महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य एकीकरणाच्या चर्चांना पुन्हा वेग आला असला, तरी प्रत्यक्षात हा मार्ग अधिकच खडतर होत चालल्याचे चित्र आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही गटांचे पुनर्मिलन व्हावे, अशी अपेक्षा अनेक कार्यकर्तेआणि नेते व्यक्त करत आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर ‘घरवापसी’चे संकेतही वेळोवेळी मिळाले; मात्र आता या प्रक्रियेसमोर सर्वात मोठा अडथळा म्हणून पवार कुटुंबातील तिसऱ्या पिढीतील नेतृत्वाचा प्रश्न पुढे आला आहे.
राजकीय वर्तुळात सध्या अशी चर्चा आहे की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष सुनेत्रा पवार या भविष्यात बारामती विधानसभा मतदारसंघातून पुत्र पार्थ पवार यांनाच संधी मिळावी, यासाठी आग्रही आहेत. दुसरीकडे, शरद पवार यांचे नातू आणि सध्या कर्जत-जामखेडचे आमदार असलेले रोहित पवार हेही बारामतीच्या राजकीय वारशावर आपला दावा सांगत आहेत. त्यामुळे दोन्ही गटांचे एकत्रीकरण झाले, तर बारामतीतील उमेदवारीचा प्रश्न सर्वात मोठा वादाचा विषय ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
बारामती हे पवार कुटुंबाच्या राजकीय प्रभावाचे केंद्र मानले जाते. अनेक दशकांपासून या मतदारसंघातून पवार कुटुंबाचे वर्चस्व कायम राहिले आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर या जागेवर पुढील नेतृत्व कोण करणार, हा प्रश्न अधिक महत्त्वाचा बनला. अशा परिस्थितीत सुनेत्रा पवार यांनी पार्थ पवार यांच्या राजकीय पुनर्स्थापनेसाठी बारामती हा सर्वाधिक सुरक्षित पर्याय मानल्याचे बोलले जात आहे.
पार्थ पवार यांनी 2019 मध्ये मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली होती; मात्र त्यांना पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर त्यांची सक्रिय राजकीय वाटचाल अपेक्षित वेगाने पुढे सरकली नाही. त्यामुळे भविष्यातील राजकीय कारकीर्द घडविण्यासाठी बारामती विधानसभा मतदारसंघ त्यांच्यासाठी राखून ठेवावा, अशी भूमिका सुनेत्रा पवार यांनी घेतल्याची चर्चा आहे.
याच ठिकाणी रोहित पवार यांचा दावा महत्त्वाचा ठरतो. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटातील आक्रमक आणि प्रभावी युवा नेता म्हणून त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. संघटनात्मक काम, राज्यभरातील दौरे आणि शरद पवार यांच्याशी असलेले निकटचे राजकीय संबंध यामुळे भविष्यातील नेतृत्वासाठी त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यामुळे दोन्ही गटांचे एकत्रीकरण झाल्यास बारामतीच्या उमेदवारीवरून पार्थ आणि रोहित यांच्यात थेट संघर्ष निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळेच सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्या भूमिकेला राजकीय वर्तुळात ‘व्हेटो’ असे संबोधले जात आहे. एकत्रीकरण झाल्यास शरद पवार यांचा कल रोहित पवार यांच्या बाजूने झुकू शकतो आणि त्यामुळे पार्थ पवार यांच्या राजकीय भवितव्याला फटका बसेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. परिणामी, कुटुंबातील अंतर्गत समीकरणेच पक्षाच्या एकीकरणात अडसर ठरत असल्याचे चित्र समोर येत आहे.
पवार कुटुंबातील सत्तासंघर्ष नवीन नाही. सुरुवातीला हा संघर्ष शरद पवार आणि अजित पवार यांच्यात दिसून आला. त्यामागे नेतृत्वाचा वारसा आणि पुढील पिढीतील प्रतिनिधित्वाचा प्रश्न महत्त्वाचा होता. त्या काळात सुप्रिया सुळे यांच्या वाढत्या राजकीय भूमिकेमुळे अजित पवार नाराज असल्याची चर्चा होती. आता त्याच संघर्षाचे रूपांतर तिसऱ्या पिढीत पार्थ पवार विरुद्ध रोहित पवार अशा स्वरूपात होत असल्याचे मानले जात आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांतील अनेक कार्यकर्तेआणि स्थानिक नेत्यांचे मत वेगळे असल्याचे दिसते. स्वतंत्रपणे निवडणुका लढवल्यामुळे मराठा मतांचे विभाजन होत असून त्यामुळे दोन्ही गटांची राजकीय ताकद आणि युतीमधील वाटाघाटीची क्षमता कमी होत असल्याची भावना अनेकांच्या मनात आहे. त्यामुळे संघटनात्मक हितासाठी दोन्ही गटांनी पुन्हा एकत्र यावे, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे. मात्र नेतृत्वाच्या पातळीवर मतदारसंघांचे वाटप आणि कुटुंबातील पुढील पिढीच्या राजकीय भवितव्याचा प्रश्न अधिक महत्त्वाचा ठरत असल्याचे दिसते.
या पार्श्वभूमीवर अजित पवार गटातील अनेक नेतेही द्विधा मनःस्थितीत असल्याचे सांगितले जाते. एका बाजूला पक्षातील काही आमदार आणि नेत्यांना पुन्हा शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली जाण्यात राजकीय सुरक्षितता दिसत आहे; तर दुसऱ्या बाजूला पक्षाध्यक्ष सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांची भूमिका एकीकरणाच्या प्रक्रियेला मर्यादा आणत असल्याचे बोलले जात आहे.
लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघातून सुनेत्रा पवार यांचा सुप्रिया सुळे यांच्या विरोधात पराभव झाला होता. त्यामुळे भविष्यात विधानसभा मतदारसंघावरही दावा सोडल्यास त्यांच्या राजकीय प्रभावावर परिणाम होऊ शकतो, अशीही राजकीय निरीक्षकांची मते आहेत.
जर दोन्ही गटांचे एकत्रीकरण झाले नाही, तर त्याचे दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे. आगामी निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट पुन्हा एकमेकांविरुद्ध उभे राहू शकतात. अशा परिस्थितीत विरोधी पक्षांना त्याचा लाभ मिळू शकतो. त्याचबरोबर काही नेते राजकीय भविष्य सुरक्षित करण्यासाठी शरद पवार यांच्या गटात प्रवेश करण्याचाही पर्याय निवडू शकतात. त्यामुळे अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाची संघटनात्मक ताकद कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बारामतीतील मतदारांसमोरही भविष्यात वेगळीच परिस्थिती निर्माण होऊ शकते. पवार कुटुंबातील दोन युवा चेहऱ्यांपैकी कोणाला पाठिंबा द्यायचा, हा प्रश्न मतदारांसमोर उभा राहू शकतो.
एकूणच राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचे संभाव्य एकत्रीकरण हा केवळ दोन राजकीय पक्षांच्या विलिनीकरणाचा विषय राहिलेला नाही. तो पवार कुटुंबातील नेतृत्व, राजकीय वारसा आणि पुढील पिढीच्या प्रतिनिधित्वाशी जोडलेला गुंतागुंतीचा प्रश्न बनला आहे. -पोपट नाईकनवरे
Check Also
शहरांचे प्राक्तन
गेल्या काही वर्षांत पावसाळा हा सुखावणाऱ्या क्षणांपेक्षा विविध आपत्तींमुळे भयकारक बनला आहे. यंदाचा 2026 चा …
पांचजन्य वृत्तपत्र