स्वातंत्र्य मिळाले त्याच वेळी देशाच्या फाळणीने लाखो माणसांचे आयुष्य उद्ध्वस्त केले. त्या काळातील दंगली, निर्वासितांचे लोंढे, ताटातूट आणि धर्माच्या नावाने उभ्या राहिलेल्या भिंतींचे चित्रण हिंदी चित्रपटांनी वेगवेगळ्या काळात केले. ‘धर्मपुत्र’ आणि ‘गरम हवा’पासून ‘तमस’, ‘ट्रेन टू पाकिस्तान’, ‘1947 अर्थ’, ‘पिंजर’ आणि ‘गदर’पर्यंत अनेक कलाकृतींनी या विषयाला आपापल्या पद्धतीने हात घातला.- सोनम परब
———————-
15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला; मात्र स्वातंत्र्याच्या आनंदाला फाळणीची दुःखद किनार होती. पंजाब आणि बंगालची विभागणी झाली. लाखो लोकांना पिढ्यान्पिढ्या राहत असलेली घरे सोडावी लागली. निर्वासितांचे लोंढे दोन्ही दिशांनी निघाले. धार्मिक दंगली उसळल्या. कालपर्यंत शेजारी म्हणून राहणाऱ्या माणसांमध्ये संशय आणि वैर निर्माण झाले. या सगळ्याचे पडसाद साहित्यावर उमटले आणि अर्थातच चित्रपटही त्यापासून दूर राहिले नाहीत. स्वातंत्र्यानंतरच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर भारतीय चित्रपटांनी फाळणीच्या आठवणींकडे पुन्हा पुन्हा वळून पाहिले.
यश चोप्रा दिग्दर्शित ‘धर्मपुत्र’ 1961 मध्ये प्रदर्शित झाला. आचार्य चतुरसेन यांच्या कादंबरीवर आधारित या चित्रपटात शशी कपूर आणि माला सिन्हा यांच्या प्रमुख भूमिका होत्या. फाळणीच्या काळात वाढलेली धार्मिक कट्टरता हा त्याचा मुख्य विषय. धर्माच्या आधारे माणसाची ओळख ठरविण्याचा आग्रह कोणत्या टोकाला जाऊ शकतो, यावर चित्रपटाने बोट ठेवले. हिंदू-मुस्लिम संबंधांचा विषय हाताळणारा तो त्या काळातील धाडसी प्रयत्नही होता.
फाळणीवरील चित्रपटांचा उल्लेख करताना ‘गरम हवा’ला मात्र टाळता येत नाही. एम. एस. सथ्यू दिग्दर्शित हा चित्रपट 1973 मध्ये आला. इस्मत चुगताई यांची कथा, कैफी आझमी यांची पटकथा आणि बलराज साहनींचा संयत अभिनय यामुळे ‘गरम हवा’ने स्वतंत्र स्थान मिळविले. आग्र्यातील एका मुस्लिम व्यावसायिक कुटुंबाभोवती कथा फिरते. फाळणीनंतर अनेक नातेवाईक पाकिस्तानात जात असताना हे कुटुंब भारतातच राहण्याचे ठरवते. पण बदललेल्या वातावरणात त्यांच्याकडे पाहण्याची समाजाची नजर बदलते. व्यवसायावर परिणाम होतो, आर्थिक अडचणी वाढतात आणि आपण ज्या देशाला आपला मानतो, तिथेच वारंवार आपली निष्ठा सिद्ध करण्याची वेळ येते.
‘गरम हवा’मधील फाळणी मोठ्या दंगलींच्या दृश्यांतून येत नाही. ती घरातील संभाषणांतून, बंद होणाऱ्या व्यवसायातून, रिकाम्या होत जाणाऱ्या घरातून आणि पाकिस्तानला निघून जाणाऱ्या नातेवाईकांतून जाणवते. म्हणून या चित्रपटातील वेदना अधिक जवळची वाटते. बलराज साहनी यांनी साकारलेला सलीम मिर्झा हा फाळणीनंतर भारतात राहिलेल्या असंख्य मुस्लिम कुटुंबांच्या मनातील असुरक्षिततेचे प्रतिनिधित्व करणारा चेहरा ठरला.
1987 मध्ये दूरदर्शनवर आलेल्या ‘तमस’ने या विषयाचा अधिक भयावह अध्याय उघडला. भीष्म साहनी यांच्या प्रसिद्ध कादंबरीवर आधारित मालिकेचे दिग्दर्शन गोविंद निहलानी यांनी केले होते. ओम पुरी, दीप्ती नवल, अमरीश पुरी आणि भीष्म साहनी यांच्यासारखे कलाकार त्यात होते. फाळणीच्या आधी उसळलेल्या सांप्रदायिक दंगली, त्यामागील राजकीय खेळी आणि त्या संघर्षात सापडलेली सामान्य माणसे यांचे चित्रण ‘तमस’मध्ये आले. धार्मिक विद्वेष एकदा पेटला की तो कुणाच्या नियंत्रणात राहत नाही आणि त्याची किंमत शेवटी सामान्य कुटुंबांनाच चुकवावी लागते, हे ‘तमस’ने अत्यंत प्रभावीपणे दाखविले.
नव्वदच्या दशकाच्या अखेरीस खुशवंतसिंग यांच्या प्रसिद्ध कादंबरीवरील ‘ट्रेन टू पाकिस्तान’ पडद्यावर आला. पामेला रूक्स दिग्दर्शित या 1998 मधील चित्रपटात निर्मल पांडे, रजित कपूर, दिव्या दत्ता आणि स्मृती मिश्र्ा यांच्या भूमिका होत्या. कथा भारत-पाकिस्तान सीमेवरील मनोमाजरा या गावाची. गावात हिंदू, शीख आणि मुस्लिम शांततेत राहत असतात. पण सीमेपलीकडून मृतदेहांनी भरलेल्या रेल्वेगाड्या येऊ लागतात आणि बाहेरच्या हिंसेची झळ गावापर्यंत पोहोचते. वर्षानुवर्षांचे संबंध काही दिवसांत संशयाच्या भोवऱ्यात सापडतात.
त्याच वर्षी दीपा मेहता दिग्दर्शित ‘1947 अर्थ’ प्रदर्शित झाला. बापसी सिधवा यांच्या ‘क्रॅकिंग इंडिया’ या कादंबरीवर तो आधारित होता. आमिर खान, नंदिता दास आणि राहुल खन्ना यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाची पार्श्वभूमी लाहोरची. एका मित्रपरिवारातील संबंध फाळणी जवळ येत असताना कसे बदलत जातात, हे चित्रपट दाखवतो. आमिर खानने साकारलेला दिलनवाज हळूहळू बदलत जातो. राजकीय आणि धार्मिक तणाव वैयक्तिक नात्यांत शिरल्यावर माणसे किती वेगळी वागू शकतात, याचे हे प्रभावी चित्रण होते.
कमल हासन यांच्या ‘हे राम’ने 2000 मध्ये फाळणी, धार्मिक हिंसा आणि महात्मा गांधींच्या हत्येच्या काळाचा वेगळ्या पद्धतीने वेध घेतला. कमल हासन यांच्यासह शाहरुख खान, राणी मुखर्जी आणि नसीरुद्दीन शाह यांच्या भूमिका असलेल्या या चित्रपटात इतिहास आणि काल्पनिक व्यक्तिरेखा यांची सांगड घालण्यात आली होती.
यानंतर वर्षभरातच आलेल्या ‘गदर : एक प्रेम कथा’ने फाळणीचा विषय थेट लोकप्रिय व्यावसायिक चित्रपटाच्या चौकटीत आणला. अनिल शर्मा दिग्दर्शित चित्रपटात सनी देओल, अमीषा पटेल आणि अमरीश पुरी यांच्या भूमिका होत्या. तारा सिंग आणि सकिना यांच्या प्रेमकथेभोवती चित्रपट फिरत असला तरी त्याची सुरुवात फाळणीच्या हिंसाचारातून होते. दंगली, रेल्वेतील हत्याकांड, जीव वाचविण्यासाठी पळणारी माणसे आणि एका क्षणात उद्ध्वस्त होणारी कुटुंबे यांची दृश्ये प्रेक्षकांच्या स्मरणात राहिली. ‘गदर’च्या प्रचंड व्यावसायिक यशानंतर फाळणीची पार्श्वभूमी असलेली कथा मोठ्या प्रेक्षकवर्गापर्यंत पोहोचू शकते, हेही स्पष्ट झाले.
अमृता प्रीतम यांच्या ‘पिंजर’ कादंबरीवर डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी 2003 मध्ये चित्रपट केला. उर्मिला मातोंडकर, मनोज बाजपेयी आणि संजय सूरी यांच्या प्रमुख भूमिका होत्या. फाळणीच्या काळात स्त्रियांना सहन कराव्या लागलेल्या अत्याचारांकडे या चित्रपटाने लक्ष वेधले. अपहरण, सक्तीचे धर्मांतर, कुटुंबापासून झालेली ताटातूट आणि पुन्हा आपल्या माणसांकडे जाण्याचा मार्गही बंद होणेया सगळ्यात स्त्रियांची अवस्था किती भयावह झाली होती, याची कथा ‘पिंजर’ सांगतो.
2013 मधील ‘भाग मिल्खा भाग’चा मुख्य विषय फाळणी नसला तरी मिल्खा सिंग यांच्या आयुष्यावर तिचा झालेला परिणाम कथेत महत्त्वाचा आहे. फाळणीच्या हिंसाचारात लहानपणीच कुटुंब गमावलेल्या मिल्खांच्या मनातील आठवणी त्यांचा पुढील आयुष्यभर पाठलाग करतात. त्यामुळे 1947 मध्ये घडलेली घटना पुढील कित्येक दशके एका व्यक्तीच्या आयुष्यात कशी जिवंत राहू शकते, याचा वेगळा संदर्भ या चित्रपटातून मिळतो.
फाळणीला जवळपास आठ दशके उलटून गेल्यानंतरही चित्रपट निर्मात्यांना हा विषय आकर्षित करतो, याचे कारण त्यात असलेल्या असंख्य मानवी कथा. कुणाचे घर सुटले, कुणाचे कुटुंब दुभंगले, कुणाला धर्मामुळे जन्मगाव सोडावे लागले, तर कुणी देश सोडला नाही म्हणून आयुष्यभर संशय सहन केला. प्रत्येक अनुभव वेगळा असल्याने प्रत्येक चित्रपटातील फाळणीही वेगळी दिसते.
‘धर्मपुत्र’मधील धार्मिक कट्टरता, ‘गरम हवा’तील असुरक्षितता, ‘तमस’मधील दंगली, ‘ट्रेन टू पाकिस्तान’मधील गावावर आलेले संकट, ‘1947 अर्थ’मधील बदलणारी नाती, ‘पिंजर’मधील स्त्रियांची शोकांतिका आणि ‘गदर’मधील प्रेमकथाया सगळ्यांची पार्श्वभूमी एकच असली तरी कथांचे स्वर वेगवेगळे आहेत.
फाळणीच्या आठवणी प्रत्यक्ष अनुभवलेली पिढी आता जवळजवळ काळाच्या पडद्याआड गेली आहे. पुढच्या पिढ्यांपर्यंत त्या काळाच्या कथा साहित्य, आत्मचरित्रे, छायाचित्रे आणि चित्रपटांतून पोहोचत आहेत. त्यामुळे या चित्रपटांकडे आज पुन्हा पाहताना त्यांचे महत्त्व अधिक जाणवते. 1947 मध्ये सीमा आखली गेली आणि भारत-पाकिस्तान हे दोन देश अस्तित्वात आले; पण त्या सीमारेषेच्या दोन्ही बाजूंना राहिलेल्या माणसांच्या असंख्य कहाण्या अजून सांगून संपलेल्या नाहीत. म्हणूनच फाळणी पुन्हा पुन्हा रुपेरी पडद्यावर येत राहते.
Check Also
‘पल भर के लिए’ झळकणार जागतिक पातळीवर
बॉलिवूड अभिनेत्री सैयमी खेर आणि चित्रपट निर्माते विक्रम फडणवीस यांचा आगामी ‘पल भर के लिए’ …
पांचजन्य वृत्तपत्र