प्रथमग्रासे मक्षिकापातः म्हणजे पहिल्याच घासात माशी पडणं. एखाद्या कामात सुरुवातीलाच विघ्न येणं. ‘माशी शिंकणं’ या वाक्प्रचाराचा अर्थही जवळजवळ तोच. माश्या मारत बसणं म्हणजे निरुद्योगी बसून राहणं. ज्याच्या तोंडावरची माशीही उठत नाही, तो प्रचंड आळशी किंवा मंद. चांदोमामाला तूप रोटी खायला बोलवावं, तर तुपात नेमकी माशी पडते आणि चांदोबा उपाशी राहतो. एकंदरीत माशीविषयी चांगलं मत असणारा माणूस सापडणं अवघड. का सापडावा? हा कीटक चावत नाही; पण तोंडापुढे गुणगुणत राहून वैताग आणतो. अन्नपदार्थ चुकून जरी उघडा राहिला, तर लगेच त्यावर माशी येऊन बसते आणि सोबत आणलेले विषाणू अन्नात कालवून आपल्याला आजारी पाडते. माश्यांचा उपद्रव काय असतो, हे कचरा डेपोजवळच्या गावांमध्ये जाऊन पाहावं. कचरा डेपो अन्यत्र हलवावा, ही मागणी मान्य होत नसल्यामुळं घरदार सोडून कुटुंब दुसरीकडे स्थायिक झाल्याचीही उदाहरणं सापडतील. अशा या उपद्रवी माश्यांनी पोलिसांना एक गंभीर गुन्हा उघडकीस आणायला मदत केली, हे सांगून पटणार नाही. हे काम श्वानपथकातल्या प्रशिक्षित श्वानांचं. घटनास्थळ हुंगून ते आरोपींपर्यंत पोहोचतात. पण तपासी अधिकाऱ्यांनी जिथं हात टेकले, तिथं त्यांच्या मदतीला माश्या धावल्या. मध्य प्रदेशातल्या जबलपूर जिल्ह्यात घडलेल्या या घटनेनं सगळ्यांच्याच भुवया उंचावल्यात. काकाचा खून करणाऱ्या पुतण्याकडून गुन्ह्याची कबुली घेण्यात पोलिसांना यश आलं ते माश्यांमुळं!
झालं असं, की काका आणि पुतण्या दोघे दारू प्यायला गेले. काकाने दुकानातून बाटली घेतली. एका हॉटेलमधून जेवणाचं पार्सल घेतलं. मग दोघे शेतात जाऊन दारू प्यायले. घरी येताना पुतण्या एकटाच आला. नशेत दोघांची चुकामूक झाली, असं घरातल्यांना वाटलं असावं. पण काका रात्रभर आलाच नाही, तेव्हा कुटुंबीयांनी पोलिसात जाऊन तो बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. पोलिसांनी शोध घेतला असता शेतात काकाचा मृतदेह सापडला. हा खूनच असावा, असा संशय पोलिसांना आला. त्यामुळं काकाबरोबर असलेल्या पुतण्याकडे अर्थातच पोलिसांनी पहिल्यांदा चौकशी केली. आपल्याला काहीच माहीत नाही, हे पुतण्याचं म्हणणं पोलिसांनाही पटलं, कारण पुतण्या अवघा 19 वर्षांचा. काकाच्या चीजवस्तू गायब झाल्या नव्हत्या, त्यामुळं ही घटना लुटीच्या उद्देशानं झालेली नाही, हे पोलिसांनी ओळखलं. काकाचं कुणाशी वैर नाही, पैशांची देवाणघेवाण नाही… मग खून केला कुणी आणि कशासाठी? पोलिसांनी पुतण्याची पुन्हा चौकशी केली, तेव्हाही तो गप्पच राहिला. पण त्याच्या डोक्यावर घोंगावणाऱ्या माश्यांनी पोलिसांना ‘क्लू’ दिला. इतर कुणाच्याच दिशेला न जाणाऱ्या माश्या पुतण्याच्याच डोक्यावर का घोंगावत असतील..?
पोलिसांनी पुतण्याला शर्ट काढायला लावला आणि तो फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवला. शर्टाला रक्त लागलं होतं; पण ते दिसून येत नव्हतं. मग पोलिसांनी पुतण्याला ‘नीट’ विचारलं, तेव्हा तो कबूल झाला. दारू आणि पैशांवरून काका-पुतण्यांची भांडणं झाली होती. पुतण्याच्या म्हणण्यानुसार, काकाने त्याला पहिल्यांदा मारलं आणि चिडून पुतण्याने त्याच्यावर लाकडी दांडक्याने प्रहार केला. काका तिथेच गारद झाला. खरंतर अशा घटना बऱ्याचदा घडतात; पण अत्यंत रोगट म्हणून तिरस्करणीय असलेल्या माश्या डिटेक्टिव्ह बनल्या, हे या घटनेचं वैशिष्ट्य!
Check Also
‘हा’ आहे पृथ्वीवरील शेवटचा रस्ता
जग कुठे संपतेय, जगाचे शेवटचं टोक कुठे आहे, असे प्रश्न फक्त लहान मुलांनाच नाही, तर …
पांचजन्य वृत्तपत्र