देशातील आघाडीच्या बँकांमध्ये सध्या एक मूक क्रांती आणि तितकीच मोठी पडझड सुरू आहे. ग्राहक सेवा वेगवान करणे आणि अचूकता आणणे या नावाखाली बँकिंग क्षेत्रात आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (एआय) आणि प्रगत रोबोटिक्सचा वापर कमालीचा वाढला आहे. परंतु, या तथाकथित तांत्रिक प्रगतीमागे मनुष्यबळ कपातीचे एक अघोषित वादळ दडले आहे, ज्याचा पहिला मोठा तडाखा कनिष्ठ आणि लिपिकीय कर्मचाऱ्यांना बसू लागला आहे. बोस्टन कन्सल्टिंग ग्रुपच्या ताज्या अहवालानुसार, भारतीय बँकिंग क्षेत्रातील जवळपास 35 ते 50 टक्के नोकऱ्यांचे स्वरूप ‘एआय’मुळे पूर्णपणे बदलणार आहे.
देशातील सर्वांत मोठी खासगी बँक असलेल्या एचडीएफसी बँकेने नुकत्याच जाहीर केलेल्या आर्थिक वर्ष 2025-26 च्या वार्षिक अहवालातून ही बाब स्पष्ट झाली आहे. तंत्रज्ञानाचा स्वीकार केल्यामुळे बँकेच्या नॉन-सुपरवायझरी (लिपिक, साहाय्यक आणि बॅक-ऑफिस) कर्मचाऱ्यांच्या संख्येत तब्बल 8,000 हून अधिक घट झाली आहे.डेटा एंट्री, केवायसी (घधउ) पडताळणी, कर्जाची प्राथमिक कागदपत्रे तपासणे आणि ग्राहकांच्या साध्या तक्रारींचे निवारण करणे यांसारखी परंपरागत कामे आता मानवी हातांऐवजी ‘एआय बॉट्स’ आणि ‘अल्गोरिदम’द्वारे सेकंदाच्या भागात पूर्ण केली जात आहेत.
जागतिक स्तरावरील नामवंत संशोधन संस्थांनी या परिस्थितीचे विलेषण करताना चिंता व्यक्त केली आहे. ‘गार्टनर’च्या 2026 च्या ताज्या अहवालानुसार, ज्या कंपन्यांनी किंवा वित्तीय संस्थांनी स्वायत्त एआय प्रणाली पूर्णपणे लागू केल्या आहेत, त्यांपैकी जवळपास 80 टक्के संस्थांनी आपल्या मनुष्यबळात मोठी कपात केली आहे. तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासाठी बँकेने 50,631 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना आपल्या ’जेन एआय अकॅडमी’मार्फत प्रशिक्षित केले आहे, तर 2,100 हून अधिक कर्मचाऱ्यांना ‘मायक्रोसॉफ्ट कोपायलट’चे प्रशिक्षण देण्यात आले आहे.
त्याचप्रमाणे, ‘मॅककिन्से ग्लोबल बँकिंग ॲन्युअल रिव्ह्यू’च्या निरीक्षणानुसार, बँकिंग हे एआयमुळे सर्वाधिक प्रभावित होणाऱ्या क्षेत्रांपैकी एक आहे. बँका आपल्या नफ्याचे प्रमाण वाढवण्यासाठी आणि प्रशासकीय खर्च कमी करण्यासाठी सर्रास डिजिटल सहकाऱ्यांचा वापर करत आहेत. मॅककिन्सेच्या अंदाजानुसार, आगामी काळात बँकिंगमधील पारंपरिक स्वरूपाच्या तब्बल 20 ते 25 टक्के नोकऱ्यांवर याचा थेट किंवा अप्रत्यक्ष परिणाम होणार आहे. ‘कॅश रिसायकलर्स मशिन्स’आणि डिजिटल पेमेंटच्या क्रांतीमुळे बँकेच्या काउंटरवर जाऊन रोख व्यवहार करणाऱ्यांचे प्रमाण कमालीचे घटले आहे. परिणामी, काउंटर सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या बँका कमी करत आहेत.
या तांत्रिक आक्रमणाचा सर्वात घातक पैलू असा आहे की, याचा फटका व्यवस्थापकीय किंवा निर्णय घेणाऱ्या वरिष्ठ पातळीला बसत नसून, जे तरुण नुकतेच शिक्षण पूर्ण करून बँकिंग क्षेत्रात करिअरची सुरुवात करत आहेत, त्यांना बसत आहे.
पूर्वी वाणिज्य किंवा इतर शाखांतील पदवीधरांसाठी बँकेतील लिपिक किंवा साहाय्यक हे पद रोजगाराचा एक हमखास मार्ग मानले जायचे. आता ‘एआय’च्या आगमनामुळे या जागाच इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहेत.
कोटक महिंद्रा बँकेचे आकडे सर्वाधिक लक्षवेधी ठरले आहेत. आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये बँकेने तब्बल 28,846 नव्या कर्मचाऱ्यांची भरती केली. ही संख्या मागील वर्षाच्या तुलनेत 42 टक्क्यांनी अधिक आहे. मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणावर भरती होऊनही बँकेच्या एकूण कर्मचाऱ्यांची संख्या 1,269 ने घटली. आर्थिक वर्षाच्या अखेरीस बँकेत एकूण 74,054 कर्मचारी कार्यरत होते. यामागील कारण स्पष्ट करताना कोटक महिंद्रा बँकेने सांगितले की, भरतीचा केंद्रबिंदू आता बदलला असून कृत्रिम बुद्धिमत्ता, क्लाऊड तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि प्रगत तंत्रज्ञान या क्षेत्रांतील तज्ज्ञांना प्राधान्य दिले जात आहे. याशिवाय, अनेक प्रक्रिया अधिक कार्यक्षम करण्यात आल्या असून तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे पूर्वीपेक्षा कमी मनुष्यबळात अधिक काम करणे शक्य झाले आहे. तसेच, कर्मचाऱ्यांचा विविध विभागांमध्ये अधिक प्रभावीपणे वापर (इंटरनल मोबिलिटी) केल्यामुळेही एकूण कर्मचाऱ्यांची संख्या कमी झाल्याचे बँकेने स्पष्ट केले.
ॲक्सिस बँकेची परिस्थितीही काहीशी अशीच आहे. या बँकेत सलग दुसऱ्या वर्षी कर्मचाऱ्यांची संख्या घटली आहे. आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये बँकेत 1,04,453 कर्मचारी होते. आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये ही संख्या 1,01,337 वर आली, म्हणजेच 3,116 कर्मचाऱ्यांची घट झाली. विशेष म्हणजे, याच कालावधीत ॲक्सिस बँकेने 31 हजारांहून अधिक नव्या कर्मचाऱ्यांची भरती केली आणि सुमारे 400 नवीन शाखाही सुरू केल्या. व्यवसायाचा विस्तार आणि भरती सुरू असतानाही तंत्रज्ञानाचा वाढता वापर, कामकाजातील कार्यक्षमता आणि मनुष्यबळाच्या नव्या व्यवस्थापन पद्धतींमुळे एकूण कर्मचाऱ्यांच्या संख्येत घट झाल्याचे चित्र समोर आले आहे.
नॅसकॉम आणि इतर संस्थांच्या अहवालानुसार, भारतात तंत्रज्ञानाचा स्वीकार ज्या वेगाने होत आहे, त्या वेगाने पारंपरिक कर्मचाऱ्यांचे कौशल्य अद्ययावत होत नाहीये. परिणामी, जे कर्मचारी नवीन तंत्रज्ञान शिकू शकत नाहीत, त्यांच्यावर नोकरी गमावण्याची टांगती तलवार आहे.
रोख रक्कम जमा करण्यापासून ते पासबुक प्रिंटिंगपर्यंत आणि फोनवरील ग्राहक सेवेपासून ते थेट चॅट बॉटस्पर्यंत सर्वत्र मानवी चेहरा हरवला आहे. यामुळे ग्राहकांना गती मिळत असली, तरी मध्यमवर्गीयांसाठी रोजगाराच्या संधी आक्रसत चालल्या आहेत. भारतासारख्या प्रचंड लोकसंख्या असलेल्या देशात, जिथे दरवर्षी लाखो सुशिक्षित तरुण नोकरीच्या शोधात बाजारात उतरतात, तिथे बँकिंगसारख्या सुरक्षित आणि मोठ्या क्षेत्रातील रोजगार आकुंचन पावणे ही केवळ व्यावसायिक गरज उरलेली नाही, तर ते एक मोठे सामाजिक आणि आर्थिक संकट बनत चालले आहे.
या धोक्याच्या आणि आव्हानात्मक परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी बँकांना आपल्या धोरणांमध्ये बदल करावा लागेल. एआयचा वापर केवळ ‘खर्च कपात’ आणि ‘कर्मचारी कपात’ करण्यासाठी न करता, कर्मचाऱ्यांची क्षमता वाढवण्यासाठी केला पाहिजे.
बँकेतील बॅक-ऑफिस कर्मचाऱ्यांना वेळीच एआयचे प्रशिक्षण देऊन त्यांना ग्राहकांशी थेट संवाद साधणाऱ्या, वित्तीय सल्ला देणाऱ्या किंवा ग्रामीण भागात बँकेचा विस्तार करणाऱ्या भूमिकांमध्ये सामावून घेणे गरजेचे आहे. जर तंत्रज्ञानाचा वापर केवळ नफा कमावण्यासाठी आणि माणसांना पर्याय म्हणून केला गेला, तर भविष्यात बँकिंग क्षेत्रात उत्पादकता नक्कीच वाढेल, पण त्यासोबतच सुशिक्षित बेरोजगारांची एक मोठी फौज देशात तयार होईल, ही भीती नाकारता येत नाही.- महेश यादव, बँकिंग अभ्यासक
Check Also
नाव प्रेमाचं, विसर माणुसकीचा
पाश्चात्त्य समाजांकडे पाहिले, तर तिथेही गुन्हे घडतात, तिथेही हिंसा आहे. पण खासगी नात्यांमध्ये होणारी अशी …
पांचजन्य वृत्तपत्र