लेख-समिक्षण

एकाग्रता वाढवण्यासाठी…

अभ्यासाला बसल्यावर काही मिनिटांतच मोबाईल हातात जातो, एखादे काम सुरू केले की मध्येच सामाजिक माध्यमांवरील सूचना लक्ष वेधून घेतात, तर चित्रपट पाहतानाही अनेक जण एकाच वेळी संदेशांना उत्तरे देत असतात. आजच्या डिजिटल युगात ही परिस्थिती अनेक तरुणांची झाली आहे. माहिती आणि मनोरंजनाचा भडिमार इतका वाढला आहे की, एका गोष्टीवर सलग लक्ष केंद्रित करणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे. त्यामुळे एकाग्रतेचा कालावधी कमी होणे ही आधुनिक जीवनशैलीतील गंभीर समस्या बनली आहे.
एकाग्रता म्हणजे एखाद्या कामावर कोणत्याही व्यत्ययाशिवाय ठरावीक काळ लक्ष केंद्रित करण्याची क्षमता. पूर्वीच्या काळात लोक एका वेळी एकच काम करत असत. आज मात्र परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. सकाळी डोळे उघडताच मोबाईल तपासण्यापासून दिवसाची सुरुवात होते आणि रात्री झोपेपर्यंत सूचना, व्हिडीओ, संदेश, बातम्या आणि मनोरंजनाचा अखंड प्रवाह सुरू असतो. परिणामी मेंदूला विश्र्ांती मिळत नाही आणि लक्ष सतत भरकटत राहते.
यामागे अनेक कारणे आहेत. सर्वात मोठे कारण म्हणजे काही सेकंदांच्या व्हिडीओंची वाढती लोकप्रियता. अशा झटपट माहितीची सवय लागल्यामुळे दीर्घ लेख वाचणे, अभ्यास करणे किंवा एखाद्या विषयाचा सखोल विचार करणे अनेकांना कंटाळवाणे वाटू लागते. याशिवाय प्रत्येक मोबाईल ॲपकडून येणाऱ्या सततच्या सूचना, एकाच वेळी अनेक कामे करण्याची सवय आणि आवश्यकतेपेक्षा जास्त माहितीचा मारा यामुळे मेंदूवर अतिरिक्त ताण येतो. अनेक डिजिटल ॲप्स वापरकर्त्यांना वारंवार परत येण्यासाठीच तयार करण्यात आलेली असल्याने त्यांचा प्रभाव नकळत आपल्या सवयींवर पडतो.
एकाग्रता कमी होण्याचे परिणाम केवळ अभ्यासापुरते मर्यादित राहत नाहीत. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी अधिक वेळ द्यावा लागतो; पण त्यातून अपेक्षित परिणाम मिळत नाहीत. कामाच्या ठिकाणी उत्पादकता कमी होते, चुका वाढतात आणि मानसिक थकवा जाणवू लागतो. सर्जनशील विचार करण्याची क्षमता कमी होते, कारण कोणतीही कल्पना विकसित होण्यासाठी सातत्याने लक्ष देणे आवश्यक असते. त्याचबरोबर कुटुंबीय आणि मित्रांसोबतच्या संवादावरही परिणाम होतो. समोरच्या व्यक्तीशी बोलताना सतत मोबाईलकडे पाहण्याची सवय नात्यांमध्ये दुरावा निर्माण करू शकते. सतत इतरांच्या जीवनाशी स्वतःची तुलना केल्याने मानसिक अस्वस्थताही वाढते.
सुदैवाने ही समस्या कायमस्वरूपी नाही. काही साध्या सवयी अंगीकारल्यास एकाग्रता पुन्हा वाढवता येऊ शकते. एका वेळी एकच काम करण्याची सवय लावणे, अनावश्यक सूचनांवर बंदी घालणे, मोबाईलचा वापर ठरावीक वेळापुरता मर्यादित ठेवणे आणि अभ्यास किंवा कामासाठी निश्चित वेळ राखून ठेवणे उपयुक्त ठरते. कागदी पुस्तके वाचण्याची सवय, नियमित व्यायाम, पुरेशी झोप आणि निसर्गात वेळ घालवणे यामुळेही मेंदूला विश्र्ांती मिळते आणि लक्ष केंद्रित करण्याची क्षमता सुधारते. काही कुटुंबांनी जेवणाच्या वेळी सर्वांचे मोबाईल बाजूला ठेवण्याची पद्धत सुरू केली आहे. अशा छोट्या बदलांमुळे संवाद वाढतो आणि स्क्रीनवरील अवलंबित्व कमी होते.
आजच्या माहितीच्या महापुरात एकाग्रता हीच खरी ताकद बनली आहे. ज्याला स्वतःचे लक्ष नियंत्रित करता येते, तोच शिक्षण, करिअर आणि वैयक्तिक आयुष्यात अधिक यशस्वी ठरू शकतो. तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक आहे; मात्र त्याचे नियंत्रण आपल्या हातात असणे अधिक महत्त्वाचे आहे. योग्य सवयी, वेळेचे नियोजन आणि डिजिटल शिस्त यांचा अवलंब केला, तर विचलित मन पुन्हा एकदा एकाग्र, सर्जनशील आणि उत्पादक बनू शकते.

Check Also

कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आरोग्यशास्त्राचा संगम

महाराष्ट्रात भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई, येथे बायोमेडिकल इंजिनीअरिंगशी संबंधित आंतरविद्याशाखीय शिक्षण आणि संशोधनाला विशेष महत्त्व …