सुंदर आणि नीटनेटके अक्षर असावे, अशी अनेकांची इच्छा असते. चांगले हस्ताक्षर केवळ जन्मजात मिळते असे नाही; योग्य पद्धत, सातत्यपूर्ण सराव आणि संयम यांच्या मदतीने अक्षरात मोठा बदल करता येतो. लिहिताना काही साध्या गोष्टी लक्षात ठेवल्या तर अक्षर अधिक सुबक, स्पष्ट आणि आकर्षक होऊ शकते.
1)लिहिताना शरीराची योग्य ठेवण असणे महत्त्वाचे आहे. पेन किंवा पेन्सिल हातात खूप घट्ट पकडू नका. त्यामुळे हातावर अनावश्यक ताण येतो आणि अक्षरातील सहजता कमी होते. लिहिताना वेळोवेळी हाताला थोडी विश्र्ांती द्या. पाठ ताठ ठेवून बसा आणि लिहिण्यासाठी योग्य उंचीचे टेबल वापरा. हातावर ताण नसेल तर अक्षर अधिक सहज आणि प्रवाही होते.
2)अक्षर सुधारण्यासाठी कागदाची निवडही महत्त्वाची असते. सुरुवातीला रेषा असलेल्या कागदावर लिहिण्याचा सराव करा. त्यामुळे अक्षरांची उंची समान ठेवणे आणि शब्द एका सरळ रेषेत लिहिणे सोपे जाते. नियमित रेषांचा आधार घेत सराव केल्याने काही काळानंतर त्याची सवय लागते आणि साध्या कागदावरही अक्षर व्यवस्थित लिहिता येते.
3) सुंदर अक्षरासाठी केवळ अक्षरांची रचना चांगली असणे पुरेसे नाही. दोन शब्दांमध्ये योग्य अंतर असणेही आवश्यक आहे. शब्द एकमेकांना चिकटून लिहिल्यास संपूर्ण मजकूर गोंधळलेला दिसतो. खूप मोठे अंतर ठेवल्यासही लिखाण विस्कळीत वाटते. त्यामुळे प्रत्येक शब्दामध्ये समान आणि योग्य अंतर ठेवण्याचा सराव करा. तसेच अक्षरांमधील अंतरही शक्यतो एकसारखे ठेवा.
4) हस्ताक्षर एका दिवसात सुधारत नाही. अक्षर बदलण्याचा प्रयत्न करताना सुरुवातीला लिखाणाचा वेग कमी होऊ शकतो. त्याची चिंता करू नका. घाई करण्यापेक्षा प्रत्येक अक्षर नीट लिहिण्यावर लक्ष द्या. मनःस्थितीचाही हस्ताक्षरावर परिणाम होतो. तणाव, घाई किंवा अस्वस्थता असेल तर अक्षर विस्कळीत होण्याची शक्यता असते. त्यामुळे शांत मनाने लिहिण्याचा प्रयत्न करा.
5)सुंदर अक्षर पाहून त्याची नक्कल करण्यापेक्षा त्यातून योग्य गोष्टी शिकून स्वतःची लेखनशैली विकसित करणे अधिक चांगले. विविध प्रकारच्या अक्षरांचा सराव करा आणि त्यातील आपल्याला सोयीची शैली निवडा. अक्षरांची उंची, वळणे, आकार आणि शब्दांमधील अंतर याकडे लक्ष द्या. नियमित सरावामुळे हळूहळू तुमच्या हस्ताक्षराची स्वतंत्र आणि आकर्षक शैली तयार होईल.
सुंदर हस्ताक्षराचे रहस्य एका गोष्टीत आहेघाई न करता नियमित सराव करणे.
Check Also
वृत्तपत्र वाचन आणि क्रिटिकल थिंकिंग
आजच्या काळात मुलांच्या हातात माहिती पोहोचण्यासाठी अनेक साधने आहेत. मोबाईल, समाजमाध्यमे, संकेतस्थळे, व्हिडीओ आणि विविध …
पांचजन्य वृत्तपत्र