदाहरण आहे. पण कोणत्याही आंदोलनावेळी जेव्हा जमाव हिंसक होतो तेव्हा पोलिसांनी कोणती भूमिका घ्यायची याबाबत नेहमीच संदेह आणि शंका असते. देशातील पोलिसांची संख्या कमी आहे आणि आंदोलकांच्या संख्येच्या तुलनेने ही संख्या तर अतिशय तोकडी असते. हजारो आंदोलन जेव्हा रस्त्यावर उतरतात तेव्हा 100 किंवा 200 पोलीस अशा आंदोलकांवर नियंत्रण ठेवू शकत नाहीत. अशावेळी जर आंदोलनाला हिंसक वळण लागले आणि ते हाताबाहेर जात आहे असे वाटले तर पोलिसांना ॲक्शन घ्यावीच लागते. साहजिकच जंतर-मंतर येथे झालेल्या आंदोलनामध्ये ज्या प्रकारे आंदोलक जखमी झाले आहेत, त्याचप्रमाणे पोलीस कर्मचारीसुद्धा जखमी झाले आहेत हे वास्तव नाकारून चालत नाही.
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या आंदोलनामध्ये ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत अशा अनेक लोकांचा समावेश होता आणि दिल्ली पोलिसांनी अशी हजारो नावे समोर आणली आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या आंदोलकांच्या गर्दीमध्ये काही आंदोलक चेहरा लपवून कोणता ना कोणत्या प्रकारचा बुरखा परिधान करून आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. खऱ्या खुऱ्या आंदोलकाला आपला चेहरा लपवण्याची कोणतीही गरज नव्हती. पण असा चेहरा लपवून जे शेकडो आंदोलक या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते ते समाजकंटक असू शकतात आणि त्यांच्या पुढाकारानेच आणि त्यांच्या नियोजनातूनच अशा प्रकारचे दंगे सुरू होऊ शकतात ही शक्यता नाकारता येत नाही. शेवटी कोणत्याही आंदोलनाच्या वेळी नेहमीच क्रिया प्रतिक्रियांचा खेळ चालू असतो. कधी आंदोलकांच्या हिंसेमुळे पोलिसांना बळाचा वापर करावा लागतो, तर कधी पोलिसांनी बळाचा वापर केल्यामुळे जमाव चिडतो आणि नियंत्रणाबाहेर जाऊन हिंसेचा आधार घेतो. साहजिकच क्रिया कोणी केली आणि त्याला प्रतिक्रिया कोणी दिली याचा शोध घेणेसुद्धा तितकेच महत्त्वाचे असते. आता आंदोलनाला इतके दिवस झाल्यानंतर आणि आंदोलन संपल्यानंतर ज्याप्रकारे जखमी पोलीस कर्मचाऱ्यांचे नातेवाईक समोर येऊन आपली कैफियत मांडत आहेत ते पाहता त्याची दखल थोड्या प्रमाणात का होईना घ्यावीच लागणार आहे. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाणार नाही आणि परिस्थिती अधिक चिघळणार नाही याचा विचार करूनच त्यांना सौम्य लाठीमार, तीव्र लाठीमार, अश्र्ुधुराचा वापर किंवा पॅलेट गनचा वापर करावा लागतो. अशा अनेक आंदोलनांची हाताळणी करण्यासाठी त्यांच्याकडे बऱ्यापैकी अनुभवही असतो. साहजिकच कोणत्या परिस्थितीमध्ये कोणत्या आयुधांचा वापर करायचा याची कल्पनाही त्यांना असते. ज्याप्रमाणे आंदोलकांमध्ये सुद्धा काही समाजकंटक घुसलेले असतात त्याचप्रमाणे काही पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये सुद्धा अतिउत्साही कर्मचारी असू शकतात आणि समाजकंटक आंदोलकाप्रमाणेच हा अतिउत्साही पोलीस कर्मचारीसुद्धा एकूण सामाजिक वातावरण बिघडवण्यासाठी कारणीभूत ठरू शकतो. याचा विचार करूनच जखमी पोलिसांच्या नातेवाईकांनी आपली बाजू मांडण्याचा हा प्रयत्न केलेला दिसतो.
सरकारकडून या प्रकरणाची सर्व सखोल चौकशी सुरू असल्यामुळे सत्य काय ते बाहेर येईलच. पोलीस कर्मचाऱ्यांची बाजूसुद्धा समजावून घ्यायला हवी, पण मुख्य मुद्दा हा आहे की पोलिसांच्या बरोबरच साध्या कपड्यातील आणि दाढी असलेले गुंड विद्यार्थ्यांना काठीने अक्षरशः झोपडत होते. या लोकांवर अद्याप काहीही कारवाई करण्यात आलेली नाही किंबहुना त्यांना हुडकून काढण्याचासुद्धा प्रयत्न केला जात नाहीये. तरुणींचे कपडे फाडले, त्यांना चुकीच्या पद्धतीने स्पर्श केले, त्यांना बेदम मारहाणही झाली, याचाही सोक्षमोक्ष लागायला हवा.

Check Also

विजयाचा अन्वयार्थ

लोकशाही केवळ निवडणुकांपुरती मर्यादित नसते; ती नागरिकांच्या जागरूकतेवर आणि सत्तेला जाब विचारण्याच्या क्षमतेवर उभी असते. …