आजच्या काळात मुलांच्या हातात माहिती पोहोचण्यासाठी अनेक साधने आहेत. मोबाईल, समाजमाध्यमे, संकेतस्थळे, व्हिडीओ आणि विविध अनुप्रयोगांमुळे जगभरातील घडामोडी काही क्षणांत समोर येतात. मात्र माहिती मिळणे आणि ती समजून घेणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. एखादी बातमी पाहिली म्हणून तिचे गांभीर्य, पार्श्वभूमी किंवा त्यामागील सत्य समजतेच असे नाही. याच ठिकाणी वर्तमानपत्राचे महत्त्व अधोरेखित होते. नियमित वर्तमानपत्र वाचण्याची सवय आपल्या विचार करण्याच्या पद्धतीला अधिक व्यापक आणि चिकित्सक बनवते. सध्याच्या काळात एआयमुळे ज्या क्रिटिकल थिंकिंगच्या क्षमतेवर घाला घातला जात ती विचार करण्याची पद्धत आयुष्यभर अबाधित राहायची असेल तर वृत्तपत्रे नियमित वाचलीच पाहिजेत.
वर्तमानपत्रातील बातमी वाचताना केवळ ‘काय घडले?’ एवढेच समजत नाही, तर ‘का घडले?’, ‘याचा परिणाम कोणावर होईल?’ आणि ‘यामागची कारणे कोणती?’ असे प्रश्नही पडू लागतात. हीच चिकित्सक विचारांची सुरुवात असते. एखाद्या विषयावर वेगवेगळी मते वाचल्यानंतर स्वतःचे मत तयार करण्याची क्षमता विकसित होते. कोणती माहिती तथ्यांवर आधारित आहे आणि कोणती केवळ मतप्रदर्शन आहे, यातील फरक समजण्याची सवयही हळूहळू लागते.
वर्तमानपत्रात शिक्षण, विज्ञान, तंत्रज्ञान, क्रीडा, अर्थकारण, पर्यावरण, समाजजीवन आणि देश-विदेशातील घडामोडी अशा विविध विषयांचा समावेश असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांचे ज्ञान केवळ पाठ्यपुस्तकापुरते मर्यादित राहत नाही. एखाद्या अवकाश मोहिमेची बातमी वाचताना विज्ञानाची उत्सुकता वाढू शकते, अर्थसंकल्पाविषयी वाचताना पैशांच्या व्यवहाराची प्राथमिक समज निर्माण होऊ शकते किंवा एखाद्या सामाजिक प्रश्नावरील बातमी वाचताना समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो.
आणखी एक महत्त्वाचा फायदा म्हणजे भाषेवर होणारा परिणाम. नवीन शब्द, वाक्यरचना आणि वेगवेगळ्या विषयांवरील लेख वाचल्यामुळे शब्दसंग्रह वाढतो. करिअरमध्ये विशेषतः गटचर्चांमध्ये स्वतःचे विचार मांडताना याचा मोठा फायदा होतो. नियमित वाचनामुळे लक्ष केंद्रित करण्याची क्षमता आणि आकलनशक्तीही सुधारण्यास मदत होते.
आज माहितीचा वेग प्रचंड आहे; पण त्या माहितीची चिकित्सा करण्याची क्षमता त्याहून महत्त्वाची आहे. म्हणूनच वर्तमानपत्र वाचन ही केवळ शिस्त किंवा बळजबरी न राहता सवय बनली पाहिजे. माहितीच्या गर्दीत स्वतःचा विवेक जागा ठेवणारी, प्रश्न विचारणारी आणि कोणत्याही गोष्टीवर लगेच विश्वास न ठेवता तिची पडताळणी करणारी पिढी घडवण्यात वर्तमानपत्राची भूमिका आजही तितकीच महत्त्वाची आहे.
Check Also
‘वन साईज फिटस् ऑल’चा भ्रम
फॅशन ही केवळ कपडे परिधान करण्याची बाब नाही, तर स्वतःची ओळख, व्यक्तिमत्त्व आणि आत्मविश्वास व्यक्त …
पांचजन्य वृत्तपत्र