केस सरळ आणि चमकदार दिसावेत यासाठी आजकाल अनेक तरुण-तरुणी पार्लरमध्ये जाऊन ‘रिबॉन्डिंग’ किंवा ‘कॅरेटिन’ सारख्या रासायनिक प्रक्रियांचा आधार घेतात. मात्र या रासायनिक उपचारांचे परिणाम तात्पुरते असतात आणि कालांतराने रासायनिक प्रक्रियांमुळे केस अधिक कोरडे व निर्जीव होऊ लागतात. केसांचे नैसर्गिक आरोग्य जपून त्यांना घरच्या घरीच पार्लरसारखी चकाकी मिळवून द्यायची असेल, तर स्वयंपाकघरातील काही साध्या घटकांचा वापर करणे अधिक फायदेशीर ठरते.
नैसर्गिकरीत्या रेशमी केसांसाठी आपल्याला एक ग्लास पाणी, एक चमचा तांदळाचे पीठ, एक अंडे, एक चमचा दही आणि दोन चमचे खोबरेल तेल या साहित्याची आवश्यकता भासते. हा घरगुती ‘हेअर पॅक’ तयार करण्याची पद्धत अत्यंत सोपी आहे. सर्वप्रथम एका भांड्यात एक ग्लास पाणी घेऊन ते गॅसवर गरम करायला ठेवावे. त्यामध्ये एक चमचा तांदळाचे पीठ घालून साधारण दहा मिनिटे शिजवावे. हे मिश्र्ण घट्ट झाल्यावर गॅस बंद करून ते पूर्णपणे थंड होऊ द्यावे. अशा प्रकारे एक नैसर्गिक क्रीम तयार होईल. यानंतर या थंड झालेल्या क्रीममध्ये एक अंडे, एक चमचा दही आणि दोन चमचे खोबरेल तेल मिसळावे. हे सर्व घटक एकजीव करून त्याची मऊ पेस्ट तयार करावी. तुमच्या केसांच्या लांबीनुसार तुम्ही या साहित्याचे प्रमाण वाढवू शकता जेणेकरून हा पॅक मुळांपासून टोकांपर्यंत व्यवस्थित लावता येईल. ही पेस्ट केसांवर लावून हलक्या हाताने मालिश करावी आणि काही वेळ तशीच राहू द्यावी.
केस धुताना पाणी खूप थंड किंवा खूप गरम नसावे. खोलीच्या तापमानाइतके म्हणजेच कोमट पाणी असल्यास केस धुणे अधिक सोपे जाते आणि त्याचे परिणामही उत्तम मिळतात. केस नैसर्गिकरीत्या सुकल्यानंतर तुम्हाला त्यातील मऊपणा आणि चकाकी स्पष्टपणे जाणवेल. केवळ एकदा वापरून थांबण्यापेक्षा दर आठवड्याला हा देशी नुसता वापरल्यास केसांच्या रचनेत कायमस्वरूपी सकारात्मक बदल दिसून येतात. रसायनांचा मारा टाळून नैसर्गिक घटकांचा वापर केल्यामुळे केसांचे योग्य पोषण होते आणि ते मुळापासून मजबूत होतात.
Check Also
व्यक्तिमत्वात बदल घडवताना…
व्यक्तिमत्त्व विकास म्हणजे केवळ वरवरचे राहणीमान सुधारणे किंवा इंग्रजी बोलणे नव्हे, तर ती स्वतःला अधिक …
पांचजन्य वृत्तपत्र