भारत-पाकिस्तान फाळणीच्या पार्श्वभूमीवर आधारित ‘बटवारा 1947’ या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा नवा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांच्या या चित्रपटात सनी देओल मुख्य भूमिकेत असून, तो आपल्या कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी एका कठीण संघर्षातून जात असल्याचे यात दिसून येते. भारतीय इतिहासातील एका अत्यंत अस्थिर आणि वेदनादायक काळाची साक्ष देणारा हा चित्रपट येत्या 14 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
या टीझरमध्ये फाळणीच्या काळातील हिंसाचार, विस्थापन आणि अनिश्चिततेच्या वातावरणात जगण्याची जिद्द पाहायला मिळते. सनी देओल एका अशा नायकाच्या भूमिकेत आहे, जो सर्व संकटांचा सामना करत आपल्या प्रियजनांना सुरक्षित ठेवण्याचा निश्चय करतो. या टीझरमध्ये भावनाप्रधान प्रसंगांसोबतच भव्य ॲक्शन सीन्सचे मिश्र्ण पाहायला मिळते, ज्यामुळे चित्रपट केवळ ऐतिहासिक नसून मानवी नातेसंबंधांवरही भाष्य करणारा असेल, हे स्पष्ट होते.
‘बटवारा 1947’ द्वारे सनी देओल आणि राजकुमार संतोषी ही लोकप्रिय जोडी तब्बल तीन दशकांनंतर पुन्हा एकत्र आली आहे. ‘घायल’, ‘दामिनी’ आणि ‘घातक’ सारख्या सुपरहिट चित्रपटांनंतर ही जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर जादू निर्माण करण्यासाठी सज्ज झाली आहे. चित्रपटात सनी देओलसोबत शबाना आझमी, प्रीती झिंटा, करण देओल, अली फझल आणि अभिमन्यू सिंग यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.- जगदीश काळे
Check Also
48 तासांत ‘हटवला’ ‘सतलज’
दिग्दर्शक हनी त्रेहान यांच्या बहुप्रतिक्षित ’सतलज’ या चित्रपटाला डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होऊन अवघे 48 तास …
पांचजन्य वृत्तपत्र