लेख-समिक्षण

अंतराळात आरशाचा अट्टाहास का?

अंतराळ तंत्रज्ञानाच्या इतिहासात एक अत्यंत वेगेळे आणि तितकेच वादग्रस्त पाऊल पडले आहे. अमेरिकेच्या फेडरल कम्युनिकेशन्स कमिशनने कॅलिफोर्नियातील ‌‘रिफ्लेक्ट ऑर्बिटल‌’ या स्टार्टअप कंपनीला अंतराळात महाकाय आरसा असलेला उपग्रह प्रक्षेपित करण्याची अधिकृत मंजुरी दिली आहे. ‌‘इरेंडिल-1‌’ नावाचा हा उपग्रह रात्रीच्या वेळी पृथ्वीवर सूर्यप्रकाश परावर्तित करण्याचे काम करेल. या प्रकल्पाला विज्ञान जगतातून मोठा विरोध होत असतानाही नियामक मंडळाने या चाचणी उपग्रहाला हिरवा कंदील दाखवला आहे. यामुळे अंतराळ क्षेत्रातील व्यावसायिक स्पर्धेला एक नवीन वळण मिळाले आहे.
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत अंतराळात 60 फूट बाय 60 फूट (सुमारे 18 मीटर बाय 18 मीटर) आकाराचा अत्यंत पातळ आणि चमकदार मयलार प्लास्टिकचा आरसा असलेला उपग्रह पाठवला जाणार आहे. हा उपग्रह पृथ्वीपासून साधारण 640 किलोमीटर उंचीवर कमी भू-कक्षेत परिभ्रमण करेल. हा आरसा अंतराळातून सौरकिरणे परावर्तित करून रात्रीच्या वेळी पृथ्वीवरील एका विशिष्ट भूप्रदेशावर पाडेल. कंपनीच्या तांत्रिक दाव्यानुसार, हा फिरता प्रकाश पृथ्वीवर सुमारे 5 किलोमीटर व्यास असलेल्या क्षेत्राला उजळवून टाकू शकेल. या प्रकाशाची तीव्रता पूर्ण चंद्राच्या प्रकाशाच्या बरोबरीची असेल, ज्यामुळे रात्रीच्या वेळीही जमिनीवर सौर ऊर्जा प्रकल्प सुरू ठेवून वीज निर्मिती करणे शक्य होईल.
रिफ्लेक्ट ऑर्बिटल कंपनीच्या मते, या तंत्रज्ञानाचा वापर केवळ सौर ऊर्जा निर्मिती वाढवण्यासाठीच नाही, तर आपत्कालीन परिस्थितीत शोध मोहिमा राबवण्यासाठी, पूर किंवा भूकंपासारख्या आपत्ती व्यवस्थापनात प्रकाश पुरवण्यासाठी, रात्रकालीन बांधकाम कामांसाठी आणि कृषी क्षेत्रासाठी केला जाऊ शकतो. मात्र, कंपनीची ही केवळ पहिली चाचणी असून, 2035 पर्यंत अंतराळात तब्बल 50,000 असे फिरते आरसे तैनात करण्याची त्यांची मूळ योजना आहे. जर हे विस्तीर्ण जाळे प्रत्यक्षात आले, तर पृथ्वीवरील रात्रीचा अंधार पूर्णपणे नष्ट होऊन 100 पूर्ण चंद्रांच्या प्रकाशाएवढा उजेड 24 तास उपलब्ध होऊ शकतो.
या अजब तंत्रज्ञानामुळे वैज्ञानिक, खगोलशास्त्रज्ञ आणि पर्यावरणवाद्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. अमेरिकन ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीने या प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शवला आहे. खगोलशास्त्रज्ञांच्या मते, अंतराळातील या कृत्रिम प्रकाशामुळे जगभरातील वेधशाळांना आणि संवेदनशील दुर्बिणींना रात्रीच्या वेळी फिकट खगोलीय वस्तूंचा अभ्यास करणे अशक्य होईल. यामुळे खगोलशास्त्रीय संशोधनाचे अतोनात नुकसान होईल. जीवशास्त्रज्ञांनी धोक्याचा इशारा दिला आहे की, यामुळे मानवासह प्राणी, पक्षी आणि वनस्पतींच्या नैसर्गिक जैविक घड्याळावर गंभीर परिणाम होईल. अचानक चमकणाऱ्या प्रकाशामुळे वैमानिक किंवा महामार्गावरील वाहनचालकांचे लक्ष विचलित होऊन अपघातांचा धोका वाढू शकतो.
एवढा मोठा विरोध आणि हजारो हरकती येऊनही ‌‘एफसीसी‌’ने केवळ रेडिओ फ्रिक्वेन्सी नियमनाचा अधिकार असल्याचे सांगत या चाचणीला मंजुरी दिली आहे. अमेरिकन नियामक मंडळाच्या मते, बाह्य अंतराळातील उपक्रमांना पृथ्वीवरील पर्यावरण कायदे थेट लागू होत नसल्याने, त्यांनी केवळ दळणवळण लहरींच्या सुरक्षेचा विचार करून एकाच उपग्रहाच्या चाचणीला परवानगी दिली आहे. यापूर्वी 1993 मध्ये रशियाने ‌‘झनाम्या‌’ प्रकल्पांतर्गत अशाच प्रकारच्या अवकाश आरशाची चाचणी घेतली होती, जी अंशतः यशस्वी ठरली होती. त्यामुळे आता रिफ्लेक्ट ऑर्बिटलचा हा आधुनिक प्रयोग यशस्वी ठरतो की केवळ एक वादग्रस्त प्रयोग म्हणून राहतो, याकडे संपूर्ण वैज्ञानिक जगाचे लक्ष लागले आहे.-विजया पंडित

Check Also

नाव प्रेमाचं, विसर माणुसकीचा

पाश्चात्त्य समाजांकडे पाहिले, तर तिथेही गुन्हे घडतात, तिथेही हिंसा आहे. पण खासगी नात्यांमध्ये होणारी अशी …