लेख-समिक्षण

अल्लू अर्जुनचा ट्रिपल रोल

दक्षिणेचा सुपरस्टार अल्लू अर्जुन आणि प्रसिद्ध दिग्दर्शक एटली यांच्या आगामी ‌‘राका‌’ या चित्रपटाची सध्या सिनेविश्वात प्रचंड चर्चा सुरू आहे. ‌‘पुष्पा‌’ चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर अल्लू अर्जुन एका अत्यंत वेगळ्या आणि भव्य रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत दीपिका पादुकोण, रश्मिका मंदाना आणि जान्हवी कपूर या आघाडीच्या अभिनेत्री महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये झळकणार असल्याचे बोलले जात आहे. चित्रपटाच्या चित्रीकरणाला आता वेग आला असून, या प्रकल्पाशी संबंधित अनेक रंजक गोष्टी समोर येत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या चित्रपटात रश्मिका मंदाना अभिनेत्री दीपिका पादुकोणच्या व्यक्तिरेखेची रक्षक म्हणून मैदानात उतरणार आहे. चित्रपटात दीपिकाची भूमिका अत्यंत नाजूक आणि कठीण परिस्थितीचा सामना करणाऱ्या महिलेची असणार आहे, जिच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी रश्मिकाच्या पात्रावर असेल. विशेष म्हणजे दीपिकाचे पात्र थेट प्राचीन वैदिक काळाशी जोडले गेल्याची चर्चा आहे, ज्यामुळे कथेला एक ऐतिहासिक व पौराणिक किनार मिळणार आहे.
या चित्रपटातील सर्वात मोठी आणि खळबळजनक बातमी म्हणजे अल्लू अर्जुन यात एकाच वेळी तीन वेगवेगळ्या भूमिकांमध्ये दिसू शकतो. त्याचा हा ट्रिपल रोल प्रेक्षकांसाठी एक मोठी मेजवानी ठरणार आहे. यातील एका भूमिकेत तो एका पराक्रमी योद्ध्याच्या रूपात दिसेल, तर दुसऱ्या भूमिकेत त्याचा डार्क आणि रागीट अंदाज पाहायला मिळू शकतो. मात्र तिसरी भूमिका नेमकी कशी असेल, याविषयी अद्याप कमालीची गुप्तता पाळण्यात आली आहे. या चित्रपटात केवळ मानवी पात्रेच नसून काही काल्पनिक आणि अनोखे जीव तसेच जंगली परिसर पाहायला मिळणार आहे, ज्यामुळे हा चित्रपट फँटसी आणि थ्रिलरचा एक उत्तम संगम ठरेल – मानसी जोशी

Check Also

चर्चा प्रभासच्या रौद्रावताराची

अभिनेता प्रभासच्या आगामी ‌‘फौजी‌’ चित्रपटाचा दमदार पहिला लूक समोर आला असून, समाजमाध्यमांवर त्याची जोरदार चर्चा …